सवाई एकांकिका स्पर्धा

चतुरंग प्रारंभ झाला तो नाटयनिर्मिती या विषयातून ! चतुरंग उपक्रम मालिकेत नाटयविषयक काही उपक्रम करावा तर तो दर्जेदार आणि वेगळा असाच असायला हवा. कार्यकर्त्यांच्या चर्चेतून `सवाई एकांकिका स्पर्धा' या उपक्रमाची निर्मिती झाली. महाराष्ट्रात वर्षभराच्या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांमधून केवळ प्रथम पारितोषिकप्राप्त एकांकिकांची प्राथमिक फेरी घेऊन त्यातून निवड केलेल्या सात एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येते. त्यामुळे या स्पर्धेचा निकाल हा अर्थातच Best of the Year आणि Best of State असा ठरतो. प्रतिवर्षी दि. २५ जानेवारीच्या रात्रौ सुरू झालेली स्पर्धा २६ जानेवारीच्या प्रातःकाली संपन्न होते. युवा पिढीची नाटयविषयातील रूची आणि गती या दोन्हीचे दर्शन या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने घडते. संपूर्ण वंदे मातरम ने या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा साकार होतो. या स्पर्धेची पारितोषिक योजना : सवाई प्रथम : कायम स्वरूपी सन्मानचिन्हासह रोख रु. २५०००/- आणि प्रशस्तीपत्र, सवाई द्वितीय : कायम स्वरूपी सन्मानचिन्हासह रोख रु. २००००/- आणि प्रशस्तीपत्र, प्रेक्षक पारितोषिक रोख रु. ५०००/- यासोबत सवाई लेखक,दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, प्रकाशयोजनाकार, संगीतकार, नेपथ्यकार अशा सातजणांना प्रत्येकी प्रशस्तीपत्र व कायम स्वरूपी सन्मानचिन्हासह रोख रु. ३०००/- अशी असते. आज दूरचित्रवाणीवरील विविध मालिका आणि व्यावसायिक नाटकांतून स्थिरावलेल्या अनेक कलाकारांची वाटचाल सवाईच्या वाटेवरून झाली आहे हा चतुरंगप्रमाणेच त्यांच्यासाठीही आनंद आणि अभिमानाचा विषय आहे.