भारताचे स्वातंत्र्य - काल, आज आणि उद्या
दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता,ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण येथे चतुरंग प्रतिष्ठानच्या 'स्वातंत्र्याचे पूर्वरंग' या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध अभिनेते, अभ्यासक वक्ते श्री शरद पोंक्षे यांचे 'भारताचे स्वातंत्र्य - काल, आज आणि उद्या' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित चिपळूणातील सुपरिचित व्यावसायिक श्री उदय गांधी यांनी शरदजींचे स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना श्री पोंक्षे यांनी भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेल्या परंपरांचा, हिंदू संस्कृतीतील संज्ञा संकल्पनांचा दाखला देत भारतीय संस्कृती किती समृद्ध होती, आहे आणि ब्रिटिशांनी त्यांच्या राजवटीमध्ये भारताच्या या समृद्धतेला, ज्ञानाला आणि वैज्ञानिक पार्श्वभूमीला कशाप्रकारे त्या काळच्या नव्या पिढ्यांपासून दूर नेले यावर कठोर शब्दांत भाष्य केले. आपणच आपली संस्कृती विसरलो आणि म्हणूनच मागे राहिलो या विषयावर बोलताना शरदजींनी विविध उदाहरणांसह श्रोत्यांना संबोधित केले. चैत्र, वैशाख इत्यादी मराठी महिने नसून राष्ट्रीय महिने आहेत, खरा भारतीय तोच ज्याला देश आधी की धर्म असा विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता तो देश आधी असं म्हणतो, सामान्यातला सामान्य नागरिक राष्ट्रसेवा करू शकतो, या येणाऱ्या दिवसांमध्ये प्रत्येकाने ,आपण ज्या क्षेत्रात उत्तम कार्य करू शकतो ते क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात देशाकरता काम करणं गरजेचं आहे, हा विचार श्री पोंक्षे यांनी मांडला.
चिपळूणातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांबरोबरच ३०० हून अधिक चिपळूणकर श्रोते व्याख्यानासाठी उपस्थित होते. राष्ट्रीयत्वाचा, एकतेचा आणि प्रगतीचा विचार देणारे व्याख्यान अशा शब्दात रसिक श्रोत्यांनी अभिप्राय दिला. व्याख्यानापूर्वी चतुरंग कार्यकर्त्या स्नेहल जोशी यांनी निवेदन केले आणि चतुरंग कार्यकर्त्यानी ऋणनिर्देश व्यक्त केला.