सवाई एकांकिका :2023 (वर्ष 34 वे)

सवाई एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी (वर्ष 34 वे) प्रतिवर्षीप्रमाणेच बुधवार दि. 25 जानेवारी 2023 या दिवशी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे रात्रौ 8.30 ते पहाटे 6.30 या कालावधीत योजण्यात आली. 

चतुरंगने सवाई एकांकिका आयोजन संदर्भात आणखी दोन नव्या संकल्पना कृतीत आणल्या. एक म्हणजे अंतिम फेरीसाठी प्राथमिक फेरीतून केवळ सातच एकांकिका निवडल्या जातात. निवड न झालेल्या एकांकिकांमधेही अनेकदा लेखन, अभिनय, दिग्दर्शनाचे उत्तम कलागुण असतात. अंतिमसाठी निवड न झाल्यामुळे ते अनेकदा दुर्लक्षिले जातात, बाजूला पडतात. असे होऊ नये म्हणून अंतिमसाठी बाद झालेल्या 20 एकांकिकांमधून यावर्षीपासून लक्षवेधी लक्षणीय पुरस्कार (प्रमाणपत्र स्वरूपात) देण्यास गतवर्षापासून प्रारंभ करण्यात आला. यात लक्षवेधी अभिनेता, लक्षवेधी अभिनेत्री, लक्षवेधी लेखन आणि लक्षवेधी दिग्दर्शनाचे पुरस्कार घोषित करण्यात आले. हे पुरस्कार पुढीलप्रमाणे : लक्षवेधी अभिनेत्री (प्रथम) निकीता घाग - `फ्लाईंग राणी' (कलामंथन, ठाणे), लक्षवेधी अभिनेत्री (द्वितीय) सानिका देवळेकर - `डोक्यात गेलंय्' (सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे),  लक्षवेधी अभिनेता (प्रथम) प्रफुल्ल आचरेकर - `डोन्ट क्विट' (स्वप्नपूर्ती क्रिएशन्स, नवी मुंबई), लक्षवेधी अभिनेता (द्वितीय) सिद्धेश तलाव - भगदाड (स्वामी नाट्यांगण, डोंबिवली), लक्षवेधी लेखक - अभय नवाथे - `जीर्णोद्धार' (अभिनय, कल्याण), लक्षवेधी दिग्दर्शक - अमित पाटील - काहीतरी अडकलय् (गुरुनानक खालसा महाविद्यालय, मुंबई) ही पारितोषिके प्राथमिक फेरीच्या दिवशीच देण्यात आली. सवाई एकांकिका स्पर्धेच्या आयोजनातील दुसरी नव संकल्पना म्हणजे सवाई पुरस्कारांच्या शब्दरचनेत कायमस्वरूप स्मृतीचिन्हे नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तीमत्वांचे स्मरण म्हणून त्यांच्या नावे देण्यास प्रारंभ झाला. सवाई एकांकिका अंतिम फेरीचे परीक्षण श्री. दिग्पाल लांजेकर, श्री दीपक करंजीकर आणि विभावरी देशपांडे या तिघांनी केले. 

            यावर्षीची सवाई पारितोषिकांसाठी घोषित झालेला निकाल पुढीलप्रमाणे होता. रोख रुपये 5000/- आणि प्रशस्तीपत्र असलेले प्रेक्षक पारितोषिक, (महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई) `बारम' या एकांकिकेस मिळाले. ते चतुरंग हितचिंतक श्री. सुयश पटवर्धन (CFO, Infinite Up time) यांच्या हस्ते देण्यात आले. सवाई नेपथ्यकाराच्या पारितोषिकासाठी `बारम' (महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई)  या एकांकिकेतील दर्शन आबनावे व यश पवार यांचे नाव घोषित झाले. दिग्गज नेपथ्यकार रघुवीर तळाशिलकर स्मृतिचिन्ह, रोख रुपये 5000/- आणि प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप होते. हे पारितोषिक चिपळूणमधील बांधकाम व्यावसायिक श्री. समिर ताम्हाणे यांच्या हस्ते देण्यात आले. सवाई ध्वनिसंयोजक म्हणून `बारम' (महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई) या एकांकिकेतील शुभम ढेकळे यांचे नाव घोषित झाले. अरुण काकडे स्मृतिचिन्ह, रोख रुपये 5000/- आणि प्रमाणपत्र अशा स्वरूपातील हे पारितोषिक, श्री. शैलेश सोळंकी यांच्या हस्ते देण्यात आले. सवाई प्रकाशयोजनाकाराचे पारितोषिक `तहान' कलामंथन, ठाणे) या एकांकिकेच्या सिद्धेश नांदलस्कर यांना प्राप्त झाले. राघु बंगेरा स्मृतिचिन्ह, रोख रुपये 5000/-चे प्रफुल्ला डहाणूकर स्मृतिपारितोषिक आणि प्रमाणपत्र, गिर्यारोहक आणि चतुरंग मित्र श्री. हृषिकेश यादव यांच्या हस्ते देण्यात आले. सवाई अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी `उकळी' (कीर्ती एम. डुंगुरसी महाविद्यालय, मुंबई) मधील ईशिका शिशुपाल हिचे नाव घोषित करण्यात आले. रिमा लागू स्मृतिचिन्ह, रोख रुपये 5000/- चे भक्ती बर्वे स्मृतिपारितोषिक आणि प्रमाणपत्र, हास्यजत्रा मालिकेतील अभिनेत्री रसिका वेगुर्लेकर यांच्या हस्ते देण्यात आले. सवाई अभिनेता म्हणून `लेखकाचा कुत्रा' (मिलाप थिएटर टुगेदर, पुणे) या एकांकिकेतील प्रणव जोशी यांचे नांव घोषित झाले. विनय आपटे स्मृतिचिन्ह, रोख रुपये 5000/-चे गणेश सोळंकी स्मृतिपारितोषिक आणि प्रमाणपत्र, प्रशासकीय अधिकारी श्री. अभिजित घोरपडे यांच्या हस्ते देण्यात आले. सवाई दिग्दर्शकाचा मान `बारम' (महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई) या एकांकिकेच्या यश पवार आणि हृषिकेश मोहिते यांना मिळाला. सत्यदेव दुबे स्मृतिचिन्ह, रोख रुपये 5000/-चे पुरूषोत्तम दारव्हेकर स्मृतिपारितोषिक आणि प्रमाणपत्र, या वर्षीचे परीक्षक श्री. दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते देण्यात आले. सवाई लेखक म्हणून `उकळी' (कीर्ती एम. डुंगुरसी महाविद्यालय, मुंबई) या एकांकिकेच्या चैतन्य सरदेशपांडे यांचे नाव घोषित करण्यात आले. वसंत कानेटकर स्मृतिचिन्ह, रोख रुपये 5000/-चे व.पु. काळे स्मृतिपारितोषिक व प्रमाणपत्र, या वर्षीचे परीक्षक श्री. दीपक करंजीकर यांच्या हस्ते देण्यात आले. सवाई एकांकिका द्वितीयचा मान `उकळी' (कीर्ती एम. डुंगुरसी महाविद्यालय, मुंबई) या एकांकिकेला मिळाला. प्रभाकर पणशीकर स्मृतिचिन्ह, रोख रुपये 20,000/- चे विनोद हडप स्मृतिपारितोषिक आणि प्रमाणपत्र, हा पुरस्कार या वर्षीच्या परीक्षक विभावरी देशपांडे यांच्या हस्ते देण्यात आला. सवाई एकांकिका प्रथम म्हणून `बारम' (महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई) या एकांकिकेचे नाव घोषित करण्यात आले. त्यांना तात्यासाहेब शिरवाडकर स्मृतिचिन्ह, रोख रुपये 25000/- गणेश सोळंकी स्मृतिपारितोषिक आणि प्रमाणपत्र, एन.एस.डी.चे निवृत्त संचालक, दिग्दर्शक श्री. वामन केंद्रे यांच्या हस्ते देण्यात आले. 

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
बुधवार, 25 Jan 2023  08:30 PM
ठिकाण
रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी
पत्ता
रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी