चतुरंग वाढदिवशी रत्नागिरीत श्रुती भावेंचे 'श्रुतीनाद' नादब्रह्म !!
चतुरंग प्रतिष्ठानच्या रत्नागिरी केंद्राचा ७ वा वर्धापन दिन रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ट्ये सभागृहात रत्नागिरीकर रसिकांसाठी मोठ्या दिमाखात, तुडुंब गर्दीत साजरा झाला. प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाचा आनंद रत्नागिरीकर संगीतप्रेमी रसिकांसाठी स्वर-सूर-तालमयी व्हावा म्हणून चतुरंगने सध्याच्या लोकप्रिय युवा व्हायोलिन वादक सौ.श्रुती भावे-चितळे यांच्या 'श्रुतीनाद' या वाद्यवादन मैफलीचे आयोजन केले होते.
नाट्य-चित्र-भक्ती-भाव गीतांची केवळ व्हायोलिन वादन पद्धतीची (आणि सोबत गप्पागोष्टीमय संवादाची) कदाचित ही पहिलीच मैफल रत्नागिरीत रंगत होती ! त्यामुळे कमालीच्या कुतुहलाने, उत्सुकतेने आणि कौतुकाने अगदी पहिल्या गाण्यापासूनच हाऊसफुल्ल गर्दी करुन आलेल्या रसिकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आणि कडाडून टाळी देणारा जाणवत होता...!
सूर निरागस हो..., उठी उठी गोपाळा... ह्या गीतवादनाने मैफलीला चढ्या उंचीने रंगतदार सुरुवात करून देत, हा 'श्रुतीनाद' किती उंचीवर जाणार आहे याची प्रारंभीच झलक दाखवून दिली. एका बाजूने मैफिल जसजशी पुढे जात होती तसतशी एकेका गाण्यानंतर मैफलीचे संवादक, लोकप्रिय निवेदक-सूत्रसंचालक श्री. निबंध कानिटकर छोट्या छोट्या प्रश्नातून श्रुती भावे यांना बोलते करत गेले. त्यातून त्यांचा व्हायोलिन वादनाचा प्रवास उलगडत गेला. व्हायोलिन वादनाविषयी अजिबात आवड, उत्सुकता नसलेल्या श्रुती, आज वरच्या श्रेणीतील व्हायोलिन वादक कशा होत गेल्या या रंजक पूर्वपिठीकेपासून ते व्हायोलिन या वाद्याच्या इतिहासापर्यंत अनेक गोष्टी या मुलाखती गप्पातून रसिकांना जाणून घेता आल्या. एकदम हलक्या फुलक्या संवादातून एखाद्या गाण्याचे फक्त नोटेशन वाजवणे म्हणजे काय आणि गीताचे प्रत्यक्ष शब्द वाजवणे म्हणजे काय याचा सोदाहरण उलगडा श्रुतीताईंनी अगदी सोप्या पद्धतीने करून दाखवला. या अनोख्या मैफलीच्या निमित्ताने झालेल्या गप्पागोष्टींतून श्रुती यांनी त्यांच्या कलात्मक आयुष्यातील अत्युच्च आनंदाचा अनुभवक्षण देखील आवर्जून सांगितला : व्हायोलिन वादनातील बुजुर्ग व्यक्तिमत्व (स्व.) श्री.प्रभाकर जोग यांनी सुधीर फडके यांच्या गीतरामायणासाठी संगीत साथीकरिता वापरलेले त्यांचे स्वतःचेच व्हायोलिन, त्यांच्याचसमोर वाजवण्याची श्रुती यांना मिळालेली संधी आणि ते ऐकवल्यानंतर प्रभाकरकाकांचे त्यांना लाभलेले आशीर्वाद... या प्रसंगाच्या आठवणी सांगताना श्रुती भारावून गेलेल्या आणि खूप सुखावलेल्या जाणवल्या !!!
मैफिल जशी उत्तरोत्तर रंगत गेली तशा रसिकांच्या फरमाईश येऊ लागल्या. त्याही त्यांनी मोठ्या मनस्वीपणे सादर केल्या. शुक्र तारा मंद वारा... शब्दावाचून कळले सारे... धुंदी कळ्यांना... मी मज हरपून...अशी अनेकांच्या तोंडी कायम गुणगुणती असणारी सदाबहार गाणी श्रुतींनी मोठ्या नजाकतीने सादर करून रत्नागिरीकरांची वाहव्वा मिळवली. भक्तीसंगीत प्रकारात स्वर्गीय भीमसेनजींनी लोकप्रियतेच्या कळसावर नेऊन ठेवलेला 'लक्ष्मी बारम्मा....' हा अभंग मोठ्या जोरकसपणे सादर करून, त्यासाठी रसिकांनी दिलेल्या 'वन्स मोअर'ची हौस देखील त्यांनी आवर्जून पूर्ण केली. आजही लोकांच्या मनावर राज्य करणारे 'वादळवाट'चे शीर्षकगीत, त्यानंतर 'स्वये श्री राम प्रभू ऐकती... राम जन्मला गं सखे... स्वयंवर झाले सीतेचे... पराधीन आहे जगती... सेतू बांधा रे सागरी... ही गीतरामायण मेड्ली अशा एक से एक बढकर सादरीकरणाने नादब्रह्माची टाळी लावणारी ही 'श्रुतीनाद' मैफल अपेक्षांचे मजले ओलांडत रंगत गेली. स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकरांच्या जन्म-कर्मभूमी रत्नागिरीत त्यांचेच 'जयोस्तुते श्री महन् मंगले... हे गीत न वाजते तरच नवल ! ह्या गाण्याने तर मैफलीला अजून एका वेगळ्या भावाविश्वात नेले. मैफिल संपता संपता कोकणातील देवगडचे ख्यातनाम् शीघ्रकवी श्री. प्रमोद जोशी यांनी श्रुती भावे-चितळे यांच्यावर केलेली कविता संवादक निबंध कानिटकर यांनी सादर करून कोकण रसिकांच्या रसिकत्वाची पोंचपावती श्रुतीताईंपर्यंत पोहोंच केली. आणि श्रुतीताईंनी देखील अत्यंत विनम्र भावाने कवी प्रमोदजींच्या शब्दभावसुमनांना टाळ्यांनी प्रतिसाद दिला !
मैफलीचा समारोप, पुन्हा सावरकर स्मरणाने, 'ने मजसी ने परत....' या भैरवी स्वरांनी झाला. या मैफली साठी तबलासाथ श्री.केदार लिंगायत यांनी तर की-बोर्ड साथ श्री. प्रसाद जाखी यांनी अत्यंत समर्थपणे केली.
दरम्यान, चतुरंग रत्नागिरीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त चतुरंग चाहते आणि रत्नागिरीतील एक सांस्कृतिक कार्यकर्ते श्री. सुहास ठाकूरदेसाई यांनी संस्थेविषयी गौरवपूर्ण कौतुकभाव व्यक्त करताना, सात वर्षांच्या चतुरंग वाटचालीतील त्यांना भावलेल्या अनेक गोष्टी सांगत सांगत रत्नागिरीकरांच्या वतीने त्यांनी प्रतिष्ठानसह संस्थेच्या युवा कार्यकर्ता फळीला शुभेच्छा दिल्या. चतुरंग कार्यकर्ती कु. उत्कर्षा प्रभुदेसाई हीने वर्धापन दिनाचे प्रास्तविक केले तर कु.भक्ती गद्रे हीने कलाकार, रसिक श्रोते व सहाय्यकर्ते यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत कार्यक्रमाचा समारोप केला. 'श्रुतीनाद' मैफलीने संमोहित झालेले श्रोते मैफल संपल्यावर देखिल काही क्षण भारावल्या नादसमाधीत हरवून बसलेलेच राहिले... !
संवादक निबंधजींनी त्यांना भानावर आणून देण्याचा क्षण हा 'श्रुतीनादा'च्या नादब्रह्मात लागलेल्या श्रवणसमाधीचा परमोच्च क्षण होता... !!!
कार्यक्रमाची माहिती:
गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी.