सवाई एकांकिकोत्सव

दरवर्षीच्या ‘सवाई'नंतर वाटत राहायचे की, इतक्या छान, वेगवेगळ्या बाजाच्या, नवा ट्रेंड असलेल्या एकांकिका, शेवटी केवळ मुंबई-पुणे शहरांसारख्या परिघातच अडकणार का? तो परिघ ओलांडून त्या कोकणात, पश्चिम महाराष्ट्रातल्या अंतर्गत भागात, विदर्भातल्या खेड्यांत पोहोचणारच नसतील तर एकांकिकेचे हे एक्सटेन्शन (ही विस्तार क्षमता) त्या त्या स्थानिक कलावंतांपर्यंत जाणार कसे? यांच्याही जाणीवा रुंदावणार कशा? उपाय म्हणून शासकीय माध्यमाद्वारे कांही होऊ शकते का, अशीही चांचपणी करून पाहिली. पण सरकारी नियम आडवे आले. मग चिपळूण कार्यकर्त्यांच्या आग्रही उत्साहानुसार, किमान कोकणात तरी आपल्या ह्या `सवाई'चा परिचय करून देऊया, या उद्देशाने एकांकिकांचा रंगोत्सव चिपळूण केंद्राद्वारे सुरू केला गेला. `सवाई'तल्या लक्षवेधी अशा तीन-चार एकांकिका चिपळूणकर रसिकांसाठी सादर होऊ लागल्या. कलाकारांनाही प्रोत्साहन मिळाले, नाट्यरसिकांनाही नव्या बाजाच्या एकांकिका घरपोंच मिळाल्यासारख्या झाल्या. डोंबिवली केंद्रावरही दोन वर्षे हा प्रयोग करून पाहिला गेला. एकांकिका उत्तम रंगत असल्या, तरी रसिकवर्गाच्या अत्यल्प प्रतिसादामुळे, डोंबिवली व चिपळूण केंद्रांतून या उपक्रमाला काढता पाय घ्यावा लागला, ही खंत अजूनही चतुरंग मनात आहेच.  मात्र काळाच्या ओघात अलिकडे तीन चार वर्षे या उपक्रमाने पुणे आणि गोवा येथे उत्तम रसिक प्रतिसाद मिळविला आहे.