मुक्तसंध्या

रसिकमान्य आणि कलावंतप्रिय ठरलेल्या `एक कलाकार एक संध्याकाळ' या उपक्रमापाठोपाठ, त्याचीच वेगळी आवृत्ती असलेल्या `रांगोळी' आणि `निमित्तसंध्या' याही उपक्रमांना महोत्सवी स्वरूपात निरोप देऊन झाल्यावर, रसिक-कलाकारांतील सहवास-संवादाची ओढ संपली नसल्याचे जाणवल्याने आणि प्रतिमासी `एका सुखद संध्याकाळ'चा वसा सुरूच ठेवायचा असल्याने निमित्तसंध्याच्या आगळ्यावेगळ्या समारोपानंतर `मुक्तसंध्या' या उपक्रमाचे आयोजन सुरू झाले. एकच विषयसूत्र, एखादीच तज्ज्ञ व्यक्ती, तत्कालीन निमित्त अशा कुठल्याही बंधनात नसलेली संध्याकाळ ती `मुक्तसंध्या'! चतुरंग केंद्र असलेल्या गिरगाव, डोंबिवली, चिपळूण, गोवा या सर्व ठिकाणी या `मुक्तसंध्यां'चे आयोजन करण्यात येते आहे. सांस्कृतिक व्रतासारखा १९८४ पासून सुमारे ३० वर्षे अव्याहतपणे सुरू असलेला, पण नांव आणि स्वरूप बदलत जाणारा हा कलाकारप्रिय-लोकमान्य उपक्रम चतुरंगद्वारा आजही विनामूल्य प्रवेशतत्वावर सातत्याने आयोजित करता येतो आहे, याचा प्रतिष्ठानला सार्थ अभिमान वाटतो आहे.