निवासी अभ्यासवर्ग

चतुरंगकडून कोकण भागातील विद्यार्थ्यांसाठी सात दिवस, सात केंद्र, सात विषय अशा स्वरूपात योजल्या जाणाऱ्या नाताळ (मुक्त) अभ्यासवर्गांचा लाभही तेथील विद्यार्थ्यांना खूप ठळकपणाने होताना दिसत होता. एका विषयाच्या केवळ एका दिवसाच्या मार्गदर्शनातून जर एवढा लाभ, तर तोच विषय सलग दोन-तीन दिवस सखोलपणे शिकविल्यास मुलांना त्याचा विशेष उपयोग होईल हे ध्यानात आल्यावर निवासी अभ्यासवर्गाची योजना कृतीत आणली गेली. कोकणभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातल्या १०-१२ तालुक्यांतील सुमारे १५० शाळांशी झालेल्या संपर्कातून उत्तम गुणवत्तेच्या मुलांची चांचणी परीक्षा घेऊन त्यातून केवळ ६० विद्यार्थ्यांची चतुरंग निवासी अभ्यासवर्गाकरिता निवड केली जाते. विद्यार्थ्यांनी वर्गाला येताना आपले शैक्षणिक साहित्य आणि वैयक्तिक गरजेच्या गोष्टी घेऊन येणे अपेक्षित असते. वर्गकाळातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक त्या त्या विषयातील दोन-तीन तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आखले जाते, शिवाय एक सुदृढ आणि जबाबदार नागरिक घडावा म्हणून आवश्यक त्या सर्व संस्कारांकडे म्हणजे प्रार्थना, कवायत, योगा, सूर्यनमस्कार, खेळ, बौद्धिक आणि अभ्यासेत्तर विषयांचा समावेश कार्यकर्त्यांकडून अत्यंत काटेकोरपणे सांभाळला जातो. शिवाय खानपान विषयाकडेही तितक्याच निगुतीने लक्ष दिले जाते. अभ्यासेतर विषयांसाठी थोरामोठयांची विशेष व्याख्याने योजली जातात. या वर्गाच्या निमित्ताने उपस्थित शिक्षक, विद्यार्था, पालक आणि अर्थातच कार्यकर्ते यांच्यात परस्पर नाते निर्माण होते. या वर्गाचे आयोजन केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होत असून ते प्रतिवर्षाच्या दिवाळी सुट्टीत केले जाते.