श्रवणानंद

वैज्ञानिक प्रगतीच्या काळातील जीवनशैली अधिकाधिक गतीमान् बनत असताना 'भरपूर वाचणे', 'खूप काही ऐकणे' आणि 'अधिकाधिक विचार करणे' या गोष्टी मात्र समाजात विसरत चालल्या आहेत, असे वास्तव प्रतिपादन, अनेकानेक मान्यवरांकडून विविध प्रसंगी केले जाताना आढळते. या म्हणण्यावर कांही कृतीशील, ठोस पाऊल म्हणून वैविध्यपूर्ण-विचारगर्भ व्याख्यानमालेचा विचार चतुरंग मनात आकार घेऊ लागला आणि महाराष्ट्रातल्या नामवंत व्याख्यात्यांच्या, भिन्न भिन्न विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन सुरु झाले. रंजनपर कार्यक्रमांच्या जोडीने प्रबोधनपर आणि समजोपयोगी विषयांचीही उचित दखल चतुरंगच्या पाचही केंद्रांवर सातत्याने घेतली जावी, हा स्पष्ट उद्देश नव्या उपक्रमामागे राहिला. समयोचित अशा एकाच विषयावर, विषयसत्राला धरून एकाच व्यक्तीची सलग दोन-तीन व्याख्याने किंवा एकाच मुद्द्याला/विषयाला केंद्रस्थानी ठेवून वेगवेगळ्या दोन-तीन  व्याख्यात्यांची दोन-तीन व्याख्याने, असे या उपक्रमाचे स्वरूप ठरले. ज्यातून उत्सुक श्रोतृवर्गाला अभिरुचीसंपन्न विषयांची आणि व्याख्यानांची चतुरंगमंचावरून सलग अशी मेजवानी लाभायला सुरुवात झाली.