दीपसंध्या चिपळूण : 2023

चिपळूण केंद्रावरील दीपसंध्या चिपळूण जवळील पेढे परशुराम येथे असलेल्या आरती निराधार सेवा फाउंडेशन' यांचा गतिमंद मतिमंद आणि अनाथ-निराधार बाल वृद्धांसाठी चालवला जाणारा निवासी आश्रम येथे संपन्न झाला. सगळ्याच कार्यकर्त्यांना थोडी चिंता होती कारण इथल्या निवासी व्यक्ती मानसिक, भावनिकरित्या संतुलित नाहीत. अंगणातील रांगोळी आणि बासरीच्या सुरल स्वरानीं मन सुखावले आणि कार्यक्रम रंगणार याची खात्री पटली.

सुरवातीला संस्थेतील व्यवस्थापिका सौ. कारेकर यांनी संस्थेच्या कामाविषयी माहिती देत, एक सुंदर संध्याकाळ चतुरंग मुळे आश्रमात साकारणार हि कृतज्ञता चतुरंग ला "सन्मानपत्र " देत व्यक्त केली.

चतुरंग प्रथेप्रमाणे कलाकारांना अत्तरकुपी आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जय शारदे वागीश्वरी ने मैफिलीचा प्रारंभ झाला आणि सगळ्यांनी खूप छान तल्लीन होऊन गायन ऐकलं... साथ दिली हे यश होते निवडलेल्या गाण्याचं. तुझ्या गळा, माझ्या गळा, शालू हिरवा, हिची चालं तुरुतुरु, कानडा राजा पंढरीचा, माझी रेणुका माऊली इ. आणि शेवटच्या " या विठुचा गजर हरी नामाचा" या गजराने मैफलीने कळस गाठला. प्रत्येक जण विठूनामाच्या गजरात तल्लीन होऊन गेला होता. रुढार्थाने सुखवस्तू समवेत रंगणाऱ्या दिवाळी पहाट किंवा दीपसंध्ये पेक्षा कित्येक पटीने जास्त आनंद आणि समाधान देणारा कार्यक्रम साकारल्या ची प्रामाणिक भावना कार्यकर्ते आणि कलाकारांची होती.

आश्रमवासीयांच्या चेहऱ्यावरील समाधान खूप काही सांगणार होते. आजची संध्याकाळ special होती पण उद्या काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरीत करणारा होता. वर्षांत एकदा तरी यासर्वांसाठी वेळ काढला पाहिजे हे प्रकर्षाने जाणवले. अशा संस्था मधून सेवा देणार्या कार्यकर्त्यांना मनापासून सलाम.

निवासी व्यक्तींपैकी दोघांनी छोटेसे सादरीकरण देखील केलं! वंदू ने गायलेले भजन आणि दादा ने वाजवलेल्या बासरीचे सूर मनात साठवत, सगळ्यांचा निरोप घेतला तो परत येण्याचा संकल्प करूनच.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
सोमवार, 13 नवेंबर 2023  05:00 PM
ठिकाण
आरती निराधार सेवा फाउंडेशन' यांचे गतिमंद मतिमंद आणि अनाथ-निराधार बाल वृद्धांसाठी चालवला जाणारा निवासी आश्रम,पेढे परशुराम
पत्ता
पेढे परशुराम