बहुरंगी बहुढंगी कलाकार प्रसाद ओक

दिनांक ९ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीच्या टिळक नगर विद्यामंदिरात चतुरंग प्रतिष्ठान आयोजित पुन्हा एक कलाकार एक संध्याकाळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हरहुन्नरी अभिनेता, रसिकप्रिय सिनेनाट्य दिग्दर्शक, अभ्यासू लेखक आणि निर्माता असा बहुरंगी कलाकार प्रसाद ओक यांनी प्रेक्षकांशी थेट संवाद साधला.

महाविद्यालयात काॅमर्समध्ये आकडेमोड करता करता अभिनय आणि गायन क्षेत्र अचानक आयुष्यात आले. ते सांगतात, "अभिनयाचे धडे पुण्यातील माॅर्डन काॅलेजात देवदत्त पाठक सरांकडे घेतले. त्यांच्या सहा महिन्याच्या शिबीरात अभिनयाचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. त्या वेळच्या कित्येक नाट्य स्पर्धांमध्ये साधारण सत्तरएक वैयक्तिक पारितोषिके मिळाली. गायन क्षेत्रात आईमुळे यायला मिळाले कारण ही कला अवगतच आईकडून मिळाली. आई संगीत विशारद आहे." सुरूवातीपासूनच दिग्दर्शन ही त्यांची पहिली आवड होती. पण अभिनय जमतो म्हणून चांगल्या संधी त्यावेळी मिळत गेल्या. मुंबईमध्ये यायच्या आधी ज्येष्ठ अभिनेते डाॅ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्यासह 'प्रेमाची गोष्ट' हे नाटक करायला मिळाले. दुरदर्शन वरील 'बंदिनी' या मालिके नंतर रसिकांमध्ये खरी ओळख मिळाली. या पुढे दिग्दर्शक मंगेश कदम यांनी 'अधांतर' या नाटकातून संधी दिली. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे पाऊल पडले ते कोरस सिंगर म्हणून ते सुद्धा निव्वळ पंधरा रूपये मानधनात! मुंबईत आल्यावर दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्या हाताखाली असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या सगळ्या प्रवासात कुटूंबाचा प्रचंड पाठिंबा मिळाला असं ते आवर्जून सांगतात.
आपल्या कामात सातत्यासोबत नाविन्यसुद्धा असायला हवं असा त्यांचा आग्रह आहे. म्हणूनच जे काम मिळेल किंवा जी कला सादर करायला मिळेल त्यात नाविन्य आणावं असा त्यांचा मानस आहे. हे नाविन्य प्रामाणिक काम केल्यावरच येऊ शकतं. म्हणूनच स्विच ओफ स्विच ओन या संकल्पनेवर त्यांचा विश्वास नाही. बदल हे सहजपणे स्विकारता आले पाहिजेत, आज ती काळाची गरज आहे. 'अवघाची हा संसार' नंतर त्यांना टेलिव्हिजनसाठी नऊ ओफर्स आल्या होत्या त्या नाकारल्या कारण बदल हवा होता. मग ते गाण्याकडे वळले. पण त्याचसोबत आपली मुळं विसरून चालत नाही. आजच्या मुलांना त्याची जाणीव असावी आणि इतिहास कळावा म्हणून 'हिरकणी' चित्रपटाची निर्मिती केली. नाटक, सिनेमा आणि सिरीयल या तिनही माध्यमातून आपला ठसा उमटवल्यावर आज नेमके काय करायला आवडेल हे विचारल्यावर ते म्हणतात, अभिनय करायचा असेल तर नाटक आवडते, दिग्दर्शन करायचे असेल तर चित्रपट आवडतो आणि प्रपंच करायचा असेल तर टेलिव्हिजन आवडते. तिनही माध्यमांची वेगवेगळी तर्हा आहे ती कसबीने समजून घेणे एका कलाकारासाठी खूप महत्त्वाचे असते.
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव त्यांनी 'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' हे गीत गायले.
कलाकार घडवणे हे दिग्दर्शकाचे कसब आहे. एकच कलाकार दिग्दर्शकाला दोन वेगवेगळ्या भुमिकेत दिसू शकतो. पण अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही कला समप्रमाणात अवघड आहे. ऐतिहासिक चित्रपट करताना दुप्पट जबाबदारी असते. आर्थिक गणिते बदलतात, प्रत्येक गोष्टीवर खूप मेहनत घ्यावी लागते. भिती हा दुर्गुण कलाकाराने ठेऊन चालत नाही, कारण आज स्पर्धा आहे आणि त्याला सामोरं जाणे अनिवार्य आहे. आपल्या प्रवासात भेटणारा प्रत्येक माणूस आपल्यावर कुठल्याना कुठल्या पद्धतीने प्रभाव टाकत असतो, कुणीही एकजण गाॅडफादर नसतो. हे तत्व कलाकाराने कायम लक्षात ठेवावे तरच त्याचे खच्चीकरण होत नाही.
या क्षेत्रात, एकांकिका, प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, मालिका, चित्रपट, वेबसिरीज या पायर्या आहेत. या प्रत्येक पायरीवरून कलाकाराने जावे, एकदम उडी मारू नये तरच तो समृद्ध होतो. उच्चार अभ्यास आणि संवाद संहिता आज खूप महत्त्वाची आहे, त्यासाठी सगळ्याच कलाकारांनी अथर्वशीर्ष आणि आपले श्लोक याचा अभ्यास जरूर करावा. व्यसायिक रंगभूमीवर त्यांच्यासाठी 'रणांगण' हा अनुभव खूप महत्त्वाचा ठरला. शारिरीक ताण हा कलाकाराच्या नशिबातच असतो, तो आपण नाकारू शकत नाही. पण त्यातुनही आपण आपली काळजी घेणे महत्त्वाचे असते. रोज चाळीस मिनीटे व्यायाम आणि कायम प्रसन्न राहणे हा त्यांचा मंत्र आहे. आपली सर्वात जवळची आतापर्यंतची कलाकृती कोणती असं विचारल्यावर ते सांगतात, "कलाकाराची प्रत्येक सिरीयल, चित्रपट किंवा कोणतही प्रोजेक्ट हे त्याचे कुटूंबच असते. ते संपता रूखरूख कायम असते. मी दिग्दर्शक म्हणून काम करतो तेव्हा जास्त एनर्जीने करतो. पण आजवर जे काही माझं काम तुम्हाला आवडलं ते केवळ त्या त्या दिग्दर्शकाचं कसब होतं ज्यांचा मी आजही रूणी आहे."
कलाकाराला घडवताना प्रेक्षकांचा वाटा सगळ्यात मोठा असतो. आपली संस्कृती ही आपल्याच प्रेक्षकांमुळे मोठी होत असते हे आपणही लक्षात ठेवावे. मराठी चित्रपट हा मराठी प्रेक्षकांमुळेच मोठा होतो. कलाकारांना आणि कलेला किंमत देणारा प्रेक्षक खूप महत्त्वाचा ठरतो. त्याच बरोबर थिएटर जागृकता आणि त्याबद्दलचे सामाजिक भान सुद्धा लक्षात घ्यावे. नाटकात किंवा कुठल्याही कार्यक्रमात मोबाईल बंद ठेवणे हा कलाकाराला दिलेला मान समजावा. थिएटरमधील स्वच्छता पाळणे हा सुद्धा आज चिंतेचा मुद्दा आहे.
तुम्ही कलाकार नसतात तर काय व्हायला आवडलं असतं हे विचारल्यावर ते सांगतात, "कलाक्षेत्र नसतं तर माझ्यात जीवच नाही! या व्यतिरीक्त मला दुसरं काही माहित नाही आणि येतही नाही." "या क्षेत्रातले माझे असे कोणी दैवत नाही, जे कलाकार सचोटीने आणि निष्ठेने काम करतात ते माझ्यावर प्रभाव पाडतात."
आगामी काळात दिग्दर्शक म्हणून विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारीत 'चंद्रमुखी' हा त्यांचा चित्रपट रसिकांसमोर येणार आहे, तर 'पिकासो' हा दशावतारी कलाकाराची भूमिका सांगणारा चित्रपट येतो आहे.
विविध कलांमध्ये वावर असणारा या रसिकप्रिय कलाकाराशी संवाद म्हणजे डोंबिवलीकरांसाठी पर्वणी होती.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
गुरुवार, 13 एप्रिल 2023  05:00 PM
ठिकाण
टिळकनगर विद्यामंदिराचे पेंढारकर सभागृह, २रा मजला, टिळकनगर, डोंबिवली(पूर्व ).
पत्ता
टिळकनगर विद्यामंदिराचे पेंढारकर सभागृह, २रा मजला, टिळकनगर, डोंबिवली(पूर्व ).