चतुरंग वर्धापनदिन

अक्षयतृतीया हा चतुरंगचा वर्धापनदिन ! दि. २४ एप्रिल १९७४ च्या अक्षयतृतीयेला सायंकाळी शिवाजीपार्कच्या उद्यान गणेश मंदिरात समविचाराचे चार तरुण एकत्र आले आणि चतुरंग संस्थेने जन्म घेतला. पुढच्या काही वर्षांच्या काळात चारांचे चौदा ,चाळीस आणि एकशेचाळीस होत गेले . चतुरंगने हाती घेतलेल्या उपक्रमांचा वेग आणि व्याप्ती वाढतच राहिली. मात्र प्रतिवर्षीचा हा चतुरंग वर्धापनदिन मुंबई आणि डोंबिवलीतील चतुरंग कार्यकर्त्यांकडून अत्यंत साधेपणाने साजरा होत राहिला आहे. अक्षयतृतीयेच्या दिवशी सकाळी सात-साडेसातच्या सुमारास उद्यान गणेश मंदिरी सर्वांनी एकत्र भेटणे,परस्परांशी थोड्या गप्पागोष्टी , श्री गणेशाचे सामुहिक दर्शन , अथर्वशीर्ष पठण,आरती ,प्रसाद पेढा आणि नंतर पियुषपान असे इतके साधे या वाढदिवसाचे स्वरूप असते. या दिवशी चतुरंग चिपळूण मधील मंडळी श्री वीरेश्वर मंदिरात दर्शन-प्रार्थनेसाठी जातात .