स्वरगंधर्व सुधीर फडके

तमाम मराठी रसिकांच्या कानां - मनांवर गेली अनेकवर्षे ज्यांनी आपल्या आवाजाने आणि स्वरसाजाने अक्षरशः गारुड केलंय असे सर्वांचे लाडके बाबूजी अर्थात स्व.सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारीत स्वरगंधर्व सुधीर फडके हा  चित्रपट महाराष्ट्रात १ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या पूर्व प्रसिद्धीसाठी चतुरंग प्रतिष्ठानने डोंबिवली पूर्वेतील  सावित्रीबाई फुले कलामंदीरात चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक  श्री.योगेश देशपांडे , बाबूजी आणि ललिताबाईंच्या भूमिका साकारणारे अनुक्रमे सुनील बर्वे आणि मृण्मई देशपांडे , आशा भोसले यांची भूमिका वठवणा-या अपूर्वा मोडक , ग.दि.माडगुळकरांच्या भूमिकेतील श्री.सागर तळाशीकर आणि बाबूजींचे सुपुत्र ज्येष्ठ गायक व संगीतकार श्री.श्रीधर फडके  यांच्याशी गप्पागोष्टीमय मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संवादकाच्या स्थानी होते सुप्रसिद्ध निवेदक व मुलाखतकार श्री.सुधीर गाडगीळ.

  बाबूजीं व चतुरंग यांचा अनेक वर्षांपासूनचा ऋणानुबंध व बाबुजींच्या प्रत्येक भेटीतून अधिकाधिक घट्ट होत गेलेली ही स्नेहबंधाची वीण , बाबुजींचं चतुरंगला सर्वाधिक लाभलेलं स्नेहल साहचर्य , प्रेम , मार्गदर्शन आणि शुभाशीर्वाद याबरोबरच बाबूजींच्या नुकत्याच सरलेल्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्यावर या चित्रपटाची होत असलेली निर्मिती या सर्वांमुळे आज  हा कार्यक्रम करावा असं चतुरंगला आग्रहपूर्वक वाटलं आणि तशी संधी दिल्याबद्दल श्री.योगेश देशपांडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमप्रती चतुरंग मनातील ऋणभावना चतुरंगने आपल्या मनोगतात मांडली.

     चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक श्री.योगेश देशपांडे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल चतुरंग प्रतिष्ठानचे आभार मानले. 
चित्रपटाच्या निर्मितीबाबत बोलताना त्यांनी या विषयाबाबतची अंतस्थ प्रेरणा आणि निर्माते श्री.सौरभ गाडगीळ यांच्या लाभलेल्या सहकार्यामुळे या चित्रपटाची निर्मिती होऊ शकल्याचे सांगीतले.

    बाबूजींचे  समाजमनांतील असलेले अत्यंतिक आदराचे स्थान लक्षांत घेता या चित्रपटाची निर्मिती हे खूप मोठे आव्हान होते हे सांगून यासाठी गेली तीन-चार वर्षे करावा लागलेला अभ्यास व बारीकसारीक तपशीलाबबतही घ्यावी लागलेल्या मेहेनतीबाबत विस्ताराने सांगीतले. 
    
    श्री.श्रीधर फडके यांनी सर्वप्रथम  हा चित्रपट अतिशय उत्तम झाला असल्याचे सांगून आपल्या वडीलांच्या जीवनावर आधारित या चित्रपट निर्मितीबद्दल निर्माते , दिग्दर्शक व सर्व कलावंतांच्याप्रती ऋणभावना व्यक्त केल्या. 
   
    बाबूजींच्या गायनशैलीच्या वैशिष्ट्यांवर भाष्य करताना श्रीधरजींनी प्रसंगानुरुप बाबूजींच्या शब्दोच्चारातील व शब्दफेकीतील  फरक सोदाहरण स्पष्ट करतांना बाबूजींच्या काही गीतांची झलक पेश केली.

मृण्मई देशपांडे , अपूर्वा मोडक , सुनील बर्वे यांनीही चित्रपटातील आपल्या भूमिकेसंदर्भाने कराव्या लागलेल्या विशेष तयारीबाबत सांगून बाबूजी व आशाताईंच्या गीतांचे मुखडे सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.

     ग.दि.माडगूळकरांच्या भूमिकेसाठीच्या निवडीबाबत  भाष्य करताना योगेश देशपांडे यांनी २० वर्षांपूर्वी केंव्हातरी पाहीलेल्या , भेटलेल्या व सोबत छोटसं काम केलेल्या सागर तळाशीकरांची आठवण झाली व गदिमांच्या प्रतिमेशी यांच्या व्यक्तिमत्वाचं बरचसं साधर्म्य असू शकेल असं वाटल्यानं त्यांना लेटेस्ट फोटोग्राफ्स् पाठविण्यास सांगीतले व ते पाहिल्यावर तळाशीकरांची या भूमिकेसाठीची निवड निश्चित केल्याचे सांगीतले. चित्रपट पाहिल्यावर रसिकांनाही ही निवड चपखल वाटेल असा विश्वास व्यक्त केला. यावर भाष्यकरताना सागर तळाशीकर यांनी प्रतिमेत योगेशला वाटलं तसं साधर्म्य असू शकेल पण प्रतिभेबाबत हा प्रश्न निर्माणच होत नाही कारण गदिमांसारखी असामान्य प्रतिभा माझ्याकडे नाही. बाबूजी व गदिमा हे दोघेही विरुध्द प्रकृतीची व्यक्तीमत्वं. गदिमा यशवंतराव चव्हाणांच्या सानिध्यात वावरलेले पक्के काँग्रेसी तर बाबूजी आर.एस.एस.चे खंदे कार्यकर्ते. पण दोघांनीही आपापल्या व्यक्तिमत्वातील कंगोरे एकमेकाला बोचणार नाहीत याची सदैव काळजी घेतली. 
गदिमांच्या असामान्य व्यक्तिमत्वाला आपल्या भूमिकेमार्फत कोणतेही गालबोट चुकूनही लागू नये यासाठी खूप खबरदारी घ्यावी लागली. गदिमा हे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी खूप  वाचन करावं लागल्याचं तळाशीकरांनी सांगीतले.

   श्री.सुधीर गाडगीळ यांनी नेहमीच्या त्यांच्या खुमासदार शैलीत नेमक्या आणि नेटक्या प्रश्नांद्वारा रसिकांना अपेक्षित  माहिती काढून घेऊन एकूणच कार्यक्रम रंगतदार केला.

     योगेश देशपांडे यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहून प्रतिसाद देण्याचे आवाहन रसिकांना केले.

   चतुरंग कार्यकर्ते रणजित काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्रदीप इनामदार यांनी ऋणनिर्देश केला.
   बाबूजींच्या मूळ चालीतील ' ने मजसी ने परत मातृभूमिला ' (जे गीत या चित्रपटात सुरवात व शेवट अशा दोन्ही वेळेस आहे) या गीताने या दोन- सव्वादोन तासाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. रसिकांनीही चांगला प्रतिसाद कार्यक्रमाला दिला.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
शुक्रवार, 19 एप्रिल 2024  07:30 PM
ठिकाण
सावित्रीबाई फुले कलामंदीर, डोंबिवली.
पत्ता