कालिदासाचे मेघदूत : पुणे

" कालिदासाचे मेघदूत "
           सुरू असलेला 'आषाढाचा' महिना, गेले दोन-तीन दिवस पुण्यात कोसळणारा पाऊस आणि ह्यात कमी म्हणून की काय धनश्री ताईंच्या वाणीतून होणारा मेघदूताचा अक्षरशः मंत्रमुग्ध करणारा शब्द-काव्य वर्षाव ; हा त्रिवेणी सोहळा दिनांक 26 जुलै 2024 रोजी पुणेकर रसिकांनी अनुभवला नव्हे तो जगला ! निमित्त होतो चतुरंग प्रतिष्ठान आयोजित ' श्रवणाणानंद' या उपक्रमांतर्गत कालिदासाचे मेघदूत या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्यात्या सौ. धनश्री लेले यांचं दृकश्राव्य पद्धतीचं अभ्यासपूर्ण व्याख्यान !
            म्हटलं तर अत्यंत साधी-सोपी कथा. कुबेराच्या अलकानगरीत राहणारा त्याचा एक सेवक , उद्यानपाल अर्थात माळी असणारा यक्ष. एके दिवशी कामात चूक झाल्यामुळे कुबेर त्याला शिक्षा देतो की तू पुढचं एक वर्ष आपल्या घरादारापासून, पत्नीपासून दूर प्रदेशात जाऊन रहायचं आणि शिक्षा भोगण्यासाठी यक्ष येऊन पोहोचतो आजच्या मध्य भारतातील रामगिरी पर्वतावर. शिक्षेचे आठ महिने संपतात आणि सुरू होतो आषाढाचा महिना अर्थात वर्षा ऋतू. समोर आकाशातून येणारा पहिला काळाकुट्ट मेघ यक्ष पाहतो आणि त्याच्या भावनांचा जणू बांध फुटतो ! पत्नी-विरहाने तो जणु व्याकुळ होतो. थोडं भानावर आल्यावर यक्षाला कल्पना सुचते की ह्या मेघालास आपला दूत करून आपला खुशाली संदेश जर आपण पत्नी पर्यंत पोहोचवू शकलो तर बिचारी ती देखील सुखावेल; आपला पती सुखरूप आहे आणि तो लवकरच परत येणार आहे या आशेनं उरलेले चार महिने तरी तिचे आनंदात जातील, या कल्पनेतून 'मेघदूता'चा जन्म होतो आणि सुरू होतो कालिदासांच्या 'यक्ष'रुपी प्रतिभेच्या अनुभूतीचा प्रवास !!
              मेघाचा हा कथारूपी प्रवास जरी काल्पनिक असला तरी कालिदासांनी रामगिरी ते कैलासापर्यंतच्या या प्रवासातील सुमारे 25 ठिकाणांचं , तिथल्या नद्या, वनस्पती, फुलं इत्यादी आणि एकंदरीतच भौगोलिक परिस्थितीचं केलेलं वर्णन आजही इतक्या वर्षांनी तंतोतंत खरं ठरलेलं पाहिल्यानंतर कालिदासांच्या शब्दवैभव तसेच काव्यप्रतिभेसह त्यांच्या हवामानाविषयीच्या आणि भूगोलाबद्दलच्या अभ्यासाला त्रिवार सलाम करावासा वाटतो आणि एकच प्रश्न मनात घर करून राहतो हे सगळं कसं सुचलं असेल ?! 
               तर असं हे सुमारे ११६ श्लोकांचं खंड-काव्य अर्थात 'मेघदूत' मांडणं म्हणजे जणू शिवधनुष्यच पेलण नाही का ! धनश्रीताईंच्या वाणीतून मेघदूत ऐकताना चे ते दोन तास म्हणजे जळू आपणही त्या मेघा सोबतच प्रवास करतोय की काय असा क्षणभर भास व्हावा !! 
स्पष्ट उच्चार, अमोघ वाणी, भाषेवरील पकड, श्रोत्यांना एका जागेवर खेळवून ठेवण्याची वक्तृत्व शैली, कुठलाही अतिरेकी अभ्यासूपणाचा आव नाही आणि मेघदूत सारखं- सारखं का सांगायचं तर आपणाला ही कालिदासांसारखं होता यावं म्हणून नाही, तर तो 'सांगण्यातला आनंद' पुन्हा पुन्हा घेता यावा, यासाठी ! इतका नम्रपणा धनश्री ताईंनी कुठून मिळवला असेल या प्रश्नाच्या उत्तर शोधात आणि एका अवर्णनीय समाधान आणि आनंदात आपण घरी जातो, हीच कालिदासांच्या लेखन-शैलीची आणि धनश्री त्यांच्या वाणीची ताकद असावी असं वाटतं. 
धन्यवाद.

दि. २६ /०७/२०२४
स्थळ: भरत नाट्य मंदिर, पुणे.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
शुक्रवार, 26 जुलै 2024  06:00 PM
ठिकाण
भरत नाट्य संशोधन मंदिर ,पुणे
पत्ता
भरत नाट्य संशोधन मंदिर ,पुणे