विशेष कार्यक्रम
चतुरंगच्या पहिल्या दोन दशकांत ठराविक कार्यक्रम, मर्यादीत अशा उपक्रमांतर्गत होत असत. कधी कधी त्यांत आकस्मिकपणे सुचलेल्या संकल्पना घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले जायचे. अलिकडील दोन दशकात मात्र प्रतिवर्षीच्या रंगसंमेलन स्मरणिकेत पुढील वर्षासाठीचे (जानेवारी ते डिसेंबर या काळातले) उपक्रमचक्र तारखा आणि ठिकाणांसह निश्चित केले जाऊ लागले आहे. ज्याचा चतुरंग रसिकांना तर फायदा होतोच पण कार्यकर्त्यांनाही कामातली शिस्त आणि सातत्य राखण्यासाठी मदत होते. पण असे जरी असले तरी अनेकदा तत्कालीन काही सुंदर विषय, काही आकस्मिक संकल्पना सामोऱया येतात आणि त्या पूर्वघोषित नसल्या तरी त्याचे आयोजन मोठ्या निगुतीने करावेसे वाटते. कारण ते विषयच, सांस्कृतिक वा सामाजिक संदर्भाने, दखलयोग्य असतात. शिवाय त्यांत संस्था उभारणी संबंधीचे नातेबंध गुंतलेले असतात. तरल भावबंधांची अतूटशी एक रेशमी गुंफण असते. कधी त्यामधे समाजातील बुजुर्ग व्यक्तीमत्वांच्यासाठी, पंच्चाहत्तरी किंवा सहस्रचंद्रदर्शन सारखे सोहळे असतात तर कधी सामाजिक कृतज्ञतेचा भाग म्हणून चतुरंगला त्या कार्यक्रमांचे वेगळे महत्व जाणवत असते. अर्थात असे कार्यक्रम ही ऐनवेळची सांस्कृतिक धावपळ असते. पण त्यातूनच संस्थेला समयोचितता, आकस्मिकता, परिपूर्णता यासारखे संस्थापयोगी धडे गिरवायला मिळत असतात. अशा विशेष कार्यक्रमोत्तरचे समाधान मोजमापाच्या पलिकडचे, संस्थेला उंची देणारे असते.