चतुरंग वर्धापन दिन :2023

चतुरंग मुख्य केंद्र

नांदी सुवर्णमहोत्सवी वर्षांची l
दावी श्रीमंती चतुरंगची ll

'जे जे उत्तम उदात्त उन्नत…' त्याचा कायम ध्यास असणाऱ्या चतुरंग प्रतिष्ठान या  संस्थेने दिनांक २२ एप्रिल २०२३ रोजी, अक्षय तृतीयेला सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले.
दरवर्षी अक्षय तृतीयेला संस्थेचा वर्धापन दिन, दादर येथील शिवाजीपार्क मैदानातील चतुरंग जन्मस्थान असलेल्या 'श्री उद्यान गणेश मंदिरात' साजरा केला जातो. मुंबई आणि डोंबिवली येथील चतुरंग कार्यकर्ते प्रतिवर्षी सकाळी सात-सव्वा सातला मंदिरात जमतात. मग रितसर गणेश पूजा, अथर्वशीर्षाचे  सांघिक पठण, आरती, मंत्रपुष्पांजली झाल्यावर संस्थेसाठी श्री गणेशांचा आशीर्वाद, प्रसादाचा पेढा आणि पियुष  घेऊन आम्ही मंडळी आपापल्या नोकरी, व्यवसाय, कॉलेजच्या मार्गी लागतो.... 
पण या वर्षी मात्र हा पन्नाशीतील पदार्पणाचा सोहळा काहीसा अनोख्या पद्धतीने साजरा केला गेला. मुंबई (22), डोंबिवली (30) येथील कार्यकर्त्यांबरोबरच, संस्थेच्या  चिपळूण (1) , रत्नागिरी (13), पुणे  (4) आणि गोवा (2) येथील शाखांचेही  कार्यकर्ते या सोहळ्यासाठी खास मुंबईत उपस्थित होते. कार्यरत कार्यकर्त्यांसह तर काही जुने, वयोवृद्ध कार्यकर्तेही 'आपल्या' चतुरंगसाठी आवर्जून उपस्थित होते. कार्यकर्ता ही आपली 'श्रीमंती' हे मानणाऱ्या चतुरंगने या निमित्ताने जुन्या, नवीन कार्यकर्त्यांचा सुरेख मिलाफ घडवून आणला होता.  
एवढेच नव्हे तर या गोतावळ्याबरोबरच, चतुरंगच्या या श्रीमंतीवर चार चांद लावण्यासाठी गेल्या वर्षीचे जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त आणि जीवन गौरव पुरस्काराचे आणखी एक मानकरी, शिवचरित्र व गड-किल्ले यांचे अभ्यासक, गिर्यारोहक श्री. आप्पा परब, याशिवाय अभिनेते मनोज जोशी, अशोक समेळ, विजय गोखले, संजय-सुकन्या मोने, वंदना गुप्ते, मुग्धा गोडबोले, ग्रंथालीचे दिनकर गांगल, ज्येष्ठ गायक वसंतराव आजगांवकर, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, प्रशासकीय अधिकारी मनोज गोहाड, चतुरंग डोंबिवली केंद्राचे पालक, उद्योजक मधुकरराव चक्रदेव, चतुरंग हितचिंतक माधवराव जोशी, अभ्यासवर्गाचे सहभागी शिक्षक दीपक मराठे, अविनाश कोटिया, शिक्षिका मृणालिनी साठे, अनघा कुलकर्णी….. ही आणि अशी विविध क्षेत्रीय पन्नासहून अधिक मान्यवर मंडळी आपल्या अतिशय व्यग्र दिनक्रमांतून वेळ काढून भल्या सकाळी ठीक 7 वाजता श्री उद्यान गणेश मंदिरात उपस्थित होती. 
गणेश मंदिरातील पूजा, आरती, प्रसाद झाल्यावर (माजी) खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी चतुरंगच्या उपक्रम माध्यमातून होणा-या समाज संस्कृतीकरणाचे कौतुक करून चतुरंगच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. चतुरंग प्रतिष्ठानचे संस्थापक कार्यकर्ते विद्याधर निमकर यांनी प्रारंभीच्या काळातील काही आठवणींचे कथन करून उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रेमभावनेबद्दल ऋण व्यक्त केले.
याच शुभदिनी संस्थेने आपली chaturang.com ही वेबसाईट Reloanch करत असल्याची घोषणा केली.
दरवर्षीपेक्षा थोड्याशा आगळ्या आणि अनौपचारिक कार्यक्रम आंखणीसाठी यावर्षीही श्री  उद्यान गणेश मंदिरातील पदाधिकारी श्री.संजय अहिर व त्यांच्या सहपदाधिकाऱ्यांचे                    सहकार्य लाभले. 
सर्वांच्या एकत्रित गप्पाटप्पा आणि पियूषपानाने या वर्धापन दिनाची सांगता झाली.

 

 

चतुरंग चिपळूण केंद्र
चिपळूण केंद्रासाठी आजच्या तारखेचा आणखी एक सुंदर योगायोग असा की याच दिवशी चतुरंग चिपळूण केंद्राला 25 वर्षे पूर्ण झाली. हा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी चिपळूण येथील वीरेश्वर मंदिरी सर्व कार्यकर्ते आणि चिपळूणातील मान्यवर अशा सुमारे पन्नासेक व्यक्ती उपस्थित होत्या.
        उपस्थित मान्यवरांपैकी माजी मुख्याध्यापक श्री. केतकर सर यांनी संस्थेच्या सर्व क्षेत्रातील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. प्रामुख्याने संस्थेने भावी शैक्षणिक धोरण, त्यानिमित्ताने पालकांचे समुपदेशन आणि संस्थांची यातील भूमिका याबाबत चर्चा सत्रे आयोजित करावी असे सुचवले.
            मंदार ओक यांनी चांगुलपणाचा भाव, मत्सराचा अभाव आणि जेथे कोठे सत्कार्य चालते तेथे आपले समाजाप्रती असलेले देणे निरपेक्ष भावनेने देणे हे तीन चतुरंगच्या यशाचे मापदंड आहेत असे आग्रही प्रतिपादन केले.
             माजी प्राचार्य श्याम जोशी सर यांनी, 'आम्ही नेहमीच चतुरंगच्या हांकेला धावून येऊ हे आश्वासन दिले, कारण चतुरंग कामात सहभागी होत असताना सतत काहीतरी नवीन सापडते आणि चांगल्या माणसांच्या संगतीत चांगल्या गोष्टी आपोआप घडून येतात. त्यामुळे माझे सर्वतोपरी सहकार्य राहील...' असे त्यांनी सांगितले. भविष्यात उत्तम पिढी घडविण्यासाठी पालकांचे समुपदेशन ही काळाची गरज आहे हे सूचक विधानही त्यांनी केले. विद्याकाकानीं आत्मचरित्र लिहावे त्यातून प्रतित होणारी चतुरंगची कार्यशैली सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल असे मत तात्या खरे यांनी मांडले.
          सर्वांना मनोगत व्यक्त करायची संधी दिली यासाठी चतुरंगचे ऋण व्यक्त करत सर्व उपस्थित मान्यवर चिपळूणकरांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.  आयोजित कार्यक्रमाला श्री विरेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि ब्राम्हण सहाय्यक संघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.

 


चतुरंग पुणे केंद्र

पुणे केंद्राने यंदाचा चतुरंग वर्धापन दिन सिंहगड रोडच्या विघ्नहर्ता मंदिरात सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत साजरा केला. 
१५ चतुरंग कार्यकर्त्यांसहित चतुरंग स्नेही श्री. सुधीर गाडगीळ, निर्मलाताई गोगटे, किशोर सरपोतदार, आनंद सराफ, सौ. मधुरा प्रसाद जोशी तसेच चतुरंग जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी आणि चतुरंगचे मार्गदर्शक आदरणीय डॉ.गो. बं. देगलूरकर सर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आदरणीय देगलूरकर सर आणि सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते गणेश पूजन, आरती व सर्वांचे एकत्र अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. 
सर्व मान्यवरांनी चतुरंगचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. आपल्या छोटेखानी भाषणात गो. बं. देगलूरकर सरांनी चतुरंग सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले की, भारतातील मंदिरे हेच भारताचे वेगळेपण आहे. इतर देशांमध्ये इतकी प्राचीन मंदिरे फारशी सापडत नाहीत. तसेच चतुरंग संस्था व संस्थेची मूल्येही इतर संस्थांपेक्षा फार वेगळी आहेत. असेच काम चालू ठेवा असे शुभाशीर्वादही त्यांनी दिले. 
श्री. किशोर सरपोतदार व श्री. सुधीर गाडगीळ यांनी चतुरंग बद्दल भरभरून प्रेम व्यक्त केले. आपल्याच घरी, आपल्या माणसांसमवेत, आपल्याच यशाबद्दल आपण सोहळा साजरा करत असतो तेव्हा तो नेहमी खास आणि जवळचा असतो. हीच भावना आज आम्हाला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. 
या छोटेखानी कार्यक्रमाला सहकार्य करणा-या मंदिराच्या विश्वस्त सौ. बोडस मॅडम यांनीही चतुरंगच्या कामाबद्दल कौतुक केले. 
चतुरंगी परंपरेनुसार पेढा व पियूषपानाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.


चतुरंग प्रतिष्ठान गोवा केंद्र
चतुरंग गोवा केंद्राचा सुवर्ण महोत्सवी वर्षारंभी सोहळा अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्यकाळी सात वाजता श्री गोपाळ गणपती मंदिर, फर्मागुडी फोंडा गोवा येथे सर्व गोवा केंद्र कार्यकर्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला.
चतुरंग प्रथेनुसार श्री गोपाळ गणपती दर्शन, गणेश प्रार्थना व सर्वांचे एकत्रित अथर्वशीर्ष पठण करून संस्था कार्यासाठी गणेशांचे आशीर्वाद घेतल. 
या कार्यक्रमाला गोवा केंद्राच्या 12 कार्यकर्त्यांसह श्री राजू देसाई, श्री संतोष देसाई , डॉक्टर शिरीष बोरकर , श्री मनोहर देसाई , सौ सविता देसाई , श्री उदय म्हांबरे , श्री अजित केरकर,  सौ सुचिता जांभळे व श्री मोहन वेरेंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरापैकी सौ सविता देसाई यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं व शुभेच्छा दिल्या. चतुरंग गोवा केंद्र सुरुवात होण्याअगोदर खास मुंबईला व गोव्याबाहेर जाऊन त्या व त्यांचे पती श्री मनोहर देसाई चतुरंगच्या कार्यक्रमांना, खास करून रंगसंमेलनाला उपस्थित राहात असत. त्यासंबंधीचे सुखद अनुभव त्यांनी कथन केले. नंतर गोवा केंद्र स्थापन झाल्याचा व चतुरंगच्या कारकीर्दीचा त्यांना विशेष आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले व चतुरंगच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांनी एकत्र बसून गप्पा गोष्टी व नंतर प्रसाद व पन्हे घेऊन कार्यक्रमाची  सांगता झाली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
शनिवार, 22 एप्रिल 2023  07:00 AM
ठिकाण
श्री उद्यान गणेश मंदिर, दादर
वीरेश्वर मंदिर,चिपळूण
विघ्नहर्ता मंदिर, सिंहगड रोड, पुणे
श्री गोपाळ गणपती मंदिर, फर्मागुडी फोंडा गोवा
पत्ता