सप्त चक्रांचे गाणे निरुपण आणि सांगितीक अनुभूती : 2023
सप्त चक्रांचे गाणे
निरुपण आणि सांगितीक अनुभूती
चतुरंग प्रतिष्ठान व भारत विकास परिषद (भाविप) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार , दि.८ अॉक्टोबर २०२३ रोजी डोंबिवली पूर्वेतील शास्त्री हॉल येथे सप्त चक्रांचे गाणे - निरुपण आणि सांगीतिक अनुभूती या अगदी आगळ्या वेगळ्या विषयावरचा कार्यक्रम सायंकाळी ६ll ते ८ll या वेळात रसिकांच्या हाऊसफुल्ल गर्दीत व उत्स्फूर्त प्रतिसादात दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या पदरात समाधानाची धन टाकून संपंन्न झाला. चतुरंग प्रतिष्ठानच्या स्थापनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि भाविपच्या डोंबिवली शाखा स्थापनेचे रौप्यमहोत्सवी वर्ष अशी सोनेरी - चंदेरी किनार या कार्यक्रमाला लाभली होती हे या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य ! शरीरशास्त्रानुसार देहातील विविध अवयवांचे चलनवलन मज्जासंस्थेतील विशिष्ट पेशींद्वारा होत असते. शरीरातील सर्व भागांकडे संदेश पाठविणेआणि ज्ञानेंद्रियांकडून आलेले संदेश ग्रहण करुन मेंदूकडे संक्रमित करणे हे चेतासंस्थेचे किंवा मज्जासंस्थेचे महत्वाचे कार्य. डोळे, कान , नाक , जीभ आणि त्वचा या पाच ज्ञानेंद्रायांखेरीज मन हे सुद्धा सहावे ज्ञानेंद्रिय मानले जाते. मन हे हृदयात किंवा मेंदूत असते असा सर्वसामान्यपणे म्हटले - मानले जाते. तथापि , मन हे मानवी शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असते असे प्रतिपादन डॉ.पाटणकर यांनी केले. योगशास्त्रानुसार मानवी शरीर आणि मनाचा योग्य संयोग साधण्यासाठी प्राण किंवा उर्जेचा अवलंब केला जातो. शरीर व मनाचे संतुलन साधण्यासाठी सात योगिक चक्रे मानवी शरीरात अखंड कार्यरत असतात. ज्याप्रमाणे भौतिक देहात वेगवेगळे अवयव असतात त्याचप्रमाणे उर्जा देहात ही चक्रे असतात आणि शारीरिक व मानसिक क्रियांसाठी आवश्यक उर्जा पुरविण्याचे कार्य ही चक्रे अविरत करीत असतात आणि म्हणूनच यांना उर्जा केंद्रे असेही संबोधीले जाते. या उर्जा केंद्रांवरच मानवाची शारीरिक , बौद्धिक , मानसिक व आध्यात्मिक प्रगती अवलंबून असते. कमरेपासून डोक्यापर्यंत स्थित असलेली ही सप्तचक्रे म्हणजे १) मूलाधार चक्र २) स्वाधिष्ठान चक्र ३) मणिपूर चक्र ४) अनाहत चक्र ५) विशुद्धी चक्र ६) आज्ञा चक्र आणि ७) सहस्रार चक्र. इडा , पिंगला व सुशुम्ना या मुख्य नाड्यांनी ही चक्रे एकमेकांशी जोडलेली असतात. वातावरणातून प्राणशक्ती आत्मसात करुन ती स्थूल आणि सूक्ष्म देहास पुरविण्याचे कार्य ही चक्रे करीत असतात. मानवी शरीरातील अंतस्रावी ग्रंथींच्या (Indocrine Glands) स्थानी उर्जा चक्रांची योजना निसर्गतः केलेली दिसून येते. या चक्रांच्या कार्यप्रणालीत निर्माण झालेला दोष किंवा असंतुलन शरीर आणि मन या दोघांवर परिणाम करत असते. तसेच त्यांच्या कार्यातील संतुलनाद्वारे सर्वसमावेशक आरोग्य मानवाला प्राप्त करता येते असे मानले जाते.
या सप्तचक्रांविषयीचे साद्यंत विवेचन, या चक्रांच्या संतुलनामुळे शरीर-मनास होणारे लाभ व त्यांच्या कार्यातील बिघाडामुळे शरीरात उद्भवणा-या व्याधी व मनोविकार याबाबतचे डॉ.नितीन पाटणकर यांचे द्वारा विस्तृत विवेचन आणि संगीत अभ्यासक व गायिका डॉ. उत्तरा चौसाळकर यांचेद्वारा प्रत्येक चक्राला असलेल्या मंत्राच्या शास्त्रशुद्ध उच्चारणाची अनुभूती ही या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना.
चतुरंगच्या कार्यकर्त्या नीलिमा भागवत यांनी व्सापीठावरील मान्यवरांचे व उपस्थितीत रसिकांच्या केलेल्या शब्दस्वागताने ठिक साडेसहा वाजता कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर डॉ.नितीन पाटणकर , डॉ.सौ. उत्तरा चौसाळकर आणि चतुरंग प्रतिष्ठान व भाविपच्या प्रत्येकी दोन कार्यकर्त्यांनी दीप प्रज्वलन व भारतमाता तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन केले. भावीपच्या कार्यकर्त्या सौ.अनुराधा केळकर यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर केल्यानंतर कार्यक्रमास सुरवात झाली.
भारतीय विकास परिषद व चतुरंग प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांचा परिचय भाविपचे कार्यकर्ते श्री.सचिन केळकर यांनी करुन दिला. त्यानंतर भाविपच्या डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा अॕडव्हेकेट सौ.वृंदा कुलकर्णी यांनी व्यासपीठावर स्थानापन्न , एम.डी. (मेडीसीन) असलेले मधुमेह तज्ज्ञ , व्यावसायिक समुपदेशक आणि योग व संगीतोपचार तज्ज्ञ डॉ.नितीन पाटणकर तसेच उच्चविद्याविभूषित संगीत अभ्यासक , गायिका आणि गानहिरा उपाधीने सन्मानित डॉ.उत्तरा चौसाळकर व डॉ.पाटणकर यांच्या कन्या व गायिका कु.वेदश्री पाटणकर यांचा परिचय उपस्थित रसिकांना करुन देऊन डॉ.पाटणकरांना आपल्या विवेचनास आरंभ करण्याची विनंती केली.
सुरवातीस कार्यक्रम सादर करण्याची संधी दिल्याबद्दल डॉ.पाटणकर यांनी भाविप व चतुरंग संस्थेप्रती आभार व्यक्त केले.
नित्यं शुद्धं निराभासं
निराकारं निरंजनम l
नित्य बोध चिदानन्दं
गुरुब्रम्ह नमाम्यहम ll
या गुरुवंदनेने कार्यक्रमास सुरवात करुन ८ अॉक्टोबर या जगभरातील मानसिक व शारीरिक आरोग्यदिनी या विषयासंदर्भात कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
सप्तचक्राविषयी विवेचनास सुरवात करताना या चक्रांविषयी शास्त्राधार नसला तरी उपनिषदे ,घेरंड संहीता व ज्ञानेश्वरीतही या चक्रांविषयी उल्लेख असल्याचे स्पष्ट केले. शरीरातील सात ठिकाणी स्थित असलेल्या या चक्रांबाबत त्यांनी खालीलप्रमाणे विवेचन केले -
१ ) मूलाधार चक्र :
मूलाधार चक्र मेरुदंडाच्या (स्पायनल कॉर्ड) तळाशी असते. या चक्राचा रंग लाल असून स्थिरता हाचा सूक्ष्म गुणधर्म असतो. शारीरिक व मानसिक कार्यक्षमता या चक्रावर अवलंबून असते. नवीन पेशींची निर्मिती , मल उत्सर्जन ही महत्वाची शारीरिक कार्ये तर सदसद विवेक व तर्कसंगत विचार ही मानसिक कार्ये या चक्राच्या अधिपत्याखाली येतात. मूलाधार चक्र हे अंतःस्फूर्तीचे केंद्र आहे. हे शरीरातील आधारचक्र असून पृथ्वीतत्वाचे कारक आहे. या चक्रामुळे शरीरातील मज्जासंस्था कार्यरत राहते.
या चक्राच्या कार्यशैलीत बिघाड झाल्यास पाठ-कंबर-गुडगेदुखी , संधीवात , स्पॉन्डीलायटीस , अशक्तपणा इत्यादी शारीरिक व्याधी तर नैराश्य , चंचल स्वभाव , निर्णय क्षमतेचा आभाव , निद्रानाश , अव्यवहारी वृत्ती अशा मानसिक व्याधींचा उद्भव होऊ शकतो.
ज्यांचे मूलाधार चक्र सक्षम असते त्या व्यक्ती निर्णयक्षम व व्यवहारी असतात. आपले विचार मांडण्याची हातोटी , धाडसी व क्षमाशील वृत्ती या चक्रातील स्थिर शक्तीमुळे मानवाला लाभत असते.
या चक्राचा मंत्र लम असा आहे.
२ ) स्वाधिष्ठान चक्र :
हे चक्र नाभीच्या खाली लिंगस्थानाजवळ असते. याचा रंग नारिंगी असून हे चक्र जलतत्वाचे कारक आहे. प्रवाहिता हा या चक्राचा सूक्ष्म गुणधर्म आहे. या चक्रामुळे शरीरातील प्रजनन संस्था कार्यरत राहते. प्रत्येक व्यक्तितील ' स्व ' चे अधिष्ठान या चक्रात असते. स्वाधिष्ठान चक्र हे कामभावनेच्या स्फूर्तीचे केंद्र आहे. नवनिर्मितीचे कार्य या चक्राच्या अधीपत्याखाली येते. मानसिक विकासासाठी हे महत्वपूर्ण चक्र आहे.
या चक्राचे संतुलन बिघडल्यास लैंगिक दोष , प्रोस्टेट ग्रंथिंची वाढ , जननेंद्रियांचे विकार , मूत्राशयाचे विकार , मूत्रपिंडांचे विकार अशा शारीरिक व्याधी उद्भवू शकतात तर मतिमंदत्व , कामवासनांवर अनियंत्रण , संशयी व हेकेखोर स्वभाव , असे मनोविकार निर्माण होऊ शकतात.
ज्या व्यक्तिंचे स्वाधिष्ठान चक्र संतुलित असते त्या व्यक्ती मनमिळावू , प्रेमळ व कल्पक असतात.
या चक्राचा मंत्र वम् असा आहे.
३ ) मणिपूर चक्र :
हे चक्र नाभीवर असते. याचा रंग नारिंगी -पिवळा असतो. हे चक्र अग्नितत्वाचे कारक असून उष्णता हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. या चक्रामुळे शरीरातील पचनसंस्था कार्यरत राहते. खाल्लेल्याआन्नाचे रुपांतर आवश्यक उर्जेत करण्याचे कार्य मणिपूर चक्र करते. मणिपूर चक्र हे जाणीवांचे केंद्र आहे. परिस्थितीनुरुप वर्तन हा याचा गुण आहे.
मणिपूर चक्राच्या कार्यात दोष निर्माण झाल्यास पचनाचे विकार , पित्त ,मूळव्याध , मधुमेह , अन्नपदार्थांची अॕलर्जी , अल्सर इत्यादी रारीरिक व्याधी तर चैतन्याचा आभाव , गोंधळलेली मनोवस्था असे मानसिक विकार उद्भवू शकतात.
ज्या व्यक्तींचे मणिपूर चक्र सक्षम असते अशा व्यक्ती कर्तृत्ववान असतात.
या चक्राचा मंत्र -हम असा आहे.
४ ) अनाहत चक्र :
अनाहत चक्र छातीच्या मध्यभागी म्हणजे हृदयाजवळ असते म्हणून याला ' हृदयचक्र ' असेही म्हटले जाते. याचा रंग हिरवा आहे. हे वायू तत्वाचे कारक असून गतिशीलता हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. हृदय , फुप्फुस या अत्यंत महत्वाच्या अवयवांवर या चक्राचे नियंत्रण असते. श्वासोच्छवास व रक्ताभिसरण ही महत्वाची कार्ये अनाहत चक्राच्या अधिपत्याखाली येतात. हे चक्र म्हणजे भाव-भावनांचे केंद्र आहे.
या चक्राच्या कार्यप्रणालीमध्ये दोष निर्माण झाल्यास हृदयविकार , दमा , न्युमोनिया , क्षयरोग , फुप्फुसांचे विकार इत्यादी शारीरिक व्याधी जडू शकतात.
तसेच या चक्राच्या आसंतुलनामुळे स्वयंकेंद्रित , एकलकोंडा स्वभाव , स्वार्थी व निर्दयी स्वभाव , लोभी वृत्ती , काल्पनिक भिती अशा मानसिक व्याधींचा होऊ सामना करावा लागू शकतो.
ज्या व्यक्तींचे अनाहत चक्र तंदुरुस्त असते त्या व्यक्ती स्वार्थ व परमार्थ यांचा समतोल राखू शकतात.
या चक्राचा मंत्र ड. असा आहे.
५ ) विशुद्धी चक्र :
विशुद्धी चक्र कंठस्थानी असते. याचा रंग निळा असतो. हे चक्र आकाश तत्वाचे कारक असून आकारमान हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. श्वासनलिका , थायरॉईड ग्रंथी यावर नियंत्रण ठेवणे हे या चक्राचे प्रमुख कार्य आहे. विशुद्धी केंद्र हे उच्च निर्मितीचे केंद्र आहे.
या चक्रातील कार्यात दोष निर्माण झाल्यास घशाचे विकार , टॉन्सिलायटीस , थायरॉईड ग्ंथीमधील दोष इत्यादी व्याधी निर्माण होऊ शकतात तर अकारण चिंता करण्याचा स्वभाव, चिडचिड , संभ्रमावस्था अशा मानसिक व्याधी निर्माण होऊ शकतात.
ज्या व्यक्तींचे विशुद्धी चक्र संतुलीत असते त्या व्यक्ती कलाकार , शिक्षक , यशस्वी राजकारणी , व्यावसायिक , उद्योजक असू शकतात.
६ ) आज्ञा चक्र :
आज्ञा चक्र भ्रूमध्य म्हणजेच दोन भुवयांच्या मधे असते. याचा रंग ओलसर निळा किंवा फिक्कट जांभळा असतो. मानसशक्ती , इच्छाशक्तीचे हे केंद्र आहे. मेंदू , डोळे , कान या अवयवांवर या चक्राचे नियंत्रण असते. माणसाचे विचार हे आज्ञा चक्रावर अवलंबून असतात. प्रबळ इच्छाशक्ती हा या चक्राचा सूक्ष्म गुणधर्म आहे.
जेंव्हा या चक्राच्या कार्यात दोष निर्माण होतात तेंव्हा कॕन्सर , पार्किन्सस , फिटस् ,गतिमंदत्व ,पक्षाघात , अल्झायमर , डिमेन्शिया , मोतीबिंदू , काचबिंदू इत्यादी शारीरिक व्याधींचा त्रास होऊ शकतो. त्याच प्रमाणे
मानसिक ताण-तणाव , नैराश्य , निरुत्साह अशा मानसिक व्याधी निर्माण होऊ शकतात.
आज्ञाचक्र सक्षम असणा-या व्यक्ती दृढ निश्चयी , कणखर व ठरविलेल्या गोष्टी तडीस नेणा-या असतात.
या चक्राचा मंत्र क्षम असा आहे.
७ ) सहस्रार चक्र :
सहस्रार चक्र हे ब्रह्मरंध्र म्हणजेच टाळूवर असते. हे प्राणशक्तींचे प्रवेश केंद्र आहे. याचा रंग जांभळा असतो. या चक्राकडे मेंदूचे नियंत्रण असते. सहस्रार केंद्र हे ब्रह्मजागृतीचे केंद्र असून परमात्म्याचे , परमतत्वाचे ज्ञान येथे होत असते. अनुभूती , साक्षात्कार या चक्रामुळे घडतात.
या चक्राच्या कार्यातील बिघाडामुळे मेंदूशी संबंधीत व्याधी उद्भवू शकतात तसेच
मनःशांतीचा आभाव , असमाधानी वृत्ती अशा मानसिक विकारांचाही सामना करावा लागू शकतो.
ज्या व्यक्तींचे सहस्रार चक्र सक्षम असते त्या व्यक्ती परोपकारी , आत्मज्ञानी अशा असतात.
प्रत्येक चक्राचे अशा प्रकारे विवेचन केल्यावर त्या त्या चक्राच्या मंत्रांचे उच्चारण करत असताना चौसाळकर मॕडमनी उपस्थित रसिकांनाही सहभागी करुन घेतले. रसिकांनीही उत्स्फूर्त दाद देऊन मंत्रोच्चारणात सहभाग दिला.
सर्व चक्रांच्या विवेचनानंतर चतुरंग प्रतिष्ठानच्या कु.नीलिमा भागवत यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मदत केलेल्या सहकारी हातांप्रती दोन्ही संस्थांतर्फे ऋणभावना व्यक्त केल्या व त्या नंतर कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
जवळपास तिनेकशे रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. दोन्ही संस्थांच्या प्रत्येकी १४-१५ कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग दिला.