संगीत सन्मान आणि संगीत शिष्यवृत्ती

चतुरंग वर्धापनदिनानिमित्ताने योजल्या जाणाऱ्या चैत्रपालवी संगीतोत्सवाचे आयोजन, तपपूर्तानंतर डोंबिवली येथे करण्यात येऊ लागले आणि या संगीतोत्सवाला एक रूपेरी कडा लाभली ती `चतुरंग संगीत सन्मान' आणि `चतुरंग संगीत शिष्यवृत्ती' या दोन पुरस्कारांची ! संगीत क्षेत्रात आयुष्याची अनेक वर्षे संगीत साधना वृत्तीने वेचणाऱ्या आणि सांगितिक संचितात मोलाची भर घालणाऱ्या एका बुजुर्ग व्यक्तीमत्वाला चतुरंग संगीत सन्मानाने गौरविले जाऊ लागले. तर अभिजात भारतीय संगीताची जोपासना हेच जीवनध्येय मानून त्यातील आपला अभ्यास सिद्ध करणाऱ्या युवा कलाकाराला चतुरंग संगीत शिष्यवृत्तीने गौरविण्यात येऊ लागले. या चतुरंग संगीत सन्मानाचे स्वरूप रोख रू. ७५०००/- आणि मानपत्र तर चतुरंग संगीत शिष्यवृत्तीचे स्वरूप रोख रू. २५०००/- व शुभेच्छा पत्र असे असते. चतुरंगबाहय अशा संगीत क्षेत्रातील नामवंताच्या निवडसमितीकडून प्रतिवर्षी ही `सन्मान-शिष्यवृत्ती'ची नावे निवडली जातात. चतुरंग प्रतिष्ठानला ही निवड बंधनकारक असते. या `सन्मान-शिष्यवृत्ती'ला म्हैसकर फाऊंडेशनने आग्रहपूर्वक पुरस्कृत केलेले आहे. चैत्रपालवी संगीतोत्सवातील उपस्थित रसिकांच्या साक्षीने हा `सन्मान-शिष्यवृत्ती' प्रदान सोहळा साकार होतो.