चैत्रपालवी संगीतोत्सव - २०२४

अक्षय्य तृतीया हा चतुरंगचा वर्धापनदिन. प्रतिवर्षी तो कार्यकर्त्यांमधेच साजरा केला जात असे. या आपल्या आनंदसोहळ्यात रसिकांनाही सहभागी करुन घ्यावं , या निमित्ताने त्यांना दरवर्षी एका छानशा सांगीतिक कार्यक्रमाची भेट द्यावी या विचारातून १९९५ साली चैत्रपालवी संगीतोत्सवाचा जन्म झाला. शास्त्रीय संगीताची आराधना करणा-या , गुरुकडून त्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणा-या उदयोन्मुख युवा कलाकारांना जाणकार श्रोत्यांचे व्यासपीठ निर्माण करुन देण्याबरोबरच एखाद्या बुजुर्ग कलाकाराच्या कलाविष्काराचा आनंदही रसिकांना या उपक्रमाच्या माध्यमातून देता येऊ शकला.    

१९७४ च्या दि.२४ एप्रिल रोजीच्या अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहुर्तावर स्थापन झालेल्या चतुरंगने कालच्या दि.१० मे रोजीच्या अक्षय्य तृतीयेला स्थापनेची ५० वर्षें पूर्ण करुन ५१ व्या वर्षात पदार्पण केले हे यंदाच्या चैत्रपालवी संगीतोत्सवाचे खास वैशिष्ट्य होते. 

 दि. ११ मे , २०२४ रोजी डोंबिवलीतील सुयोग मंगल कार्यालयात सायंकाळी ४.३० ते ९.३० यावेळेत चैत्रपालवी संगीतोत्सवाचे आयोजन केले गेले. चतुरंगच्या यंदाच्या पन्नाशीच्या पूर्ततेच्या टप्प्यावर चैत्रपालवी उपक्रमाचीही त्रिदशकपूर्ती साजरी झाली असती , तथापि , मध्यंतरीच्या कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे या उपक्रमाचे आयोजन होऊ शकले नसल्याने यंदाचे चैत्रपालवीचे २८ वे वर्ष होते. 

 २००७ सालापासून या उपक्रमाला म्हैसकर फाउंडेशन पुरस्कृत चतुरंग संगीत सन्मानचतुरंग संगीत शिष्यवृत्ती या दोन पुरस्कारांची जोड दिली गेली.

चार-सव्वारपासून रसिकांचे आगमन होण्यास प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या ब्रोशरबरोबरच चाफ्याचे फूल व पेढ्याने रसिकांचे स्वागत केले गेले. ठिक पावणेपाच वाजता श्री.निनाद जोशी आणि श्री.सिद्धार्थ कर्वे या युवा संवादिनी वादकांच्या जुगलबंदी वादनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. या दोघांना श्री.निषाद चिंचोले यांनी तबला साथ केली. तत्पूर्वी , चतुरंग कार्यकर्ती नीलिमा भागवत हिने आपल्या प्रास्ताविकात दरवर्षीच जाणकार- शास्त्रीय संगीतप्रेमी रसिकांचा या उपक्रमाला लाभत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाविषयी सांगून चतुरंगच्या पन्नाशीच्या टप्प्यावर या उपक्रमानेही आपली पंचविशी पार केल्याचे सांगीतले. अर्थात , कलाकारांच्या लाभत असलेल्या आश्वासक पाठबळाचाही या उपक्रमाच्या यशस्वितेत महत्वाचा सहभाग असल्याचे विनयपूर्वक नमूद केले. व्सासपीठावरील कलाकारांच्या पुष्पस्वागतानंतर कार्यक्रमास सुरवात झाली.

संवादिनी जुगलबंदी कलाकारांनी सुरवातीला भिमपलास रागामधील विलंबित रुपकातील बंदीश सादर केल्यावर द्रुत एकतालातील तराणा पेश केला. त्यानंतर ' चलो री माई राम सीया दरसनको ' ही 'श्री' रागातील पारंपरिक बंदीश सादर करुन ' पायोजी मैने राम रतन धन पायो ' या लोकप्रिय भजनाने जुगलबंदी वादनाचा समारोप केला.

 रंगमंचावरील मांडणीतील फेरबदलासाठी दहा मिनिटांचा विश्राम घेऊन पुढील ' चतुरंग संगीत सन्मान व शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्याला ' प्रारंभ झाला. या पुरस्कारांचे , २०२१ सालच्या करोना काळाचा अपवाद करता ,यंदाचे हे १७ वे वर्ष होते. डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजचे माजी प्राचार्य व उच्चविद्याविभूषित शिक्षणतज्ज्ञ प्रा.डॉ.विनय भोळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती या पुरस्कार प्रदान सोहळ्यास लाभली होती. 

 तबला गुरु श्री.प्रवीण करकरे व शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक व तबला वादक पं. चंद्रशेखर वझे आणि ख्यातकीर्त संवादिनी वादक श्री.सुधीर नायक यांच्या निवडसमितीने अमरावती येथील ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका , विदुषी सूरमणी कमलताई भोंडे यांची ' 'चतुरंग संगीत सन्मान ' पुरस्कारासाठी तर बोरीवली (मुंबई) येथील युवा , प्रतिभावान चि.साहिल भोगले याची ' चतुरंग संगीत शिष्यवृत्ती ' साठी निवड केली होती. सर्वप्रथम म्हैसकर फाउंडेशनच्या सर्वैसर्वा श्रीमती सुधाताई म्हैसकर यांनी सर्व कलाकार , रसिकांचे स्वागत करुन एकाचवेळी बुजुर्ग कलाकाराचा सन्मान व युवा कलाकाराला प्रोत्साहन देणा-या या संगीतोत्सवाच्या आयोजनाबद्दल चतुरंगचे आभार मानून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

 निवडसमिती सदस्य पंडित चंद्रशेखर वझे यांनी या संगीत सन्मान व शिष्यवृत्तीसाठीच्या निवडीसंदर्भातील निकष स्पष्ट करुन संगीत सन्मान पुरस्कारासाठी सुयोग्य अशा वैदर्भीय कलाकाराची निवड झाल्याचे सांगीतले. पुरस्कार व शिष्यवृत्तीसाठीची निवड समितीच्या तिघाही सदस्यांच्या एकमताने झाल्याचे सांगीतले. बुजुर्ग कलाकाराचा सन्मान करताना युवा कलाकाराला प्रोत्साहन , पाठबळ देण्याचे काम करत असल्याबद्दल चतुरंग व म्हैसकर फाउंडेशनचे आभार मानले. दोन्हीही पुरस्कारांच्या निवडीसंदर्भाने केवळ मुंबई , पुणे एव्हडेच मर्यादित कार्यक्षेत्र नसून ते संपूर्ण महाराष्ट्र असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रथमच सुयोग्य अशा वैदर्भीय बुजुर्ग कलाकाराची चतुरंग संगीत सन्मानासाठी निवड झाल्याचे सांगून संगीतातील ग्वाल्हेर , जयपूर तसेच किराणा घराण्याच्या गायकीचा सुंदर मिलाफ कमलताईंच्या गाण्यात असल्याचे सांगीतले. पुरस्काराबद्दल कमलताईंचे अभिनंदन करुन युवा साहिल भोगले कडून खूप अपेक्षा असल्याचे सांगून त्याला पुढील सांगीतिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

 कमलताई भोंडे यांनी या पुरस्कारासाठी झालेल्या आपल्या निवडीबद्दल चतुरंग , म्हैसकर फाउंडेशन व निवडसमिती सदस्यांचे आभार मानले. काम करण्याची पद्धत , विनयशील वर्तणूक व आदरातिथ्य याबद्दल कौतुक करुन चतुरंग परिवारास धन्यवाद दिले. एका छान संस्थेशी ऋणानुबंध जुळुन आल्याचा आनंद व्यक्त करुन मिळालेल्या सन्मानधनाचा विदर्भातील कलाकारांसाठी वापर करणार असल्याचे आवर्जून सांगीतले. चि.साहिल भोगले यानेही प्रोत्साहनपर मिळालेल्या शिष्यवृत्तीसाठी आपले गुरु , आई-वडील व चतुरंग प्रतिष्ठान व म्हैसकर फाउंडेशन यांचे मनापासून आभार मानले. सांगीतीक क्षेत्रात अथक मेहेनतीने आपल्या सर्वांच्या अपेक्षानुरुप कामगीरी करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

प्रा.डॉ.विनय भोळे यांनी आज ११ मे या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन केले यामागे निश्चित विचार असावा असे सांगून ११ मे या तारखेचे अनेक दिनविशेष सांगीतले. संगीताची आवड असली तरी मी संगीततज्ज्ञ नाही. त्यामुळे भोंडे ,भोगले यांना पुरस्कार देण्यासाठी मी भोळे म्हणून मला बोलावलं असावं अशी मिश्किल टीपण्णी केली. संगीत हे करिअरच्या दृष्टीने खूप महान क्षेत्र असून येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासविषयक (Academic) क्षेत्रासोबत कलाक्षेत्रांतील करिअरच्या संधीही आता उपलब्ध होणार आहेत. स्वायत्त शैक्षणिक संस्थांमधून या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस सुरवात झालेली असून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय व अनुदानीत शैक्षणिक संस्थातहीया धोरणाची अंमलबजावणी सुरु होणार असल्याचे सांगून Indian Knowledge System (IKS) अधिकाधिक बहुव्याप्त होत असल्याचे प्रतिपादन केले. अनेक कलाक्षेत्रांतील करिअरसाठी उत्तम संधी आहे. आपण १४ विद्या ६४ कला मानतो पण जाहिरात कला ही आता ६५ वी कला समजली जाते. बुजुर्गांच्या सन्मानासोबत कलासक्त युवा पीढीला प्रोत्साहन देणेही आवश्यक असल्याचे सांगून चतुरंग प्रतिष्ठान नेमके हेच कार्य करत आहे आणि म्हैसकर फाउंडेशनच्या माध्यमातून चतुरंगच्या प्रयत्नांना पाठबळ लाभत आहे याचा आनंद आहे व त्याबद्दल चतुरंग व म्हैसकर फाउंडेशन दोघांचेही अभिनंदन व आभार. 

या संपूर्ण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे सूत्रसंचालन चतुरंग कार्यकर्ता प्रवीण खांबल यांनी केले.

या पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर चतुरंग कार्यकर्ते सचिन आठवले यांनी शेवटच्या संगीत मैफिलीपूर्वी या कार्यक्रमासाठी लाभलेल्या सहकार्याच्या सर्व हातांप्रती चतुरंग मनातील ऋणभावनेचा अगत्यपूर्वक उल्लेख केला व प्रतिवर्षीप्रमाणे दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल रसिकांप्रतीही आभार व्यक्त केले.

पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर अर्ध्या तासाच्या मध्यान्तरात रसिकांनी चैत्रपेयाचा आस्वाद घेतला

कार्यक्रमाच्या उत्तरार्धातील शेवटच्या शास्त्रीय संगीत मैफलीचे कलाकार होते ख्यातकीर्त गायक पंडीत राम देशपांडे. पंडितजींना सूरसाथ केली त्यांच्या सौभाग्यवती सौ.अर्चना देशपांडे तसेच पंडितजींचे शिष्य व सुपुत्र श्री.गंधार देशपांडे यांनी. तबला व संवादिनी साथीला होते डोंबिवलीतीलच कलाकार दांपत्य श्री विश्वनाथ व सौ.सीमा शिरोडकर. तानपूरा साथीला होते श्री.ओम देशमुख व श्री.मंदार जोशी.

पंडितजींनी सुरवातीला ' जब ही सब नरपत ' या भूप रागातील (बडा ख्याल) बंदीशीने सुरवात केली. त्यानंतर मध्यलय ख्यालातील ' कैसे रिझाऊ कान्हा ' ही स्वरचित रचना पेश केली. बहार रागातील ' आयो बसंत रितु ' ही देखील स्वरचित बंदीश सादर केल्यानंतर स्वरचित भैरवीनेच मैफिलीची सांगता केली.

चतुरंग कार्यकर्ता चंद्रशेखर देशपांडे यांनी या संगीत मैफिलीचे सूत्रसंचालन केले.

जवळपार दोनेकशे रसिकांनी उत्स्फूर्त प्रतीसादासह यंदाच्या चैत्रपालवी संगीतोत्सवाचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
शनिवार, 11 मे 2024  04:00 PM
ठिकाण
सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली
पत्ता