निर्धार निवासी उजळणी वर्ग

निर्धार वर्गाच्या मुलांच्या विचारपद्धतीने जी सुधारणा `निर्धार निवासी पूर्वतयारी वर्गा'साठी करता आली, त्याचेच पुढचे पाऊल चतुरंगने अधिक खोल विचार करून टाकले. `पूर्वतयारी आणि दिवाळी' या निवासीपद्धतीच्या वर्गांनी जर निर्धारी मुलांना अधिक लाभ होत असेल, तर तोच लाभ आणखी जास्त प्रमाणात होण्यासाठी, फक्त त्याच (निर्धारी) मुलांना Follow up Camp म्हणजेच `उजळणी वर्ग' म्हणून, फॉर्म परीक्षेनंतर लगेचच, सुमारे जानेवारी अखेरिस आणखी ८ दिवसांसाठी बोलावले तर खचितच होईल. चतुरंगी शिक्षक टीमशी हा विषय विस्ताराने बोलून, या `निर्धार निवासी उजळणी वर्गा'ची रचना पक्की करण्यात आली. आणि त्याच वर्षापासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. अर्थात या कामी केंद्र म्हणून गुणदे-वहाळ या शाळांचे आणि वर्गाला शिकविण्यासाठी पुन्हा पुन्हा येणाऱ्या शिक्षक मंडळींचे योगदान लक्षणीय म्हणण्यासारखेच आहे. निर्धारी मुलांनीही या वर्ग रचनेचा उद्देश साध्य आणि सफल करून दाखवला. गत ५-६ वर्षातल्या या वर्गाच्या रिझल्टचे प्रमाण ९० टक्क्यांच्या आसपास राहिले आहे. आणि दचकती-बिचकती मुले आता खूपच जीवनाभिमुख झाल्याचे अनुभवास येणे, हीच या वर्गाची खरीखुरी कमाई ठरते आहे !