चतुरंग प्रतिष्ठानचे (त्रिवेणी) 30वे रंगसंमेलन,गोवा

त्रिवेणी रंगसंमेलनातील 30वे रंगसंमेलन गोव्यात राजीव गांधी कलामंदिर, फोंडा येथे साकार झाले. या संमेलनात चतुरंग प्रतिष्ठानचा वर्ष 2020 चा सांस्कृतिक क्षेत्रिय पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक श्री. दत्तात्रय अंबादास मायाळू ऊर्फ `राजदत्त' यांना सुप्रसिद्ध सिने कलाकार श्री. अनुपम खेर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या जीवनगौरव सोहळ्यानिमित्त गौरवमूर्ती श्री. राजदत्तजी यांच्या सन्मानार्थ रविवार दि. 4 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते रात्रौ 10 पर्यंत राजीव गांधी कलामंदिर फोंडा-गोवा येथे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री. राजदत्तजींच्या जीवनपटावर आधारित ध्वनिचित्रफीत, अभिनेते श्री. मनोज जोशी यांची श्री. सचिन चाटे यांनी घेतलेली खंड्प्राय मुलाखत, पं. भीमसेनजी गाणी व आठवणी - ज्यामध्ये आनंद भाटे यांचे गायन व डॉ. अजय वैद्य यांनी त्यांच्याशी साधलेला गप्पागोष्टीमय संवाद असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. रंगसंमेलनाचा केंद्रबिंदू असलेला जीवनगौरव प्रदान सोहळा राजदत्तजींच्या चित्रपट, दिग्दर्शन कारकीर्दीला साजेसा भारदस्त आणि देखणा होता. गोव्यातील लोककलेचे अभ्यासक पद्मश्री विनायक खेडेकर यांनी जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्ट्यपूर्ण उद्घाटन लाईट-साऊंड-अॅक्शन म्हणून फटमार करून वातावरण निर्मिती केली. यावेळी व्यासपीठावर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, श्री. विजय कुवळेकर, श्री. सुधीर जोगळेकर, गोव्याचे माजी खासदार श्री. नरेंद्र सावईकर, प्रा. अनिल सामंत, श्री. जनार्दन वेर्लेकर इत्यादी महनीय व्यक्ती उपस्थित होत्या. 

चतुरंग कार्यकर्ते डॉ. दत्ताराम देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्री. सुधीर जोगळेकर यांनी निवड समितीतर्फे मनोगत व्यक्त केले. श्री. विजय कुवळेकर यांनी राजदत्तजींविषयी गौरवशब्द व्यक्त केले. श्री. प्रमोद पवार यांनी मानपत्र वाचन केले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच दक्षिण गोव्याचे माजी खासदार श्री. नरेंद्र सावईकर यांनी चतुरंगविषयी गौरवोद्गार काढले. प्रमुख पाहुणे श्री. अनुपम खेर यांनी चतुरंगच्या एकूण कार्याची स्तुती केली. चतुरंग प्रतिष्ठानने जीवनगौरव पुरस्काराची रक्कम वाढवून तीन लाखांऐवजी पाच लाख करावी अशी सूचना श्री. अनुपम खेर यांनी आपल्या भाषणातून केली व या रकमेपोटी अनुपम खेर अकादमीतर्फे प्रतिवर्षी दोन लाख रु. देण्याचे आश्वासन दिले. पुरस्कारमूर्ती श्री. राजदत्तजी मनोगत व्यक्त करताना सद्गदित होऊन म्हणाले, की ज्या लतादीदींमुळे मी दिग्दर्शक म्हणून उभा राहू शकलो त्या लतादीदींच्या जन्मभूमीत माझा सन्मान होतोय हे माझे परमभाग्य ! गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही गोवा मुक्तीच्या ध्यासाने झपाटलेल्या आमच्यासारख्या त्याकाळच्या अनेक तरूणांना लतादीदींनी गाण्याच्या कार्यक्रमाद्वारे पैसा गोळा करून अर्थसहाय्य केले होते. आज लताजींच्या मुक्त गोव्यात होत असलेला माझा जीवनगौरव सोहळा लतादीदी वर बसून पाहात असतील व त्यांनाही कृतार्थ झाल्यासारखे वाटत असेल असे उद्गार श्री. राजदत्तजींनी सोहळ्याप्रसंगी काढले. सौ. सिद्धी उपाध्ये यांच्या सुंदर आणि नेटक्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला विशेष शोभा आणली. रंगसंमेलनाला सुमारे पाचशे रसिक प्रेक्षकांची उपस्थिती लाभली.       

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
रविवार, 04 डिसेंबर 2022  04:00 PM
ठिकाण
राजीव गांधी कलामंदिर, फोंडा
पत्ता
राजीव गांधी कलामंदिर, फोंडा ,गोवा