रंगसंमेलन

रंगसंमेलन म्हणजे चतुरंग निर्मित जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठी योजलेला दिमाखदार, शानदार सोहळा. साहित्य, नाटय, विविध कला, क्रीडा, संगीत, चित्रपट आदी अनेक क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन हा चतुरंग रंगसंमेलनाचा ठळक विशेष आहे. जीवनगौरव गौरवमूर्तींना  जवळून पाहणे, त्यांना भेटणे, बोलणे, त्यांना ऐकणे हाही उपस्थित रसिकांचा आनंद ठेवा असतो. याशिवाय बहुतेक रंगसंमेलन प्रसंगी योजलेल्या चहापान संमेलनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील एरवी दुर्लभ अशा मान्यवर-मातब्बर व्यक्तीमत्वांना प्रत्यक्षांत भेटता येते. त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करता येतात. चतुरंग संस्थेच्या वर्षभराच्या उपक्रमचक्रातील मानबिंदू म्हणावा असा हा उपक्रम ! एका अर्थाने चतुरंगला वर्षभरासाठी संजीवनी प्राप्त करून देणारा. कारण चतुरंगचे वर्षभरातील बहुतेक सर्व कार्यक्रम हे विनामूल्य पद्धतीने योजले जात असतात. मात्र रंगसंमेलन निमित्ताने प्रायोजक, जाहिरातदार, तिकीटे या माध्यमातून जमा होणारी पुंजी चतुरंगला वर्षभराच्या विविध स्वरूपाच्या अभ्यासवर्ग उपक्रमांसाठी आणि विनामूल्य स्वरूपात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरता येते.