चतुरंग होलिकोत्सव - 2023
महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी अशी ओळख असलेल्या डोंबिवलीतील अनेक प्रकारचे कलाविष्कार साकारणा-या कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ आणि चोखंदळ श्रोतृवर्ग - प्रेक्षक उपलब्ध करुन द्यावा या उद्देशाने चतुरंग प्रतिष्ठानच्या डोंबिवली केंद्रातर्फे 1988 पासून होळीच्या निमित्ताने `रंग आमुचा वेगळा' या शीर्षकाखाली दरवर्षी विविधरंगी अशा `होलिकोत्सव' उपक्रमाचे आयोजन केले जाते. कोरोना संकटाचे सावट दूर झाल्यावर यंदा रविवार, दि. 12 मार्च, 2023 रोजी डोंबिवली पूर्वेतील सुयोग मंगल कार्यालयाच्या सभागृहात सायंकाळी 5 ते 9 या वेळेत हा होलिकोत्सव रसिकांच्या हाऊसफुल्ल उपस्थितीत जल्लोशात संपन्न झाला. होलिकोत्सवाच्या पहिल्या `हास्यरंगात' अभिनेते श्री. निखिल ताडफळे यांनी पु.लं.च्या बटाट्याची चाळ या लोकप्रिय कार्यक्रमाचा एकपात्री प्रयोग सादर केला. बटाट्याच्या चाळीतील भ्रमणमंडळाच्या पुणे प्रवासातील अनेक पात्रे त्यांच्या लकबींसह सादर करुन उपस्थित रसिकांना हास्यरंगात चिंब भिजविले.
कार्यक्रमाच्या दुस-या `ज्ञानरंगात' प्रा.अभिजीत देशपांडे यांच्या `चित्रपटाचा रसास्वाद कसा घ्यावा?' या थोड्या अनवट वाटेवरच्या उद्बोधक व्याख्यानाचा आस्वाद रसिकांनी घेतला. कथा, कादंबरी, कविता या प्रमाणे चित्रपटही वाचून समजून घ्यायला हवा हे नमूद करुन निरीक्षण (observation) वाचन (reading) आणि अर्थनिर्णयन (interpritation) या चित्रपट समजून घेण्याच्या महत्वाच्या पाय-या असल्याचे सांगीतले. 1895 साली सुरु झालेला चित्रपटाचा पडदा आता वेगाने बदलतो आहे. थिएटर, होम-थिएटर आणि आता पाम थिएटर (हातातला मोबाईल) पर्यंत चित्रपट आला आहे. सध्या चित्रपट निर्माते-दिग्दर्शकाला जे हवे ते आपल्याला स्विकारावे लागते पण आपल्याला जसे हवेत तसे चित्रपट निर्माण व्हायचे असतील तर आपण अधिक सजगतेने या माध्यमाकडे पाहून केवळ बघे, प्रेक्षक न राहता रसिक बनून चित्रपटाचा रसास्वाद घ्यायला हवा असे आग्रही प्रतिपादन केले.
होलिकोत्सवाच्या तिस-या अखेरच्या `गायनरंगात' गायन आणि तबला या दोन्ही प्रकारात संगीत विशारद असलेल्या सौ. जयश्री आठवले यांच्या गीतरामायणाचा सुश्राव्य कार्यक्रम उपस्थीत रसिकांच्या उत्स्फूर्त (रसिक संख्या 200-225) प्रतिसादात संपन्न झाला. गायनरंगाच्या भैरवीपूर्वी चतुरंग कार्यकर्त्या यांनी सर्व कलाकारांच्याप्रती व या होलिकोत्सवासाठी सहकार्य लाभलेल्या सर्वांप्रती चतुरंग मनातील ऋणभावना व्यक्त केली.