" संस्कृतीचे भान राखत, जतन करत भारताला विश्वगुरू व्हायचे आहे " चतुरंग मुक्तसंध्येत शरद पोंक्षेंचे प्रतिपादन
चतुरंग प्रतिष्ठान तर्फे आयोजित स्वातंत्र्याचे पूर्वरंग उपक्रमात प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि वक्ते शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाला रत्नागिरीकर रसिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. रत्नागिरी(जिल्हा) नगरवाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 'भारताचे स्वातंत्र्य - काल, आज आणि उद्या ' अशा विषयावर बोलताना शरद जींनी अनेक दाखले देत स्वातंत्र्य विषयाची संकल्पना उलगडून सांगितल्या. व्याख्यानाच्या सुरुवातीलाच संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असे चांद्रयान - ३ चे लँडिंग पाहण्याची संधी उपस्थितांना एकत्रपणे अनुभवता आल्यामुळे देश प्रेरणेच्या व्याख्यानाला सुंदर अशी पार्श्वभूमी तयार झाली होती.
नगर वाचनालयाचे सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरले होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. ॲड. दीपक पटवर्धन यांनी शरद पोंक्षे यांचे गुलाबपुष्प आणि 'अभिमानमूर्ती अटलजी' हे पुस्तक देऊन स्वागत केले. त्यानंतर, शरद पोंक्षे यांनी आपल्या व्याख्यानाला सुरूवात केली. श्री. पोंक्षे यांनी आपल्या व्याख्यानात भारताच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, नालंदा विद्यापीठ हे जगातील सर्वात प्राचीन व मोठे विद्यापीठ होते. या विद्यापीठात जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत. खिलजीने या विद्यापीठावर आक्रमण करून ते पेटवून दिले. यामुळे भारताची मोठी संस्कृती नष्ट झाली. मुघलांच्या काळातील भारताबद्दलही बोलले. त्यांनी सांगितले की, मुघलांनी भारतात अनेक वाडे, इमारती बांधल्या. परंतु, त्यांनी त्यांच्या देशात असे काही केले नाही. भारतात बांधलेल्या इमारतींचे कारागिर भारतीयच होते. हिंदू धर्मातील काही वैशिष्ट्यांबद्दलही ते बोलले. त्यांनी सांगितले की, हिंदू धर्मात १०० टक्के नास्तिक होण्याची अनुमती आहे. यापेक्षा आणखी कोणती सवलत असली पाहिजे ?
ब्रिटिशांच्या काळात भारतात झालेल्या बदलांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, ब्रिटिशांनी भारतावर राज्य करताना भारतीयांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला. तशी शिक्षणपद्धती आणली, संस्कृत भाषा हद्दपार केली आणि भारतीयांनी वेद वाचणे बंद केले.
शरदजी भारतीय स्वातंत्र्याच्या भविष्यकाळाबद्दलही बोलले. आव्हाने आणि संधी अशा दोन्ही गोष्टींतून मार्गक्रमण करत पुढे जाऊन भारताला महासत्ता नव्हे तर विश्र्वगुरू ह्यायचे आहे असे आवाहन त्यांनी केले. श्री. पोंक्षे यांनी आपल्या व्याख्यानातून भारताला एक संदेश दिला. त्यांनी सांगितले की, भारताला पुन्हा एक महान देश बनण्यासाठी आपल्याला आपल्या वैभवशाली इतिहासाची ओळख करून घ्यावी लागेल. आपल्याला आपल्या संस्कृतीचे रक्षण करावे लागेल आणि भारतीयत्वाचा अभिमान बाळगावा लागेल.
श्रोत्यांना भारताच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल बरेच काही नव्याने जाणून घ्यायची संधी मिळाली. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् ने झाली. चांद्रयान-३ यशस्वी होण्याच्या निमित्ताचा आनंद व्यक्त करण्यासाठी पेढा खाऊन सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.