सुवर्णमहोत्सवी आनंद सोहळा , डोंबिवली केंद्र
गेल्याच वर्षीच्या, अक्षय तृतीयेला चतुरंगने सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश केला. या पन्नास वर्षात कलावंत, विचारवंत, रसिक प्रेक्षक आणि चतुरंगच्या सहाही केंद्रांना सहयोग देणारे त्या त्या ठिकाणचे हितचिंतक, मार्गदर्शक, सल्लागार हेच चतुरंगचे बलस्थान राहिले आहे. अशा सगळ्यांप्रती संस्थेची कृतज्ञ भावना व्यक्त करण्यासाठी यंदा प्रत्येक केंद्र सुवर्णयोगी आनंद सोहळा आयोजित करत आहे. त्या शृंखलेतील डोंबिवली केंद्राचा सोहळा सुप्रसिद्ध सर्वेश सभागृह ( दुसरा मजला ) रविवार दिनांक 2 जून रोजी संपन्न झाला.
२ शब्दरंग
सुरुवात “शब्दरंग ” कार्यक्रमातील “राजकारणाकडे कसे पहावे “ या विषयावरील व्याख्यानाने. वक्ते अर्थातच ख्यातनाम पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर. प्रचंड उन्हाळा ,मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक अशा अडचणी असूनही प्रेक्षक साडेचार पासूनच भाऊंच्या भाषणाच्या ओढीने येऊ लागले. पहिल्या मजल्यावर स्क्रीनची व्यवस्था केली होती. दोन्ही हाँल पूर्ण भरले होते. भाऊंनी आपल्या मिष्किल शैलीत अनेक किस्से सांगितले. कधी प्रचंड टाळ्यांनी , तर कधी हास्यकल्लोळाने सर्व सभागृह दाद देत होते. भाऊंनी राजकरणाकडे कसे पहावे याची उदाहरणेच समोर ठेवली. Between the lines काय दडलय हे पहायला हवं या आणि अशा अनेक टीप्स देत भाऊंनी राजकारणाकडे पहायची नजर कशी हवी हे सांगितलं .
३.कृतज्ञरंग
सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, ज्ञानप्रबोधिनी , पुणे,यांचे कार्यकर्ते व निगडी केंद्राचे प्रमुख श्री.आदित्य शिंदे यांनी आपल्या भाषणात त्यांचे चतुरंगसह काम करतानाचे अनुभव सांगितले .ते म्हणाले की पहिल्या भेटीतच ते चतुरंग च्या प्रेमात पडले.आपल्या सहकार्यांना त्यांनी सांगितले की प्रत्येकाने एकदा तरी चतुरंगची कार्यपद्धती जवळून पहायला हवी.ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अनुभव व तरुणांचा उत्साह याची सुरेख गुंफण झाल्यामुळे चतुरंगचे उपक्रम यशस्वी होत असावेत असे त्यांना वाटते. चतुरंगने आपल्या नियोजन पद्धतीचे व आमंत्रण पत्रांचे पुस्तक काढावे असे शिंदे यांनी सुचविले.
४.सोहळयाचा सुवर्णमध्य होता चतुरंगच्या वाटचालीत अमूल्य योगदान दिलेल्या डोंबिवलीतील प्रातिनिधिक मान्यवरांचा गौरव सन्मान ! प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सरकारी वकील श्री. उज्वल निकम मुंबईतून पोहचू शकले नाहीत. श्री.तोरसेकर यांनी चतुरंगच्या विनंतीला मान देऊन ती जबाबदारी स्विकारली.चतुरंगचे संस्थापक कार्यकर्ते श्री विद्याधर निमकर ( विद्या काका ) म्हणाले आजच्या सन्मान मूर्तींनी स्वत:च नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने चतुरंगवर मनस्वी प्रेम केले. काही मान्यवर दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत, पण त्यांचे कुटुंबीयही चतुरंगशी त्याच आत्मियतीने जोडलेले आहेत. अशा मान्यवरांविषयी विद्याकाकांचे गौरव शब्द...
स्व., सुधाकरराव महाजन
माधवाश्रम कार्यालयाचे स्व. सुधाकरराव महाजन हे गिरगावातील माधवाश्रमाच्या रमेशभाऊंचे धाकटे बंधू .त्यांनी १९८६ साली डोंबिवली शाखेच्या पहिल्या कार्यक्रमासाठी व चतुरंगची स्वतःची वास्तु होईपर्यंत कार्यकर्त्यांच्या साप्ताहिक बैठक वगैरे कामांसाठी माधवाश्रमाचा हाँल उपलब्ध करून दिला. वेळोवेळी अनेक कामात त्यांची मदत होत असे.
स्व. श्री मधुकरराव चक्रदेव
मधुकररावांनी चतुरंग डोंबिवली शाखेचे पालकत्व स्वत:हून स्वीकारले . जनक योजना , त्रिवेणी उपक्रमाचा हिरकमहोत्सव, दरवर्षी होणारे रंगसंमेलन ( त्याचवेळी उत्सव आयोजनाची गडबड असूनहि ) यांसाठी मधुकररावांनी मोठा आधार दिला व मोलाचे मार्गदर्शन केले. त्रिवेणीसाठी ७५ कलाकारांची निवास व्यवस्था करणे अवघड होते. तेव्हा "आमचा पाहुणा तुमच्या घरी" ही मधुकररावांचीच कल्पना ! केलेलं काम मिरवण्याच्या युगात , केलेलं एक चांगले काम लपवून पुढील कामाकडे कसे वळावे हे मधुकररावांनी चतुरंगला शिकवले. मधुकररावांच्या पत्नी श्रीमती अंजलीताईनी आजच्या रेल्वेच्या ब्लाॕकमुळे पुण्यात अडकल्या कारणाने कार्यक्रमाला येऊ शकत नाही अशी दिलगिरी मेसेज द्वारे दुपारीच कळवली.
स्व. सुरेंन्द्र वाजपेयी सर
संपूर्ण डोंबिवली शहराच्या शैक्षणिक सार्वजनिक जडणघडणीत ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते असे स्व.सुरेंन्द्र वाजपेयी सर कायमच आम्हाला आमच्या घरातले मार्गदर्शक हितचिंतक असे आधार म्हणून राहिले. कार्यक्रमांना अनेक खात्यांकडून लागणारी परवानगी घ्यावी लागते. त्या कामात सरांची खूपच मदत होत असे. सर चतुरंगचे कोकणातील शैक्षणिक काम पहायला मुद्दाम आले होते. वाजपेयी सरांचे नातेवाईक पूर्वनियोजित कार्यक्रमात बाहेरगावी असल्यामुळे येऊ शकले नाहीत.
स्व.डी.पी.म्हैसकर
चतुरंगचे हितचिंतक व आधारस्तंभ स्व.डी.पी.म्हैसकर ! IRB चे संस्थापक स्व. म्हैसकर डोंबिवली शाखेच्या सुरुवातीपासूनच सर्व उपक्रमांसाठी , विशेषतः रंगसंमेलनासारख्या मोठ्या कार्यक्रमाला, सढळ हस्ते मदत करत असत व आज त्यांच्या पत्नी श्रीमती सुधाताई तीच परंपरा पुढे चालवीत आहेत. श्रीमती सुधाताई म्हैसकर यांचे चतुरंगच्या सर्व कार्यक्रमांना सहाय्य व मार्गदर्शन होत असते. विशेष उल्लेख करावासा वाटतो तो चतुरंग चैत्रपालवी संगीतोत्सवाचा ! विद्याकाकांनी आदरणीय सुधाताईंना म्हैसकर सरांसाठीचा चतुरंगचा कृतज्ञता सन्मान स्वीकारण्याची विनंती केली.
स्व. नाना व स्व. प्रमोद निमकर
सुयोग मंगल कार्यालयाचे स्व. नाना व स्व. प्रमोद निमकर यांच्याशी चतुरंगचा परिचय झाला व डोंबिवलीतील कार्यक्रमांसाठी हक्काचे घर मिळाले. आजही चतुरंगचा कुठलाही कार्यक्रम असो निमकरांचे संपूर्ण कुटुंबिय, यामिनी वहिनी रेखा वहिनी., स्वागता, श्रेया व हिमांशू आपुलकीने मदत करत असतात. विद्याकाकांनी यामिनी वहिनींना नाना व प्रमोद निमकर यांच्यासाठीचा चतुरंग सन्मान स्वीकारण्याची विनंती केली.
या मान्यवरांविषयी बोलताना विद्याकाका खूप भाऊक झाले होते. त्यांनी जणू सर्व कार्यकर्त्यांच्या भावनाच आपल्या गौरव शब्दातून व्यक्त केल्या.
श्री. सुधीर जोगळेकर
विद्याकाका म्हणाले की चतुरंगचा कार्यक्रम कुठेही असो, निवड समिती सदस्य, मानपत्र लेखन, भाषण कुठल्या न कुठल्या स्वरुपात सुधीरभाऊंचे मोठे योगदान असते . सुवर्ण महोत्सवी वर्षाची तयारी करा असा संदेश त्यांनी वर्षभर आधी सर्व कार्यकर्त्यांना पाठवला होता हे एकच उदाहरण धोरणात्मक बाबींतील त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल पुरेसे आहे!
यानंतर भाऊ तोरसेकरांनी लालबागमधील त्यांच्या लहानपणीच्या आठवणींनी अध्यक्षीय भाषणाची सुरुवात केली. चाळीतील मोठ्या माणसांचा सर्वांना धाक असे, आता तसं वातावरण राहिलं नाही हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे. आज सन्मानित झालेल्या मान्यवरांसारख्या माणसांना चांगल्या कामांना मदत करणे हे स्वतःचे कर्तव्य वाटत असते. समाजात ही जाणीव निर्माण करण्याचे मोठं काम चतुरंग करत आहे.
यानंतर श्री.सुधीर जोगळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सर्बियातील शास्त्रज्ञ डाँ .इव्हान यांच्या वातावरणातील प्रदूषण कमी करणाऱ्या Liquid tree चा संदर्भ दिला. समाजातील सांस्कृतिक प्रदूषण कमी करण्यासाठी चतुरंग मोठे योगदान देत आहे असे सुधीरजी म्हणाले. सोहळ्याचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कार्यकर्ती श्रीमती मेघनाताई काळे यांनी केले.
५.स्वररंग
कृतज्ञतेच्या ओलाव्याने ओथंबलेल्या सभागृहांत मध्यंतरानंतर प्रेक्षक स्थानापन्न झाले. सुप्रसिद्ध व्हायोलिन वादिका सौ. श्रुती भावे चितळे यांनी सुरुवातीला "शब्दावाचून कळले सारे" हे गीत सादर केले. श्रुतीच्या वादनातील गायकीची नजाकत, सर्वांना आवडणारी, भावगीते, हिंदी मराठी चित्रपट गीते अभंग व अभ्यासपूर्ण निवेदन यामुळे प्रेक्षकही फर्माईश करु लागले व कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.या रंगतदार मैफिलीची सांगता श्रुतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या "ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला " या अजरामर गीताने केली.
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रणजित काळे, व ऋणनिर्देश सौ. शुभा तायशेटे यांनी केले. सभागृहातून बाहेर पडताना एक दर्जेदार कार्यक्रम अनुभवल्याचे समाधान प्रेक्षकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची माहिती:
डोंबिवली पूर्व
डोंबिवली पूर्व