श्री.प्रसाद शिंगटे मुक्तसंध्या रिपोर्ट

चिपळूण नगरपालिकेचे तात्कालीन मुख्याधिकारी श्री. प्रसाद शिंगटे यांना बढती मिळून वसई-विरार महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी त्यांची नियुक्ती झाली आहे. श्री. शिंगटे यांनी चिपळूण नगरपालिकेत अडीच महिने काम करताना, स्मरणात राहील असे काम केले. त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'कार्यवृत्तीचे प्रसाद चिन्ह' या नावाखाली कृतज्ञता गौरव सोहळ्याचे आयोजन, सोमवार दिनांक ११ मार्च २०२४ रोजी सायंकाळी चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे चतुरंग प्रतिष्ठानकडून करण्यात आले होते. या सोहळ्याला अभिनेते सुनील बर्वे यांच्यासह सह्याद्री निसर्ग मंडळ संस्थेचे भाऊ काटदरे, व्याख्याते मंदार ओक, संत साहित्याचे अभ्यासक धनंजय चितळे, डॉक्टर प्रशांत पटवर्धन, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, मुख्याधिकारी विशाल भोसले, कार्यालयीन प्रमुख मंगेश प्रभाकर, यांच्यासह चिपळूण मधील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चतुरंगच्या विद्याधर निमकर यांनी केले. श्री शिंगटे यांनी महापूर निवारणाचे काम आत्मीयतेने केले. कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण यासाठी त्यांनी केलेले कामही कौतुकास्पद आहे. बॅडमिंटन कोर्ट, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, या विकासात्मक कामाबरोबरच लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी किशोर मासिक घरपोच विनामूल्य देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, यातून त्यांची कामाविषयीची लगन दिसून येते असे निमकर यांनी सांगितले. डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर बोलताना,अधिकारी श्री शिंगटे यांनी महापुरानंतर केलेल्या कामाचा उल्लेख केला. त्यांच्या कामाचे रोल मॉडेल आपल्या जिल्ह्याला लाभले आहे असेही ते म्हणाले. सह्याद्री निसर्ग मंडळाच्या भाऊ कटदरे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या पर्यावरण विषयक संवेदनेचे कौतुक केले. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात कोकणात चिपळूण नगरपालिकेला मुख्याधिकारी श्री. शिंगटे यांनी प्रथम क्रमांक मिळवून दिला. कचरा व्यवस्थापनासाठी त्यांनी मोठी पावले उचलली असे त्यांनी आवर्जून सांगितले. लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे कार्याध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त करताना, श्री शिंगटे ग्रंथालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते, असे धनंजय चितळे म्हणाले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सुरू झाल्यानंतर ८२ कार्यक्रम या ठिकाणी झाले असे सांगत, श्री चितळे यांनी श्री शिंगटे यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी, श्री शिंगटे यांनी इथल्या अडीच वर्षांच्या कारकीर्दीत केलेल्या विकास कामांचा आढावा घेताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणी कामाला दिलेली गती, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, अशा महत्त्वाच्या कामांचा आढावा घेतला. प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे यांनी, शिंगटे यांच्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या वृत्तीचे कौतुक केले. महिलांच्या दुर्धर आजारासाठी महिला बालकल्याण निधीतून आर्थिक मदत करण्याचे, त्याचप्रमाणे लहान मुलांना किशोर मासिक विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे काम श्री. शिंगटे यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. व्याख्याते श्री मंदार ओक यांनी मुख्याधिकाऱ्यांची, लोकांच्या भावना लक्षात घेऊन काम करण्याची वृत्ती अधोरेखित केली. श्री शिंगटे यांनी, मी एकट्याने काहीच करू शकलो नसतो, नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे मी चांगलं काम करू शकलो, अशी कृतज्ञता व्यक्त केली. चिपळूण नगरपालिकेत काम करताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. मला चिपळूणचा अभिमान वाटतो, मला स्थायिक व्हावं असं वाटलं तर चिपळूणमध्ये होईन, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली खर्चे यांनी केले. मुख्याधिकारी शिंगटे यांचा, अभिनेते सुनील बर्वे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मानपत्राचे वाचन सौ. मीरा पोतदार यांनी केले, तर आभार सौ. स्नेहल जोशी यांनी मानले.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
सोमवार, 11 मार्च 2024  06:00 PM
ठिकाण
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र - चिपळूण
पत्ता