दिवाळी पहाट

वर्षभरातला सर्वात मोठा सण म्हणून महाराष्ट्रातील मराठी मनात, घराघरात दिवाळी साजरी होते. प्रत्येक घरात आकाशकंदील, रांगोळी, पणत्या, फटाके, फराळ, अत्तरगंध अशा अनेक वैशिष्ट्यांनी साकारणारी दिवाळी, एका घराऐवजी अनेक घरांची, अनेक कुटुंबांची - जणू सामाजिक, सार्वत्रिक स्वरुपाची - एकत्रितपणे मिळून साजरी केली तर त्याला `होळी'सारखे सामुदायिक तरीही मंगल स्वरुप देता येईल का? या प्रेरणादायी विचाराने `दिवाळी पहाट' उपक्रम अंकुरला. त्याहीआधी त्याचे बीजारोपण, श्री. बाळ कोल्हटकरांच्या `वाहतो ही दुर्वांची जुडी' नाटकांत पडदा उघडताक्षणीच दिसणा-या `दिवाळी'च्या पहाट दृश्याने चतुरंग मनामधे केलेले होते. या दोन मुद्यांची सांगड घालत, चतुरंगची पहिली `दिवाळी पहाट' 1986 च्या दिवाळीत दादरच्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात त्याच नाट्यप्रयोगाने साकारली. नाट्यगृहाच्या परिसरात शेकडो आकाशकंदिल, रस्ताभर रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी, इमारतीभर पणत्याच पणत्या, सर्व प्रेक्षकांचे अत्तर-गुलाबाने सुगंधी स्वागत, मध्यंतरात सर्वच रसिकांना खास दिवाळी-फराळ आणि छोटेखानी समारंभात, पुण्यातील हिंगण्याच्या महिलाश्रमाला आठवणीने दिलेली भाऊबीज भेट अशा सप्तवैशिष्ट्याने सजलेली `चतुरंगी दिवाळी पहाट' बुकींग काऊंटरवर तासाभरात हाऊसफुल्ल झाली होती. प्रत्यक्षात त्या दिवशी प्रेक्षकमंडळी घरच्या शुभकार्याला यावं तशी ठेवणीतल्या कपड्यात नटून-थटून उत्साहात पहाटे 5।। वाजता शिवाजी मंदिरी, कुठून कुठून येऊन पोहोचली होती. एक अतिशय उत्साहसंपन्न आणि मंगलमय प्रसन्नसा अनुभव घेऊन मंडळी परतली, ती प्रतिवर्षी `दिवाळी पहाट'ला यायचंच हा संकल्प सोडून ! प्रायोगिक `दिवाळी पहाट' प्रतिसादात्मक दृष्टीने यशस्वी झाल्यावर, पुढच्या वर्षीपासून नाटकाची जागा संगीत मैफलीने घेतली आणि त्यानंतर `चतुरंग'ने पुढची पंचवीस वर्षे कधी मागे वळून पाहिलेच नाही. अभिजात शास्रीय संगीतातील दिग्गज मान्यवर गायक-गायिकांच्या `दिवाळी पहाट मैफली'चा, सुरू झालेला हा सिलसिला कलावंतप्रिय-रसिकमान्य ठरत, ठाणे-पुणे-चिपळूण-कोकणखेडी करीत आता गोव्यापर्यंत पोहोचलाय्. `ज्योतसे ज्योत जलाते चलो' या न्यायाने प्रतिवर्षी महाराष्ट्रभर व बाहेरही अन्य संस्थांद्वारे सुमारे तीन-साडेतीनशे `दिवाळी पहाट मैफली' होतात, ही बाब नव्या सांस्कृतिक युगाची पहाट मानायला हरकत नसावी !