दिवाळी प्रभात मैफल 'स्वरदीपोत्सव': पुणे

आजकाल आपण पाहतो की महाराष्ट्रभरात हजारोंच्या संख्येने दिवाळी पहाट मैफली आयोजित केल्या जातात. पण आपल्यापैकी फार कमी लोकांना माहिती असेल की या दिवाळी पहाट संकल्पनेची पायोनियर अर्थात मूळ प्रारंभक आपली चतुरंग प्रतिष्ठान संस्था आहे. जशी दिवाळी आपण आपल्या घरात साजरी करतो अगदी तशीच दिवाळी आपण आपल्या सार्वजनिक अंगणात साजरी केली तर किती मज्जा येईल ना…! ! अशा अगदी प्रायोगिक विचाराने १९८६ साली पहिली दिवाळी पहाट साकार केली गेली. वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातील प्रसन्न दिवाळीचा प्रसंग पडदा उघडताच रसिकांच्या समोर उभा ठाकला आणि रसिक आनंदाने न्हाऊन गेले. चतुरंगने त्या नंतर मात्र संगीत मैफलीने दिवाळी पहाट उपक्रमाचा प्रवास पुढे चालू ठेवला. आणि बघता बघता चतुरंगने सुरू केलेल्या या नवंकल्पनेचे लोण उभ्या महारष्ट्रभर पसरलं….दिवाळी पहाट या कार्यक्रमाची लगवडच केली गेली म्हणा ना…! ! पुढे चतुरंग ने सर्वदूर शहर, गावात प्रवास करत ३८ वर्षात ५० पेक्षा जास्त दिवाळी मैफली आयोजित केल्या. गेल्या काही वर्षात मात्र या दिवाळी पहाट संकल्पनेला काहीसे वेगळे पण येऊ लागल्याच आपण सर्वचजण पाहत आहोत….त्याला साचलेपणाच ग्रहण लागल्याचं दिसून येत…यावर चतुरंग ने नेहमीप्रमाणेच ठरवलं की आपण नवीन मार्ग पायवाटे प्रमाणे सुरू केले आणि नंतर त्याचा हमरस्ता झाला…तसच पण आत्ता ज्या बदलाची गरज आहे तो बदल करायला आपणच पुढाकार घ्यायचा का ? जी संकल्पना ३७-३८ वर्षापूर्वी अनेकांनी डोक्यावर घेतली तिला एखाद नवं वळण देऊन समाज पुन्हा एकदा आपल्या पावलावर पाऊल ठेवेल का ? अशाच विचाराने चतुरंग ने या वर्षी एक नवं वळण घेत दिवाळी पहाट मैफिली साकार केल्या. अशी अनेक ठिकाणं असतात की जिथे दिवाळीचा दिवा लागत नाही किंवा अनेक ठिकाणं अशी असतात जिथे दिवाळीचा आनंद देणारं कुणी नसत पण तेथील सर्वजण अशाच काहीशा आनंदाला भुकेलेले असतात. अशा एकूण चार ठिकाणी चतुरंग ने दिवाळी चा आनंद अनुभवू देण्याची प्रेमळ संधी घेतली. यातील पहिली मैफल दिनांक ११ नोव्हेंबर रोजी खराडी, पुणे येथील पद्मश्री अण्णासाहेब बेहरे जेष्ठ निवास येथे संपन्न झाली. पुण्यातील युवा गायिका सौ. प्राची गोडबोले जोगळेकर यांच्या स्वरांनी ती रंगली. घरातल्या वडिलधाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे वटवृक्षच. पण आधी आधारस्तंभ असणारा हा वटवृक्ष म्हातारपणाच्या ओझ्याने अस्थिर होऊ लागतो. मग बऱ्याच जणांना अडगळ वाटतो. नकोसा होऊ लागतो. मग पुढची पायरी वृद्धाश्रमाची. मात्र वृद्धाश्रम हा शिक्षाच असतो असं नाही तर तिथलंही जीवन सुंदर असू शकतं.याच प्रयत्नांतून याच जीवनाची सेंकड इनिंग्ज सुरू करणा-या तरुण आजी आजोबांसाठी, संगम सार्वजनिक सेवा समिती हा जेष्ठ निवास चालवते. जवळपास ८० जेष्ठ नागरिक येथे निवासाला आहेत. ह्या सगळ्यांनाच दिवाळीचा आनंद देताना आम्ही कार्यकर्ते सुद्धा भरून पावलो. अगदी घरच्या सारखा दिवाळी चा आनंद अनुभवताना सगळ्याच ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर तो भवुकपणा जाणवत होता. याच कार्यक्रमात माजी आमदार श्री. अप्पासाहेब पठारे यांच्या हस्ते जेष्ठ निवासला भाऊबीज भेट सुद्धा प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
शनिवार, 11 नवेंबर 2023  09:00 AM
ठिकाण
पद्मश्री कै. अण्णासाहेब बेहरे ज्येष्ठ निवास, खराडी - पुणे
पत्ता
पद्मश्री कै. अण्णासाहेब बेहरे ज्येष्ठ निवास, खराडी - पुणे