चतुरंग प्रतिष्ठानचे (त्रिवेणी) 31वे रंगसंमेलन,पुणे

चतुरंग उपक्रमातील सर्वात मोठा मानाचा तुरा म्हणावा असा उपक्रम म्हणजे `चतुरंग जीवनगौरव पुरस्कार' आणि `रंगसंमेलन'!  चतुरंग रंगसंमेलन `त्रिवेणी' मधील 31 वे रंगसंमेलन (वर्ष 2021) पुणे येथे साकार झाले. लोकसाहित्य, लोकजीवन, लोकसंस्कृती, लोकसंगीत याचे गाढे अभ्यासक, संशोधक आणि लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांना पुणे येथील गणेश कला क्रीडा केंद्र येथे शनिवार दि. 19 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या रंगसंमेलनात डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले गेले. याप्रसंगी जेष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर सरांनी पुरस्करमुर्ती डॉ. प्रभाकर मांडे यांच्याविषयी गौरवशब्द मांडले तर निवड समिती अध्यक्ष या नात्याने डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

डॉ. प्रभाकर मांडे यांनी आपल्या भाषणातून शेकडो वर्षांच्या आपल्या ज्ञानपरंपरेला ब्रिटिशांनी अगदी नियोजनबद्ध खीळ घालून भारताला सर्वार्थाने गुलामगिरीत ठेवले. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात ब-याच वर्षांनी आता हा आटलेला `ज्ञानसरस्वतीचा प्रवाह' पुन्हा वाहता होतोय. नवीन शैक्षणिक धोरण हे त्याचेच निदर्शक आहे. असे समाधान व्यक्त केले. त्यांना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्कारा बद्दल त्यांनी चतुरंग प्रतिष्ठान, निवड समिती सदस्य तसेच समस्त लोकसाहित्य प्रेमी जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पुरस्कार स्वीकारताना मांडे सर अत्यंत भावूक झाले. सरांना दिलेल्या मानपत्राचे वाचन अभिनेते आरोह वेलणकर यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुग्धा गोडबोले यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर तसेच पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे या प्रसंगी निवड समिती सदस्य म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.  हे संमेलन गणेश कला क्रीडा केंद्रात दुपारी 4 ते रात्रौ 10 या वेळेत योजले होते. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ सूत्रसंचालक निवेदक श्री. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले तर स्वागताध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार श्री. विजय कुळेकर उपस्थित होते.  या रंगसंमेलन प्रसंगी डॉक्टर प्रभाकर मांडे यांच्यावरील काढण्यात आलेल्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन बुजुर्ग नाट्य अभिनेत्री गायिका श्रीमती निर्मला गोगटे यांच्या हस्ते केले गेले, तर या स्मरणिकेविषयी खगोलतज्ञ आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण ह्यांचे भाषण झाले.

या रंगसंमेलन सोहळ्यात  श्री. सत्यजित तळवलकर, श्री. प्रताप पाटील, श्री. श्रीधर पार्थसारथी, श्री. नवीन शर्मा या लोकप्रिय कलाकारांनी सादर केलेला मृदंगम्-ढोलकी-पखवाज-तबला या लोकवाद्यांचा `लोकनाद' हा तालफ्युजनचा कार्यक्रम...  सर्वांचे लाडके युवा कलाकार प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांचा, देवीचा गोंधळ... भक्तीगीत... भजन... भारुड... भूपाळी... लावणी... पोवाडा... असा शुद्ध लोकसंगीतांचा `खेळ मांडीयेला' हा कार्यक्रम...  अशी एकूण आकर्षक, रंगतदार कार्यक्रम रचना होती. 

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
शनिवार, 19 नवेंबर 2022  04:00 PM
ठिकाण
गणेश कला क्रीडा केंद्र
पत्ता
गणेश कला-क्रीडा मंच,पुणे.