निर्धार निवासी दिवाळी वर्ग

जुलै ते डिसेंबर या काळातला कमी गुणवत्तेच्या मुलांसाठी प्रत्येक रविवारी घेतला जाणारा `निर्धार वर्ग', हा `रविवार ते रविवार'मधे पडणाऱ्या सहा दिवसांच्या अंतरामुळे फारसा उपयुक्त ठरत नसल्याचे लक्षात आले. मुळातच बेताची वा कमी बुद्धिमत्ता असणे आणि इंग्रजी-गणित-सायन्स सारख्या विषयांची मनात भीती बसलेली असणे, या दोन राहू-केतूंनी ग्रासलेली मुले, मागच्या रविवारी शिकवलेले पुढच्या रविवारी विसरू शकतात, हे आम्ही आयोजकांनी ध्यानातच घेतले नव्हते. साहजिकच आपलाच दोष समजून आणि अभ्यासाचे अधिक दडपण वाटून, रविवारच्या निर्धार वर्गाची मुले, संख्येने घटल्यावर आम्हाला जाग आली. पाठपुरावा केल्यावर आणि `अशा' मुलांच्या बाबतीतली आपलीच त्रुटी लक्षात आल्यावर, निर्धार वर्गाचे रूपांतर हुषार मुलांसाठी होणाऱ्या निवासी वर्ग पद्धतीत केल्यास, त्यात फरक पडू शकेल असे लक्षात आले. चतुरंग शिक्षक टीमशी चर्चा करून, हे वर्ग रूपांतर निर्धार निवासी (दिवाळी) वर्ग असे करण्यात आले. अभ्यासातली सलगता आणि एकतानता, त्यातला फरक आम्हाला संस्थेलाही शिकवून गेली. हुषार मुलांच्या निवासीवर्ग धर्तीवरच हे कमी गुणवत्तेच्या मुलांचे निर्धार निवासी वर्ग, दिवाळी सुट्टीत गुणदे केंद्रावर भरवले जाऊ लागले. आणि पडलेला फरक चांगले रिझल्टस् देऊ लागला.