ऋतुरंगांनी रंगला यंदाचा डोंबिवलीतील होलिकोत्सव :2024

ऋतुरंगांनी रंगला यंदाचा डोंबिवलीतील होलिकोत्सव

चौदा विद्या चौसष्ट कलांच्या बहुव्याप्त प्रांगणातील विविध कलाविष्कार साकारणा-या स्थानिक कलाकारांची जाणकार रसिकांशी गाठभेट घडवून कधी निखळ कलानंदाचे आदान-प्रदान साधावे तर कधी नवोदित कलाकारांच्या कलारंगांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करुन देऊन त्यांच्या कलासाधनेला हातभार लावावा या उद्देशाने चतुरंगच्या डोंबिवली शाखेने १९८८ पासून रंगांचा सण असलेल्या होळीच्या पार्श्वभूमिवर होलिकोत्सव या उपक्रमाच्या आयोजनास सुरवात केली. मध्यंतरीच्या काही वर्षांचा अपवाद वगळता कलाकारप्रिय व रसिकमान्य ठरलेल्या या उपक्रमाचे डोंबिवली शाखेतर्फे दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर आयोजन होत असते. 
    यंदाचा होलिकोत्सव ऋतुचक्रातील सहांही ऋतुंच्या रंगावर व त्यांच्यातील सण-उत्सवांवर आधारित रंग ऋतुंचे या मराठी गीत मैफलीच्या मध्यवर्ती संकल्पनेवर साजरा झाला. वर्षभरातील सहा ऋतुंवर त्यातील सण-सोहळ्यांवर आधारित मराठी गीते स्थानिक कलाकारांनी सादर केली. म्हैसकर फाऊंडेशनद्वारा आयोजित होत असलेल्या ' सुश्राव्य शोध ' या नवोदित गायकांच्या स्पर्धेच्या चार वेगवेगळ्या पर्वातील विजेत्या गायक-गायिकांचा होलिकोत्सवातील कार्यक्रमात सहभाग होता. कार्यक्रमाचे संगीत संयोजन डोंबिवलीतील प्रथितयश संगीतकार श्री.उदय चितळे यांनी केले होते.

पूर्व नियोजनानुसार कार्यक्रम ठिक ६ वाजता सुरु झाला. तथापि , रसिकांनी ५l वाजल्यापासूनच गर्दी करायला सुरवात केली. रसिकांना सभागृहात दाखल होतानाच रंगतिलक लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. १६० रसिकांसाठीची आसनव्यवस्था सुनिश्चित केली होती. पण रसिकांचा प्रतिसाद पाहून जादाच्या पन्नास-पाऊणशे खुर्च्यांची अधिकची व्यवस्था ऐनवेळी करावी लागली. साधारणतः २५० रसिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला. '    
     जय शारदे वागिश्वरी या सरस्वती स्तवनपर गीताने मैफलीस सुरवात झाली. ' जीवलगा कधी रे येशील तू ' , ' ऋतुराज हा जवळी आला ' हे नाट्यपद , 'कोकिळ कुहु कुहु बोले ', ' घन घन माला नभी दाटल्या ' हे उपशास्त्रीय गीत , 'टप टप टप काय बाहेर वाजतंय ते पाहू ' हे बालगीत , ' चंद्र होता साक्षिला ' हे युगल गीत , ' खेळताना रंग बाई होळीचा ' ही सुलोचनाबाईंची लावणी या आणि अशा अनेक लोकप्रिय गाण्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. टाळ्या , शिट्ट्या , वन्समोअर ने सभागृह अक्षरशः होळीच्या रंगाने भरुन आणि भारुन गेले. ' आज गोकुळात रंग खेळतो हरी ' या भैरवीने या दोन - सव्वादोन तास चाललेल्या गीतमैफलीची सांगता झाली. सहभागी सर्व कलाकारांना शुभेच्छा पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
  कार्यक्रमोत्तर अनेक रसिकांनी " खूपच छान झाला कार्यक्रम " अशी आपली उत्स्फूर्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केली.

     सौ.नेहा उतेकर यांनी प्रास्ताविक केले तर सौ.श्रद्धा काळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मदत झालेल्या सर्वांप्रती चतुरंग मनातील ऋणभावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
शनिवार, 23 मार्च 2024  06:00 PM
ठिकाण
सुयोग मंगल कार्यालय, टिळकनगर , डोंबिवली(पू )
पत्ता
सुयोग मंगल कार्यालय, टिळकनगर , डोंबिवली(पू )