चतुरंग होलिकोत्सव

होलिकोत्सव  हा स्थानिक पातळीसाठी सोयीचा म्हणून केवळ डोंबिवलीत साकारलेला उपक्रम! ‘त्रिवेणी' जशी नवोदित गायक-गायिकांसाठी होती, तशीच विविध गुण वा कौशल्ये संपादितांना मंच देणारा हा उपक्रम होता. अनेक प्रकारचे कलाविष्कार साकारणा-या कलावंतांना जाणता श्रोता-प्रेक्षकही लाभावा लागत असतो. ही सांगड घालायचा प्रयत्न येथे यशस्वी झाला. नाहीतरी ‘होळी'च्या निमित्ताने सर्वांना थोडे थोडे ‘मोकळे' व्हावेसे वाटत असते. त्यामुळे ‘होळी'चाही रंग ठेवायचा! नंतर कपाळाला गुलाल आणि पायाला लागलेली माती धुवून लगेचच सभागृहात वा मोकळ्या जागेत `कलानंद' घ्यायचा आणि वर `कढीखिचडी'ने किंवा अल्पोपहाराने तृप्त मनाचा ढेकर द्यायचा.... असा सुटसुटीत कार्यक्रम असायचा. नाममात्र (रु. 5 किंवा 10) अशा प्रवेशशुल्कावर निवांतपणे `होळी'चा आनंद देता-घेता यायचा. गर्दीही छान, तरीही बांधेसूद असायची! एका वेगळ्याच धर्तीवर उत्सवी आनंदात मन रमून जायचे. संस्थेचा (सभासद नव्हे) प्रेक्षक-श्रोतावर्ग वाढता राहायचा. शिवाय कार्यकर्तेही छानपैकी कार्यरत आणि बांधून घेतलेले राहायचे.  मधल्या काही काळानंतर आता अलिकडे पुन्हा एकदा हाच होलिकोत्सव केवळ कार्यक्रम स्वरुपात साकार होतोय.