अभिमान मूर्ती पुरस्कार प्रदान सोहळा 2023

चतुरंग प्रतिष्ठानचा अभिमान मूर्ती पुरस्कार प्रदान सोहळा दि. १६ ऑगस्ट २०२३ रोजी त्रिमूर्ती भवन प्रधानमंत्री वस्तुसंग्रहालय सभागृह, दिल्ली येथे संपन्न झाला. ध्येय म्हणून एखादे कार्यक्षेत्र निवडून त्या कार्यासाठी, त्या विषयासाठी निरपेक्ष वृत्तीने स्वतःच्या आयुष्याचे योगदान देऊन देशाकरिता भरीव,उत्तुंग आणि सर्वोत्तम अशी कामगिरी करणाऱ्या निरपवाद सर्वश्रेष्ठ व्यक्तीला, Person Of Pride अर्थात अभिमान मूर्ती हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार दिला जातो. आत्तापर्यंत हा पुरस्कार ई श्रीधरन, टी एन शेषन, डॉ.के कस्तुरी रंगन, डॉ.ए पी जे अब्दुल कलाम, डॉ.रघुनाथ माशेलकर, आर एन नारायण मूर्ती, नेव्हल कमांडर दिलीप दोंदे अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कर्तृत्वानांना दिला गेला आहे. २०१८ साली हा पुरस्कार स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना (मरणोत्तर) जाहीर केला. हा पुरस्कार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी यांच्या हस्ते अटलजींच्या मानसकन्या नमिता भट्टाचार्य आणि जावई रंजन भट्टाचार्य यांनी स्वीकारला. या सोहळ्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट चे पदाधिकारी महेशचंद्रजी शर्मा उपस्थित होते. हा पुरस्कार कायमस्वरूपी जतन करण्यासाठी अटलजींच्या कुटुंबीयांनी प्रधानमंत्री वस्तू संग्रहालयाला सुपूर्द केला. प्रधानमंत्री वस्तू संग्रहालयाच्या वतीने चेअरमन न्रिपेंद्र मिस्रा यांनी तो स्वीकारला. सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मानपत्राचं लेखन ज्येष्ठ पत्रकार श्री सुधीर जोगळेकर यांनी केलं आहे. या सोहळ्यात नितीनजी गडकरी आणि महेशचंद्रजी शर्मा यांनी अटलजींच्या अनेक स्मृती जागवल्या. चतुरंग प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या "अभिमानमूर्ती अटलजी" या पुस्तकाची माहिती विनोदजी तावडे यांनी सांगितली. अटलजींच्या एका कवितेने या सोहळ्याची सांगता झाली. ऐनवेळी काही तांत्रिक कारणामुळे विनयजींचे विमान उशिरा आले आणि ते हजर राहू शकले नाहीत. मात्र आयत्यावेळी महेशचंद्रजी शर्मा उपस्थित राहून त्यांनी केलेल्या अटलजींविषयीच्या भाषणामुळे सोहळ्याची शोभा आणखीनच वाढली. 
या सोहळ्यासाठी चतुरंग प्रतिष्ठानच्या विविध केंद्रातून दोन-तीन कार्यकर्ते असे एकूण १६ कार्यकर्ते स्वखर्चाने दिल्लीला गेले होते. या सोहळ्याची जबाबदारी जेष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली चतुरंगच्या युवा पिढीने हाती घेतली आणि पेलली सुद्धा. त्यानिमित्ताने तरुण कार्यकर्त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची सुवर्णसंधी मिळाली. इतक्या दूरस्थ प्रांतातला मांड सजवताना दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे अभिजीत गोडबोले, हेमंत डांगे आणि त्यांचे सहकारी.. संतोष सुर्वे.. शिंदे आणि विनोदजींचे अन्य सहकारी.. संघाचे उच्चपदस्थ माननीय भैयाजी जोशी.. नरेंद्रजी जाधव.. वामन केंद्रे.. अशा किती एक भल्या भल्या मंडळींचं प्रेमळ हक्काचं कृतीशील पाठबळ मिळालं !
मुंबईतून ट्रॉफीवाले अभयदा, ब्रोशरवाले प्रमोदजी, आस्वादवाले सरजोशी अशा अनेकांनी या दिल्लीवारीला महत्त्वपूर्ण हातभार लावला..! खुद्द दिल्लीत विक्रमजी कसबेकर, मध्य प्रदेश भवन व प्रधानमंत्री वस्तू संग्रहालयातील सहाय्यकारी मंडळी, विनोदजी तावडेंचं संपर्क मनुष्यबळ आणि अंशतः अर्थबळ.... अशा कितीतरी ऐवजांची यात बेरजेचीच भर पडली !!
कार्यकर्त्यांची पाठ थोपटण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी विनोद तावडे आणि विनयजी सहस्रबुद्धे यांनी सर्व कार्यकर्त्यांना घरी पाचारण केले. विनोद तावडे यांनी सर्व कार्यकर्त्यांशी दिलखुलास गप्पा मारल्या आणि खास भोजनाची व्यवस्था ही केली होती. 
एकंदरितच हा सोहळा आणि दिल्लीचा प्रवास चतुरंग कार्यकर्त्यांसाठी संस्मरणीय ठरला. आणि चतुरंगच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात कार्यकर्त्यांच्या पदरी आठवणींची आणि शिकवणींची ठेव देऊन गेला.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
बुधवार, 16 ऑगस्ट 2023  05:30 PM
ठिकाण
प्रधानमंत्री वस्तू संग्रहालय , दिल्ली
पत्ता