पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ

`एक कलाकार-एक संध्याकाळ' हा खऱ्या अर्थाने चतुरंगला जनसामान्यांपर्यंत पोहचविणारा उपक्रम ! कोणत्याही विषयातील तज्ज्ञ, जाणकार किंवा बुजुर्ग व्यक्ती ही रसिकांच्या भेटीसाठी उपस्थित रहाते आणि मुलाखतकाराच्या माध्यमाशिवाय रसिकवृंदातील कोणीही व्यक्ती या निमंत्रित व्यक्तीबरोबर संवाद साधू शकते. आपले प्रश्न, आपल्या शंका दिलखुलासपणे विचारू शकते. पूर्वीच्या `एक कलाकार एक संध्याकाळ' या कार्यक्रमाची शतकमहोत्सवी सांगता केली त्याला आता सुमारे २५ वर्षांचा कालावधी लोटला आहे. या काळात नाटयसंगीत, नृत्य, चित्र, साहित्य, पत्रकारिता अशा प्रत्येक क्षेत्रात पुढची पिढी केवळ कार्यान्वितच आहे असे नव्हे तर पाय रोवून उभी आहे. त्या त्या क्षेत्राचे नवे नवे आयाम रसिकांसमोर बदलत्या काळाची गरज म्हणून पुढे येत आहेत. त्याचप्रमाणे रसिकवर्गाचीही पुढची पिढी आता नव्या दृष्टीचा नवा श्रोता-रसिक म्हणून पुढे आलेली आहे. हे सारे लक्षात घेऊन चतुरंगने `एक कलाकार एक संध्याकाळ' हा थांबवलेला उपक्रम, चतुरंग नियमाला अपवाद म्हणून, पुन्हा नव्याने सुरू केला आहे. नव्या पिढीतल्या, भिन्न क्षेत्रातल्या नव्या नव्या कलाकारांसाठी आणि अर्थातच नव्या पिढीतल्या नव्या श्रोतृवर्गासाठी आपला जुनाच गाजलेला, लोकप्रिय ठरलेला `पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ' या नावाने !