चतुरंग प्रतिष्ठानचे (त्रिवेणी) 32वे रंगसंमेलन,डोंबिवली

चतुरंग प्रतिष्ठानचे (त्रिवेणी) 32वे रंगसंमेलन रविवार दि. 18 डिसेंबर 2022 रोजी सावित्रीबाई फुले कलामंदिर, डोंबिवली येथे संपन्न झाले. रंगसंमेलनाला उद्घाटक म्हणून गणेश मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष श्री. प्रवीण दुधे उपस्थित होते. तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. उदय निरगुडकर, स्मरणिकेविषयी बोलण्यासाठी श्री. माधव जोशी, स्मरणिका प्रकाशन हस्ते श्री. मधुकरराव चक्रदेव उपस्थित होते. आपल्याला मिळालेले जीवन हि एक संधी आहे त्यात नुसतं जगण्यापेक्षा काहीतरी ठोस काम करून स्वत:ची, आपल्या समाजाची विशेष अशी ओळख निर्माण करा असा एक वेगळी दिशा देणारा विचार जेष्ठ दुर्ग अभ्यासक श्री. अप्पा परब यांनी मांडला. चतुरंगच्या यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्री. अप्पा परब आपल्या मनोगताच्या भाषणात बोलत होते. आज वयाच्या 82 व्या वर्षी हि गड-किल्यांची मोहीम करणा-या आप्पांनी इतिहासातील अनेक गोष्टी दाखले देत समजून सांगितल्या. काही चुकीच्या गोष्टी कशा रूढ झाल्या पण त्यावर अभ्यासाने योग्य माहितीपर्यंत कसं येता येतं, ते आप्पांच्या मनोगतातून कळून आलं. 

श्री. अप्पा परब यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी उपस्थित होते जेष्ठ पोलीस अधिकारी आणि नुकतेच ATS चीफ पदी नियुक्ती झालेले श्री. सदानंद दाते. अनुभवसंपूर्ण असलेल्या पोलीसी कारकिर्दीतील अनेक अनुभवांचे दाखले देत आपले विचार त्यांनी स्पष्ट केले. अप्पांचे काम हे खरंच ग्रेट आहे, पण असं काम सर्वांपर्यंत पोहोचवणे हे आपल्यासारख्याचेंही काम आहे, आणि त्यात आपण कमी पडतो. समृद्धीकडून सार्थकतेकडे जाण्यासाठी समृद्ध समाज आणि सार्थक व्यक्ती निर्माण करण्याची प्रेरणा अप्पांकडून आपल्याला मिळते असेही ते म्हणाले.   मंचावर उपस्थित जीवनगौरव पुरस्कार निवड समिती सदस्य श्री. विनायक परब यांनी निवड समिती प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त केले. जेष्ठ पत्रकार श्री. सुधीर जोगळेकर यांनी आप्पांचा संपूर्ण कार्यपट, जीवनपट त्यांच्या मनोगतातून मांडला. अप्पांसोबत त्यांच्या सहचारिणी सौ. अनुराधा ताई यांचाही सन्मान करण्यात आला. निवडसमितीतील सौ. मंजिरी मराठे ह्याही मंचावर उपस्थित होत्या.  श्री. सदानंद दाते यांच्या हस्ते आप्पांना मानपत्र, सन्मानचिन्ह, आणि तीन लक्ष रुपये धनादेश अश्या स्वरूपाचा `चतुरंग जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. श्री. प्रसाद भिडे यांनी मानपत्राचे वाचन केले.  डॉ. समीरा गुजर यांनी संपूर्ण रंगसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. 

या सोहळ्याच्या पूर्वार्धात श्री. सत्यजित तळवलकर (तबला), श्री. श्रीधर पार्थसारथी (मृदुंगम), श्री. नवीन शर्मा (ढोलक), श्री. कृष्णा साळुंखे (पखवाज), श्री. तन्मय देवचक्के (हार्मोनियम) या कलाकारांनी चतुरंगसाठी मुद्दाम बांधलेला लोकवाद्यांचा नादघोष अर्थात `लोकनाद' कार्यक्रम झाला, तर उत्तरार्धात गायन - बासरी वादन अशी स्वर सुरांची जुगलबंदी मैफल `स्वर टिपेचा, चांदण्यांचा' हा कार्यक्रम सौ. मंजुषा पाटील-कुलकर्णी आणि श्री. अमर ओक यांसोबत रसिक प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादात पार पडला. 

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
रविवार, 18 डिसेंबर 2022  04:00 PM
ठिकाण
सावित्रीबाई फुले कलामंदिर, डोंबिवली
पत्ता
सावित्रीबाई फुले कलामंदिर, डोंबिवली