जीवनगौरव पुरस्कार

स्वीकृत क्षेत्रात निरपेक्षपणे कार्यरत असलेल्या व्यक्तीचा कृतज्ञभावनेने केलेला गौरव म्हणजे चतुरंगचा जीवनगौरव पुरस्कार! चतुरंग कार्यरत असलेल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श-अनुकरणीय व्यक्तींना वैकल्पिक रीतीने प्रतिवर्षी गौरविण्यात येते. पुरस्कार क्षेत्राचे आवर्तन हे सांस्कृतिक, सामाजिक, पुन्हा सांस्कृतिक, शैक्षणिक असे चार वर्षांचे असते. चतुरंगबाहय अशा पण समाजात सर्वदूर संचार असणाऱ्या सात मान्यवरांच्या नियुक्त निवडसमितीद्वारे या पुरस्काराची निवड केली जाते. निवडसमितिचा निर्णय चतुरंग प्रतिष्ठानवर बंधनकारक असतो. तीन लक्ष रूपये, भव्य सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असते. हा पुरस्कार चतुरंग रंगसंमेलनात प्रदान करण्यात येतो. चतुरंग रंगसंमेलन निमित्ताने पुरस्कारप्राप्त व्यक्तिवरील स्मरणिकायुक्त गौरवग्रंथाचेही प्रकाशन करण्यात येते. जीवनगौरव नावाने समाजात अलिकडच्या काळात असंख्य पुरस्कार दिले जात असले तरी या पुरस्काराचा प्रारंभ चतुरंग प्रतिष्ठानने केला आहे ही बाब अधोरेखित करावयास हवी. या पुरस्काराचे जीवनगौरव हे नाव देखील पद्मश्री पु.ल. देशपांडे यांनी चतुरंग प्रतिष्ठानला सुचवले होते. शिवाय `जीवनगौरव पुरस्कार' हे नाव चतुरंग नावे सरकार दरबारी नोंदणीकृतही केलेले आहे. आणखी एका कारणाने या पुरस्काराचे वेगळेपण ठरते ते म्हणजे समाजातील सर्वसामान्य रसिकांनी एकदाच दिलेल्या प्रत्येकी रूपये १०००/-च्या कायम निधीच्या व्याजातून प्रतिवर्षा हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे हा पुरस्कार खऱ्या अर्थाने लोकपुरस्कार अथवा जनपुरस्कार ठरतो. पुरस्कार निधी रक्कम रूपये १०००/- देऊ करणाऱ्या व्यक्तिला चतुरंग जीवनगौरव पुरस्काराचे `जनक' म्हणून संबोधले जाते.