चतुरंग म्हणजे...

चतुरंग म्हणजे काय? असं कुणी विचारलं तर नेमकं काय सांगायचं, असा प्रश्न केवळ इतरांनाच नव्हे तर 50व्या वर्षात प्रवेश करणा-या खुद्द चतुरंगलाही पडतो. स्पष्टपणे एक जाणवतं की `चतुरंग’ हे संस्थेचं नाव नसून ते एका वृत्तीचं नाव आहे. मग काय आहे ही चतुरंग वृत्ती ? तर सर्वांनी सातत्याने, नियमितपणे एकत्र यावं. चांगल्या गोष्टींचा एकत्रितपणे आस्वाद घ्यावा. कलानंद घ्यावा. आपणच घ्यावा असं नव्हे तर इतरांनाही त्यात सहभागी करून घ्यावं. जगात जे जे काही उत्तम, उदात्त आहे, त्याचा सन्मान करीत ते जगासमोर ठेवत जावं आणि दुसरीकडे आपण स्वत आंतरिक समृद्ध होत जावं ! आपला सभोवतालही समृद्ध करण्याचा नेटाने प्रयत्न करीत राहावा. तर अशी साधी सरळ सोपी विचारसरणी जपत-जोपासत चतुरंगचा पसारा मुंबई-डोंबिवली-पुणे-चिपळूण-रत्नागिरी करीत अगदी गोव्यापर्यंत पसरलाय ! कार्यकर्ते चाराचे चाळीस, चाळीसचे एकशे चाळीस.... असे वाढत राहिलेत. चतुरंग विचार पटलेले टिकले, न पटलेले दूर गेले... पण संख्यात्मक आणि गुणात्मक संस्था-आलेख चढताच राहिला. चतुरंगचे कार्य आणि विचारसरणी पटणारी काही उद्योगपती, कलावंत, विचारवंत, साहित्यिक मंडळी ही संस्थेची हितचिंतक, मार्गदर्शक, सल्लागार आणि सहकारी या विविध भूमिकांतून संस्थेला लाभत राहिली आणि `असे सारेजण’ हेच चतुरंगचे बलस्थान ठरले.

उद्देश :

  • सांस्कृतिक क्षेत्रात लक्षणीय उपाम
  • कोकणखेड्यातील शाळांसाठी शैक्षणिक उपाम
  • सांस्कृतिक तोंडावळ्याचे सामाजिक काम

मार्गदर्शन :

  • चतुरंगचे मास्तर स्व. गणेश सोळंकी यांनी दिलेली दिशा
  • नाविन्याची कास धरून उपामात सातत्य राखा.
  • काहीतरी `वेगळे' करून दाखवा.
  • स्वतची नवीन पायवाट तयार करा.

वैशिष्ट्ये :

  • वर्षभरातल्या 35-40 कार्यक्रमांपैकी सुमारे 80 टक्के विनामूल्य प्रवेशतत्वावर होतात.
  • संस्थेत कोणतेही पदाधिकार नाहीत (अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस, खजिनदार)
  • काम करेल तो कार्यकर्ता ही `कार्यकर्तेपणा'ची व्याख्या
  • वय वर्षे 18 ते 80 अशा वयोगटातील सुमारे 150 कार्यकर्ते कार्यरत
  • कार्यकर्त्यांकडून कोणतीही फी-वर्गणी नाही, सभासदत्व नाही.
  • दर दोन वर्षांनी नवीन गणवेश, कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने शिवायचा असतो.
  • कोणतेही सरकारी आर्थिक अनुदान नाही. स्वत:च्याच सांस्कृतिक कार्यक्रमातून उभारलेल्या निधीचा विनियोग शैक्षणिक, सामाजिक उद्दिष्टांसाठी केला जातो.
  • प्रत्येक डिसेंबर महिन्यात, पुढच्या वर्षभराचे तारीखवार कार्यक्रम जाहीर केले जातात.
  • वर्षात साकारलेल्या विविध उपक्रमांची संख्या 61
  • 49 वर्षात साकार झालेल्या कार्यक्रमांची संख्या सुमारे 1800
  • कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या विविध क्षेत्रातील मान्यवर-मातब्बरांची संख्या सुमारे 1100
  • कार्यक्रमांसाठी आजवर वापरलेल्या जागांची / स्थळांची संख्या 212

चतुरंग बलस्थाने :

  • कलाकार - मान्यवरांचा उदंड लोभ !
  • रसिकांचा अखंड पाठींबा !
  • प्रयत्नवादी प्रामाणिक कार्यकर्ते !