चतुरंग कार्यकर्ता शिबिर

`काम करेल तो कार्यकर्ता' ही चतुरंग कार्यकर्तेपणाची व्याख्या. अधिक तपशिलात जायचे तर निरपेक्षपणे आणि पडेल ते काम ही दोन विशेषणे चतुरंग कार्यकर्त्याला लावता येतील. चतुरंग कामात असताना कार्यालयीन व्यवस्था, पत्रव्यवहार, विविध कार्यक्रम-उपक्रमांचे आयोजन, व्यासपीठावरून बोलण्याचे तंत्र-मंत्र, समाजातील बुजुर्ग व्यक्तींसोबत गांठीभेटी अशा अनेक कामांना प्रत्येक कार्यकर्त्याला केव्हा ना केव्हा सामोरे जावेच लागते. काम करण्याची इच्छा या कार्यकर्त्यांमधे असतेच असते, परंतु त्या इच्छेला, त्या आवडीला प्रशिक्षणाची जोड मिळाल्यास तो कार्यकर्ता अधिक चांगल्या प्रकारे घडू शकतो. कार्यकर्ता घडवायचा तर ही जबाबदारीही त्या त्या संस्थेचीच असते. म्हणूनच प्रतिवर्षा चतुरंग कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाते. सर्वसाधारणपणे जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शनिवार-रविवारी योजलेल्या या शिबिरात, झालेल्या कार्यक्रमांचा मागोवा, बऱ्या-वाईट गोष्टींचा ऊहापोह, नवीन कार्यक्रमांच्या आखणी संदर्भातील चर्चा, निमंत्रित व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान, वर्षभरात सर्वदूर पसरलेल्या कार्यकर्त्यांना परस्परांच्या जीवनात वर्षकाळात घडलेल्या कडू-गोड घटनांची माहिती...... हे आणि असे काही विविध सत्रांतून योजले जाते. या साऱ्याचा महालाभ म्हणजे मुंबई, दादर, बोरीवली, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, चिपळूण, गोवा अशा सर्वदूर ठिकाणच्या कार्यकर्त्यांना दोन-अडीच दिवस परस्परांच्या साहचर्याचा अनुभव घेता येतो. नकळत परस्परातील नाते अधिक सुदृढ होते ज्याचा पर्यायाने संस्थेलाच लाभ होतो.