बँकिंग परीक्षा मार्गदर्शन वर्ग
विविध बँका, एल.आय.सी. वा तत्सम कार्यालयातील नोकरी ही प्रतिष्ठेची समजली जात असली तरी ही नोकरी प्राप्त करण्यासाठी आवश्यकता असते ती स्पर्धात्मक पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याची! आवश्यक ती किमान शैक्षणिक पात्रता असूनही मराठी मुलं या परीक्षेत मागे पडतात कारण त्यांना परीक्षेसाठी उपलब्ध वेळ आणि प्रश्नपत्रिका यांचा ताळमेळ कसा घालावा याचं नेमकं तंत्र अवगत नसतं. या संदर्भात मुंबई आणि अन्यत्र मोठया रक्कमेतील घसघशीत फी भरून खाजगी क्लासेस उपलब्ध असले, तरी चिपळूण आणि कोकण परिसरात त्याची दुर्लभता आहेच. नोकरीसाठी उत्सुक असलेल्यांची ही अडचण लक्षात आल्यामुळे वर्ष २०१३ पासून चतुरंग चिपळूण कार्यालयातील `क्लासरूम'मधे विद्यार्थ्यांना या विषयाचे मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. यात विशेष करून गणित, इंग्रजी, जनरल नॉलेज आणि संगणकाचा वापर या विषयांना प्राधान्य देण्यात येते. स्पर्धेसाठी नियोजित केलेला अध्यापक वर्ग हा राष्ट्रीयकृत बँकांमधून निवृत्त झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा असल्यामुळे उमेदवार विद्यार्थ्यांना या स्पर्धांसंदर्भात नेमके आणि सुयोग्य मार्गदर्शन केले जाते.