"असंगाशी संग होतो तेव्हा प्रसंगाशी संग करावाच लागतो..!!"

चतुरंग मुक्तसंध्येत ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर यांचे विश्लेषण 

संपूर्ण देशात सार्वत्रिक निवडणुकांचा काळ चालू आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक चर्चांनी राजकारण ढवळून निघाले आहे. गेल्या काही वर्षात राजकारणाचा स्तर बदलल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकारण म्हणजे नक्की काय...राजकारण हा खेळ आहे की मेळ आहे...? याचे अवलोकन करणारी श्री.भाऊ तोरसेकर यांची मुलाखत काल दि. ४ मे रोजी पुण्यातील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाली. भाऊंप्रमाणेच आपल्या परखड राजकीय विश्लेषणातून लोकप्रिय झालेले श्री. सुशील कुलकर्णी यांनी भाऊंशी संवाद साधला. 

मुळातच सुशीलजी एक उत्तम विश्लेषक असल्याने लोकांच्या मनातील नेमके प्रश्न भाऊंना विचारले. आणि भाऊंनी ही अगदी त्यांच्या नेहमीच्या शैलीने अनेक उदाहरणे, दाखले देत उपस्थितांना वेगवेगळ्या राजकीय घटना उलगडून दाखवल्या.

सुरुवातीलाच भाऊंनी आवर्जून सांगितले की, "हल्ली लोक म्हणतात की राजकारण वेगळ्या दिशेला चाललंय पण मला अस वाटत नाही कारण राजकारणातील सध्या दिसणाऱ्या गोष्टी ह्या काही पहिल्यांदाच घडत नाहीयेत तर त्या अनेक वर्षांपासून घडत आलेल्या आहेत, मात्र यातून लाज नावाची गोष्ट बेपत्ता झाली आहे". २०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात जो काही खेळ चालू आहे त्यावर बोलताना भाऊ म्हणाले की, "आताच्या राजकारणात ५१ म्हणजे १०० होतायत तर ५१ चे दोन जरी कमी होऊन ४९ झाले तरी त्याची किंमत अगदी शून्य होऊन जातेय. त्यामुळे समोरच्यांना सुद्धा त्याच प्रमाणे वागावं लागतं नाहीतर राजकारणात कुणालाच हरवता येणार नाही.

ज्यांच्यावर आरोप केले त्यांचेच आता समोरच्या पक्षात प्रवेश होतात तर सामान्य नागरिकांनी त्यावर कशा पद्धतीने प्रतिसाद द्यावा ह्या मुद्यालाही भाऊंनी एकदम सविस्तर पणे उत्तर दिले. एखादी आई आपल्या बाळाला जेव्हा बाहेरच दूध देते तेव्हा तिला माहित असतं की, ह्यात थोड पाणी असणारच...पण म्हणून लगेच काय ह्या गोष्टीला आपण भेसळ म्हणतो का..!  नाही…तर ती गरज असते...पण एखादा दूधवाला मुद्दामून दुधात पाणी वाढवून त्याचा व्यापार करत असेल तर ही गोष्ट मात्र वाईट आहे हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या अस भाऊ म्हणाले. पुढे भाऊ म्हणाले की, "राजकारण समजून घेताना वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या घटनांतून आपल्याला वेगवेगळे सिग्नल येत असतात आपण ते टिपले पाहिजेत तरच त्यामागचं आणि पुढे होणारं राजकारण आपल्याला कळत". निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या दोन टप्यांतील मतदानचा टक्का कमी झाल्याची ओरड होत आहे या प्रश्नावर उत्तर देताना भाऊंनी मुद्दामून २००९ च्या निवडणुकांचा दाखला दिला आणि वाढलेल्या मतदारांच्या प्रमाणात तसे पाहिले तर हे मतदान काही प्रमाणात नक्कीच वाढले आहे हे स्पष्ट करून सांगितले. वेगवेगळ्या प्रकारच्या मीडियाची भूमिका आणि काही जणांकडून सेट केलेले नरेटीव्ह यामुळे अशा गोष्टी होत असतात असे भाऊ पुढे म्हणाले.

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या राजकारणाविषयी बोलताना भाऊ म्हणाले की, २०१४ ला तत्कालीन सरकारच्या नकारात्मकतेमुळे मोदींना बहुमत मिळाले पुढे २०१९ ला स्वतः मोदींच्या सकारात्मकतेमुळे बहुमत मिळाले पण आता अशी वेळ आहे की, समाजाला मोदींची गरज आहे. या पुढील काळात मोदी सत्तेत असोत वा नसोत पण साधारण ३०-३५ वर्ष ही हिंदुत्ववादी विचारसरणीच्या राजकारणाची असणार आहेत एवढं नक्की. मोदींच्या यशाचं नेमक कारण स्पष्ट करताना भाऊ म्हणाले की, देशाचा पुरुषार्थ मोदींनी जागवला आणि महत्वाचे म्हणजे ज्या काही सरकारी योजना अभ्यासपूर्ण रीतीने सुरू केल्या त्यांना जनतेच्या चळवळीचे रूप दिले, म्हणूनच तर कितीतरी कोटी लोकांनी गॅस सबसिडी सोडली आणि त्यातूनच कितीतरी लोकांना ती नव्याने मिळाली. म्हणूनच मोदींच्या राजकारणाची दिशा ही व्यक्तीकेंद्रित राजकारण बदलून समाजकेंद्रित राजकारणाकडे चालू आहे. 

उपस्थित असलेल्या अनेक प्रेक्षकांनी अनेक औत्सुक्यपूर्ण प्रश्न विचारले. भाऊ आणि सुशीलजी या दोघांनीही तेवढीच समर्पक उत्तरे दिली. 

भाऊंच्या तब्येतीचा विचार करून मुलाखतीच्या मधल्या मधल्या टप्प्यात सुशीलजीनी सुद्धा त्यांचे अनेक विचार स्पष्ट केले. बदलत्या राजकारणाबद्दल त्यांनी सुद्धा एक मुद्दा अधोरेखित केला की ज्यांना अगोदरच गोष्टी पटलेल्या असतात त्यांनाच पुन्हा पुन्हा समजावून सांगण्यात आपण आपला वेळ वाया घालवतोय त्यापेक्षा समजून घेणाऱ्या व्यक्तींची संख्या कशी वाढेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी त्यांच्या बोलण्यातून मांडले.

तत्पूर्वी, मुलाखतीची सुरुवात करताना ज्येष्ठ पत्रकार श्री. सुधीर जोगळेकर यांनी दोन्ही मान्यवर कलाकारांचे चतुरंग प्रथेप्रमाणे स्वागत केले. या मुलाखतीला पुणेकर रसिकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. मुलाखत संपल्यानंतर ही अनेकांनी थांबून दोन्ही मान्यवरांना भेटून त्यांच्या मनातील अजून काही गोष्टी समजावून घेतल्या.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
शनिवार, 04 मे 2024  06:00 PM
ठिकाण
भावे प्राथमिक शाळा सभागृह, पुणे
पत्ता