दिवाळी पहाट : भीमसेनी संतवाणी

चतुरंग संस्थेचे पन्नासावे सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि दिवाळी पहाट ही संकल्पना मुळात ज्यांच्या मुळे अस्तित्वात आली त्या चतुरंग संस्थेच्या दिवाळी पहाट उपक्रमाचे हे 38व वर्ष. हा सुंदर योग साधत, नवं पालटलेले रूप घेऊन दिमाखात उभ्या राहिलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आज पहाटे पंडित उपेंद्र भट यांच्या सुस्वर स्वर मनात साठवत दिवाळीचा पहिला दिवस... समस्त चिपळूणकर रसिकांनी साजरा केला. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा परिसर आकाशकंदील.. रांगोळ्या.. पणत्या... यांनी सुंदर सजला होता. रंगावलीकार संतोष केतकर यांनी रांगोळीतून रेखाटलेले भीमसेनजी जोशी ... मंद अत्तराचा सुवास आणि भरजरी कपडे परिधान करून आलेले चिपळूणकर रसिक यांच्या उपस्थितीत भीमसेनी संतवाणी ही मैफील सादर झाली. पंडित. भीमसेन जोशींनी गायलेल्या अभंगांचे सादरीकरण त्यांचेच शिष्य पंडित उपेंद्रजी भट यांनी वयाच्या 75व्यां वर्षीही अतिशय दमदारपणे केले. किराणा घराण्यातील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गायक असलेल्या पंडितजींना गायन साथ त्यांचेच शिष्य थत्ते आणि भाट्ये या युवा गायकांनी केली. दिवाळी पहाट साठी आलेल्या या कलावंतांचे स्वागत सुरुवातीला, कार्यक्रमासाठी खास खेडहून आलेल्या प्रांताधिकारी सौ. राजश्री मोरेमॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. पंडितजींना वरद सोहनी यांनी हार्मोनियम...तर राजगोपाल गोसावी यांची तबला... गणेश चाकणकर पखवाज ... सुश्रुत चितळे यांनी तालवाद्य अशी उत्तम साथ संगत लाभलं. या मैफिलीत सर्वात लक्ष वेधून घेत होते ते रंगमंचावरील नेपथ्य. पणत्या... आकाशकंदील याबरोबरच संतोष केतकर यांनी backdrop ला यथोचित अशी पार्श्वभूमी साकारली होती. पहाटेची उगवत्या सूर्याची किरणे आणि आकाशातून आशीर्वाद देणारे... आपल्या शिष्याची गाणी तन्मयतेने ऐकणारे पंडित भीमसेन जी ...एक देखणा रंगांचा आविष्कार संतोष केतकर यांनी साकारला होता. संगमेश्वर चे निबंध कानिटकर यांनी आपल्या निवेदन.. निरुपणातून भीमसेन जी...लता दीदी... यांच्या आठवणी आणि अभंगाचा अर्थ सुंदर रीतीने उलगडून दाखवला. इतकेच नव्हे तर पंडित उपेंद्रजीनी ही त्यांच्या आणि भीमसेन जोशींच्या आठवणी सांगितल्या. राम रंगी रंगले... इंद्रायणी काठी... अयोध्येचा राजा...तीर्थ विठ्ठल.. बाजे रे मुरलिया.... माझे माहेर पंढरी असे अनेक अभंग ऐकताना पदोपदी भीमसेन जींचा भास होत होता. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा या कन्नड भजनाने तर रसिकांची मन जिंकली. मैफिलीची सुरूवात या देवी सर्व भुतेशू शांती rupen संस्थिता या देवीच्या स्त्रोत्राने झाली. तर सांगता जो भजे हरिको सदा ही भैरवी आणि मिले सुर मेरा तुम्हारा या गीताने झाली. भारतरत्न पंडित भीमसेन जोशींचे पट्टशिष्य म्हणुन ओळखले जाणारे उपेंद्र भट यांचे संगीत विश्वातील योगदान प्रचंड मोलाचे आहे. शास्त्रीय संगीत या बरोबरच भावगीत... संतवाणी.. चित्रपट गीत... नाट्यगीत यावर त्यांचे प्रभुत्व आहे. देशविदेशात त्यांच्या संगीत साधनेचा पुरस्कार देवून गौरव झाला. अर्थात प. भीमसेन जीनी दिलेला संगीत साधनेचा वारसा ते अत्यंत निगुतीने जपतात. या मैफिली च्या निमित्ताने दरवर्षी देण्यात येणारी चतुरंग ची भाऊबीज भेट चिपळूण जवळील गाणे गावातील लीलावती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वृद्धाश्रमाला चिपळूण चे मुख्याधिकारी प्रसाद जी शिंगटे यांच्या शुभ हस्ते देण्यात आली. चतुरंग च्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त चतुरंग ने दिवाळी पहाट या उपक्रमाच्या सादरीकरणात घेतलेले सुंदर वळण म्हणजे यावर्षी चार वेगवेगळ्या वृद्धाश्रमात.. महीलाश्रमात खास तेथील आश्रमवासियांसाठी केलेले आणखीन चार दिवाळी पहाट मैफिलींचे आयोजन. या नवसंकल्पाचा प्रारंभ शुभस्य शिघ्रम म्हणुन यंदाच कै. अप्पासाहेब बेहेरे ज्येष्ठ निवास खराडी पुणे... आरती फाउंडेशन पेढे परशुराम, चिपळूण... स्नेह मंदिर वृध्दाश्रम बांदीवडे गोवा आणि संजीवन महिला श्रम नागेशी गोवा या चार ठिकाणी संपन्न होतोय. दही पोह्यांचा आस्वाद घेत रसिक तृप्त झाले. या कार्यक्रमाला डॉ रत्नाकर घाणेकर...डॉ रीळकर .. डॉ मीनल थत्ते.. डॉ प्रशांत पटवर्धन... असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
शनिवार, 11 नवेंबर 2023  06:00 AM
ठिकाण
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र,चिपळूण
पत्ता