देशप्रेरणेने भरलेल्या शरद पोंक्षेंच्या व्याख्यानाला युवकांचा उत्साही प्रतिसाद

प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि वक्ते शरद पोंक्षे यांच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात खास महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी झालेल्या
व्याख्यानाने विद्यार्थ्यांची मने जिंकली. चतुरंग प्रतिष्ठानच्या "श्रवणानंद" उपक्रमांतर्गत  हे व्याख्यान गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी आयोजित करण्यात आले होते.


कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयाचे प्राचार्य व काही प्राध्यापकही आवर्जून उपस्थित होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी  गुलाबपुष्प व मानवंदना हे पुस्तक देऊन शरद पोंक्षे यांचे स्वागत केले.


व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी "चला, आता तुमची पाळी" या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी स्वातंत्र्याचा अर्थ आणि भारताने स्वातंत्र्यानंतर केलेल्या प्रगतीवर आपले विचार मांडले. देश घडवण्याचे काम हे आता पुढच्या पिढीकडे आहे त्यामुळे त्यांनी त्यांचे त्यांचे काम अगदी मनापासून करावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ही काही फक्त एक घटना नाही, तर एक प्रवास आहे. स्वातंत्र्य मिळवणे सोपे असते, पण ते टिकवून ठेवणे कठीण असते. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यामुळे आपण त्यांचे ऋणी आहोत. असे अनेक महत्वाचे मुद्दे शरद जींनी अधोरेखित केले. त्यांनी पुढे जाऊन सगळ्यांना माहीत नसणारा राष्ट्रगीताचा अर्थ सांगितला. मॅकालेने जाणीवपूर्वक भारताच्या शिक्षणव्यवस्थतून संस्कृत भाषेला हटवलं आणि आपल्याला हवी तशी शिक्षणपध्दती तयार केली. परिणामी आपण आपल्याच इतिहासापासून दूर गेलो.


आपण भारताबाहेरील जगज्जेते असणार्‍या योद्ध्यांचा अभ्यास करतो, मात्र आपल्याच देशातील क्रांतीकारक, इतिहास आपल्याला त्रोटक माहित असतो अशी खंत शरदजींनी व्यक्त केली. त्यामुळे आता असलेले स्वातंत्र्य जपणे आणि भारताची प्रगती करण्याची पाळी विद्यार्थ्यांवर आहे, असे वक्तव्य त्यांनी मांडले. खरी श्रीमंती म्हणजे काय हे त्यांनी जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या उदाहरणातून उलगडून सांगितले. शेवटी त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांकडे देशाला बदलण्याची आणि अधिक चांगले बनवण्याची क्षमता आहे याची जाणीव ही आजच्या तरुण पिढीच्या मनात कायम राहिली पाहिजे आणि त्याला अनुसरून त्यांची वाटचाल झाली पाहिजे. अशा देशप्रेमाच्या प्रेरणेने भारलेल्या व्याख्यानाची सांगता वंदे मातरम् ने झाली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
बुधवार, 23 ऑगस्ट 2023  11:30 AM
ठिकाण
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी
(महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी)
पत्ता