अभिमानमूर्ती सन्मान
स्वीकृत क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्ती समाजात कार्यरत असतात. यातून कोणालाही अभिमानच वाटावा अशा राष्ट्रीय कामगिरीनिमित्त आदरणीय ठरणाऱ्या व्यक्तिला चतुरंगच्या अभिमानमूर्ती पुरस्काराने गौरविले जाते. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या कालावधीत विशेष कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या व्यक्तिची या पुरस्कारासाठी निवड होते. विशेष म्हणजे ही निवड चतुरंग कार्यकर्त्यांकडून परस्परातील चर्चा-विचार-विनिमयातून करण्यात येते. या पुरस्काराच्या निवडीमुळे समाजातील काही अस्पर्शित, अप्रकाशित क्षेत्रांपर्यंतही चतुरंग पोचू शकली आहे. याचा चतुरंगीयांना सार्थ अभिमान आहे. दुसरा ठळक विशेष म्हणजे पुरस्कार निवडीसाठी होणाऱ्या चर्चांमधून पन्नास-साठ-सत्तर कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीने चर्चा करून `एकमता'वर येण्याचे संस्कारक्षम असे छानसे प्रशिक्षणही मिळते. समोरच्याची बाजू ऐकून घेण्याची, त्याच्या मांडणीत, विचारात तथ्य असेल याची नोंद घेण्याची संवय होणे, हाही या प्रशिक्षणाचा भाग ठरतो. निवड केलेल्या व्यक्तीस चतुरंगकडून कधी रंगसंमेलन सोहळ्यात तर कधी स्वतंत्रपणे योजलेल्या कार्यक्रमात सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येते.