सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार

विद्यार्थ्याची अभ्यासातील प्रगती जितकी महत्वाची तितकेच त्याचे विविध कला आणि क्रीडांमधील कसब, वक्तृत्व, लेखन आणि सोबत्यांबरोबरची वागणूक याही बाबी चतुरंगला महत्वाच्या वाटतात. उद्याचा उत्तम नागरिक घडवायचा असेल तर विद्यार्थादशेतच मुलांवर तसे संस्कार होणे गरजेचे असते. कोकण शाळांतील शिक्षकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही या गोष्टीचे भान देण्यासाठी सर्वोत्तम विद्यार्था गोडबोले पुरस्काराचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. कोकणभागातील चतुरंग संपर्कातील सुमारे दीडशे शाळांशी होणाऱ्या पत्रव्यवहारांनुसार प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, मराठीचे शिक्षक, पीटी शिक्षक आणि शाळेतील ज्येष्ठ शिपाई या मंडळींनी एकत्रित चर्चेअंती आठवी ते दहावी या वर्गातून ४ किंवा ६ विद्यार्थ्यांच्या नावांची शिफारस करणे अपेक्षित असते. या शिफारसपात्र विद्यार्थ्यांच्या, चतुरंग चिपळूण कार्यालयात, चतुरंग बाहय निवडसमितिकडून शाळानिहाय मुलाखती घेतल्या जातात आणि त्या त्या वर्षाच्या सर्वोत्तम विद्यार्था गोडबोले पुरस्कारासाठी विद्यार्था नावे निश्चित केली जातात. चतुरंग अभ्यासवर्गांचे प्रणेते गुरूवर्य एस. वाय. गोडबोले यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून ही पुरस्कार योजना त्यांच्याच नांवे कार्यान्वित करण्यात आली. प्रतिवर्षी सरासरी २५ ते ३० विद्यार्थ्यांना प्रत्येकी रोख रू. १०००/- आणि सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येते. या कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने प्रतिवर्षी बुजुर्ग व्यक्तिमत्वांचे चिपळूण येथे येणे, त्यांचे विचारदर्शन शिक्षक, पालक, कार्यकर्त्यांना ऐकता येणे हाही महालाभ घडतो.