चैत्रपालवी संगीतोत्सव – सूरा मी वंदिले

चतुरंगच्या वर्धापनदिनाच्या औचित्याने १९९५ पासून सुरु झालेला अभिजात शास्त्रीय संगीतावर आधारित “चैत्रपालवी-संगीतोत्सव” रविवार दिनांक १४ मे, २०२३ रोजी डोंबिवलीतील सुयोग मंगल कार्यालयात सायंकाळी ४.३० ते रात्रौ ९.३० या वेळेत सुविहीतपणे संपन्न झाला. साधारणतः १५० ते १६० च्या आसपास रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यंदाचे या उपक्रमाचे २९ वे वर्ष. २००७ पासून या स्वरोत्सवाच्या  डोंबिवलीत सुरु झालेल्या आयोजनाचे हे १७ वे वर्ष. माध्यमतज्ज्ञ व विचारवंत डॉ.उदय निरगुडकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती यंदा लाभली होती.

      सौ.शुभदा पावगी, श्री.चंद्रशेखर वझे आणि श्री.प्रवीण करकरे या त्रिसदस्यीय संगीततज्ज्ञांच्या निवडसमितीने  चतुरंग “संगीत-सन्मान” आणि चतुरंग “संगीत-शिष्यवृत्ती” या पुरस्कारांसाठी अनुक्रमे ज्येष्ठ बासरी वादक पं.नित्यानंद हळदीपूर आणि छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथील युवा, उदयोन्मुख गायिका कु.सावनी गोगटे ह्यांची निवड केली होती. या पुरस्कार - शिष्यवृत्ती प्रदानाचंही यंदाचे १७ वे वर्ष.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माहिती पत्रकासह, चतुरंग वर्धापनदिनाचा पेढा व चाफ्याचे फूल देऊन रसिकांचे करण्यात आले.

      जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका श्रीमती प्रतिमा टिळक यांची शिष्या असलेली डोंबिवलीची युवा गायिका कु.प्राजक्ता काकतकर हिच्या गायनाने संगीतोत्सवाची सुरुवात झाली. प्राजक्ताने राग ललितागौरी मधील 'प्रितम सैंया ' या विलंबित बंदिशीने सुरुवात केली व 'खेलन आये राधा' ही द्रुत बंदिश सादर केली. त्यानंतर तिलक कामोद या रागातील 'सूर संगीत' ही बंदिश व अखेरीस तराणा सादर करुन आपल्या गायकीला विराम दिला.  सुमारे १ तास २० मिनिटांच्या आपल्या सुरेल गायनाने प्राजक्ताने उपस्थित श्रोतृवर्गाची मने जिंकली. प्राजक्ताला डोंबिवलीतील चतुरंग स्नेही व टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्री.श्रीकांत पावगी यांच्या हस्ते स्वरोत्सवाचे स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

     प्राजक्ताच्या गायनानंतर पुरस्कार व शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्याचे आयोजन असल्याने व्यासपीठ मांडणीतील बदलासाठी दहा मिनिटांचे मध्यांतर घोषित करून रसिकांना चैत्रपेयाचा आस्वाद घेण्याची विनंती करण्यात आली. चतुरंगच्या मागील काही वर्षांच्या रंगसंमेलनांच्या स्मरणिका विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आल्या. रसिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि सर्व स्मरणिका रसिकांच्या हाती पोहोचल्या.

         दहा मिनिटांच्या विरामानंतर पुरस्कार व शिष्यवृत्ती प्रदान सोहळा सुरु झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ.उदय निरगुडकर यांच्यासह म्हैसकर फाउंडेशनच्या श्रीमती सुधाताई म्हैसकर, निवडसमितीचे सदस्य श्री. प्रवीण करकरे, पुरस्कार सन्मानमूर्ती पं.नित्यानंद हळदीपूर आणि शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली कु. सावनी गोगटे ही मंडळी उपस्थित होती.

      म्हैसकर फाउंडेशनच्या श्रीमती सुधाताई म्हैसकरांनी शास्त्रीय संगीतातील बुजुर्ग व्यक्तिमत्वाचा सन्मान आणि युवा कलाकाराला प्रोत्साहन देण्याच्या चतुरंगच्या कार्याचे कौतुक करुन हे कार्य असेच  सुरु रहावे ही मनीषा व्यक्त केली.

      निवडसमितीच्यावतीने व्यक्त केलेल्या आपल्या मनोगतात श्री प्रवीण करकरे यांनी पुरस्कार व शिष्यवृत्तीसाठीच्या निवडीबाबत समितीने लक्षात घेतलेले निकष सांगितले. त्यांनी सावनीचे गाणे अनेकवेळा ऐकलेले होते. सावनीला २०१५ साली ख्याल गायन स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी "विष्णू दिगंबर पलुस्कर" पुरस्कार, संगीत मार्तंड पं.जसराज यांच्या हस्ते प्राप्त झाला या कार्यक्रमास प्रवीणजी स्वतः उपस्थित असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ज्येष्ठ बासरीवादक पं.नित्यानंद हळदीपूर यांचे बासरीवादनातील योगदान सर्वश्रुत आहेच पण याखेरीज आपल्या गुरू पंडिता अन्नपूर्णादेवी यांची त्यांच्या अखेरच्या काळात पंडिजींनी मनोभावे सेवा केली. गुरुविषयी त्यांच्या मनात असलेली अपार निष्ठा,श्रद्धा आणि सेवाभाव याचाही विचार त्यांच्या निवडीमागे होता हे स्पष्ट केले.

     यानंतर डॉ.उदय निरगुडकर यांच्या हस्ते कु.सावनी हिला रोख रु.२५,०००/- व शुभेच्छापत्र असे स्वरुप असलेली शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. पं.नित्यानंद हळदीपूर यांनाही रोख रु.७५,०००/- व मानपत्र यांसह चतुरंग संगीत सन्मान प्रदान करुन गौरवान्वित करण्यात आले.

       माझ्या गुरु सौ.शुभदा पराडकर यांच्यामुळे मला हा शिष्यवृत्ती सन्मान प्राप्त झाला आहे आणि तोही हळदीपूर काकांच्या सोबत; ही माझ्यासाठी खूप मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे अशा शब्दांत सावनीने आपले मनोगत व्यक्त केले. अत्यंत ऋजू स्वभावाचे आणि मृदु भाषिक असलेले पं.नित्यानंद हळदीपूर यांनी सन्मानाला संबोधित करताना “माझ्या संगीतमय वाटचालीतील हा सर्वोच्च क्षण” असल्याचे सांगून या सन्मानासाठी निवड केल्याबद्दल त्यांनी निवडसमिती, चतुरंग प्रतिष्ठान आणि म्हैसकर फाउंडेशन यांच्याविषयी ऋणभावना व्यक्त केल्या. शुभेच्छापत्र आणि मानपत्र यांचे शब्दांकन श्री.प्रवीण करकरे यांच्या सुकन्या कु.रिद्धी करकरे हिने केले आहे.

         डॉ.उदय निरगुडकर यांनी आपल्या भाषणात बोलताना भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताविषयी गौरवोद्गार काढले. भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. सर्वांनीच येथे सोने-चांदी यांची लूट केली पण कोणालाही येथील अभिजात शास्त्रीय संगीत लुटून नेता आले नाही असे सांगितले. एकच राग वेगवेगळ्या पद्धतीने सादर करता येतो आणि हेच शास्त्रीय संगीताचे वेगळेपण आहे. शास्त्रीय संगीतातच फक्त ऋतु, प्रहर यानुसार रागांची रचना केली गेली आहे. संगीत हे सर्व जाती-धर्मांच्या पलीकडले असल्याचे सांगून प्रक्षुब्ध मन शांत करण्यासाठी संगीताचा वापर प्रभावी ठरतो असे मत मांडले.

     पं.नित्यानंद यांनी केलेल्या गुरुसेवेविषयी त्यांनी गौरवोद्गार काढले. कोणतीही कला जीवन संपन्न करते पण त्या कलेलाही समाजातील सुजाण..सर्जनशील लोकांचं पाठबळ असणं आवश्यक आहे आणि या संगीतोत्सवाच्या निमित्ताने म्हैसकर फाउंडेशन कुटुंबीय ही खूप मोठी जबाबदारी पार पाडीत आहेत. याबद्दल त्यांनी म्हैसकर कुटुंबीयांचे अभिनंदन केले. पं.नित्यानंद यांचेही अभिनंदन करुन कु.सावनी हिला भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

      अर्ध्यातासाच्या मध्यांतरानंतर श्री.चिराग कट्टी यांच्या सतार वादनाची मैफल रंगली. रोहित देव यांनी त्यांना तबला साथ केली. चिराग यांनी झिंझोटी रागाने वादनाची सुरवात केली. त्यानंतर राग मारुबिहाग आणि शेवटी आपले वडील श्री.शशांक कट्टीरचित भैरवीने सतारवादनाची सांगता केली.

पं.चंद्रशेखर वझे यांचे हस्ते श्री.चिराग कट्टी यांना स्मृतीचिन्ह प्रदान केले गेले. रात्रौ ९.३० रोजी कार्यक्रमाची सांगता झाली.

चतुरंग प्रथेप्रमाणे मान्यवरांसाठी भोजन व्यवस्था केली होतीच. कार्यकर्त्यांनी मान्यवरांना निरोप देऊन आवराआवरीनंतर, “Nimar & Daughters” यांच्या स्वादिष्ट भोजनाचा एकत्रितपणे आस्वाद घेतला आणि यावर्षीचा संगीतोत्सव संपन्न झाला.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
रविवार, 14 मे 2023  04:00 PM
ठिकाण
डोंबिवली
पत्ता
सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली पूर्व