चला, आता तुमची पाळी..
दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी चिपळूण येथील डी.बी.जे.महाविद्यालयातील दृकश्राव्य सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता महाविद्यालय आणि चतुरंग प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने 'श्रवणानंद' या चतुरंग प्रतिष्ठानच्या उपक्रमांतर्गत प्रख्यात अभिनेते आणि अभ्यासक वक्ते श्री शरद पोंक्षे यांचे 'चला, आता तुमची पाळी..' या शीर्षकाखाली खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. बापट सर आणि संस्था संचालक श्री. चितळे यांनी श्री. शरद पोंक्षे यांचे स्वागत केले. चतुरंग कार्यकर्ती योगिता पाध्ये हिने कार्यक्रमाचे निवेदन केले.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या जाणत्या तरुण पिढीशी संवाद साधण्यासाठी ,त्यांना राष्ट्रीय कार्य करण्याची प्रेरणा देण्यासाठी, श्री. पोंक्षे यांनी अत्यंत ओघवत्या शब्दात उदाहरणांसहित विषय प्रतिपादन केले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी असंख्य तरुणांनी अत्यंत लहान वयात केलेल्या बलिदानाचे, त्यांनी सोसलेल्या यातनांचे ,त्यागाचे स्मरण करून व्याख्यानाला सुरुवात करताना, जात आणि धर्म यांचा खरा अर्थ श्री. पोंक्षे यांनी विशद केला. हिंदू धर्म म्हणजे मानवतेचा विचार, मानवतेचे पालन करणे ,निसर्ग नियमांचे पालन करणे होय. हा धर्माचा अर्थ ब्रिटिशांनी दूषित केला आणि त्यायोगे समाजात फूट निर्माण केली. शेकडो वर्षांचा इतिहास असलेली हिंदू संस्कृती किती समृद्ध आहे हे सांगताना,ज्ञानाचा आणि विज्ञानाचा किती मोठा वारसा भारताला लाभला आहे हे शरदजींनी नालंदा विद्यापीठाचे उदाहरण देऊन अधोरेखित केले. व्यवसायाधिष्ठित जाती आणि त्यांचे समान महत्त्व, त्याच बरोबर अधर्मी आणि निधर्मी यातला फरक शरदजींनी प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर मांडला. आजच्या पिढीने स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय, इतर बंधनात न अडकता, राष्ट्र भावनेने काम करण्याची गरज शरदजींनी बोलून दाखवली. स्वतः मधील उपजत बुद्धिमत्ता ओळखूनच शिक्षणाची दिशा निवडावी, फक्त पॅकेज आणि पैशांकडे बघून कार्यक्षेत्र निवडू नये ही महत्त्वाची बाब उदाहरणांसहित उत्तमरीत्या शरदजींनी पटवून सांगितली.
विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता आयोजित या व्याख्याना करिता २५० हून अधिक विद्यार्थी आणि त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या. त्याचबरोबर नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळावरील पदाधिकारी, महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक आणि कर्मचारी वर्गही याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाची माहिती:
(महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी)