विद्याधर गोखले करंडक वक्तृत्व स्पर्धा

आजची तरूण पिढी हुषार आहे, सुज्ञ आहे. या पिढीला केवळ आपल्या परिसरातले नव्हे तर जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांचे उत्तम भान आहे. आणि ओघानेच स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमताही आहे. त्यांच्यातील ही क्षमता चांगल्या व्यासपीठाच्या माध्यमातून सामोरी यावी म्हणून प्रतिवर्षी एका वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊ लागले. चतुरंगचे केवळ हितचिंतकच नव्हेत तर पालकाच्या नजरेने चतुरंग कामावर जागता पहारा ठेवणारे ज्येष्ठ विचारवंत, सव्यासाची संपादक, नाटककार श्री. विद्याधर गोखले यांचे स्मरण म्हणून या वक्तृत्व स्पर्धेला विद्याधर गोखले करंडक वक्तृत्व स्पर्धा असे नाव देण्यात आले. महाराष्ट्रातील महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी ही स्पर्धा दोन स्तरांवर योजली जाते. ज्यात प्राथमिक स्तरासाठी विद्यार्थ्यांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वा राजकीय क्षेत्रासंबंधित अशा पूर्वघोषित विषयांमधून आपल्या आवडीचा विषय निवडता येतो. सुमारे महिनाभराच्या कालावधीत या विषयावर आवश्यक असे स्वतःचे वाचन, चिंतन, मनन आणि अन्यत्रांचे मार्गदर्शनही घेता येते. प्राथमिक फेरीत १० मिनिटाच्या कालावधीत त्या विषयाची मांडणी करून झाल्यावर परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी निवड केलेल्या विद्यार्थ्यांना ऐनवेळी हाती आलेल्या चिठ्ठीतून समोर आलेल्या विषयाच्या अनुषंगाने केवळ ५ मिनिटे इतक्या कालावधीत विषयाची उत्स्फूर्त मांडणी करावयाची असते. या स्पर्धेतील प्रथम व द्वितीय पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे प्राथमिक फेरीतील भाषणाचे संकलन चतुरंग स्मरणिकेत आवर्जून प्रसिद्ध करण्यात येते. या वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार म्हणून विद्याधर गोखले करंडक (कायम स्वरूपी) आणि रोख रू. ३०००/- व प्रशस्तिपत्र, द्वितीय पुरस्कार म्हणून रोख रू. २०००/- आणि प्रशस्तिपत्र तर तृतीय पुरस्कार म्हणून रोख रू. १०००/- आणि प्रशस्तिपत्र देण्यात येते.