'स्वरदीपोत्सव' - गोवा
चतुरंग प्रतिष्ठान गोवा दीपसंध्या कार्यक्रम उत्साहात साजरा.
चतुरंग प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चतुरंग प्रतिष्ठानच्या गोवा शाखेचा दीपसंध्या हा कार्यक्रम वेगळ्या व विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला.
प्रतिवर्षाप्रमाणे एखाद्या सभागृहामध्ये कार्यक्रम न करता ज्या संस्थामधील व्यक्तींना घरगुती दिवाळीचा आनंद घेणे शक्य नसते अशांसाठी सप्तवैशिष्ट्यानिशी चतुरंगतर्फे 'स्वरदीपोत्सव' हा कार्यक्रम 'दि गोवा हिंदू असोसिएशनच्या स्नेह मंदिरामध्ये' संस्थेच्या पदाधिकारी कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. रांगोळ्या, पणत्यांची आरास, सुगंधी स्वागत, फराळ , संगीत मैफली सोबतच दोन्ही संस्थांना चतुरंग संस्थेतर्फे भाऊबीज भेट देण्यात आली.
संगीत कार्यक्रमात विश्वजीत मिस्त्री व नम्रता पराडकर यांनी आपल्या गायनाने उपस्थित रसिकांना खिळवून ठेवले. त्यांना संवादिनीवर दत्तराज म्हाळशी, तबल्यावर संकेत खलप व टाळ संगत राहुल खंडाळकर यांनी दिली. कार्यक्रमाचे निवेदन गोविंद भगत यांनी केले. डॉक्टर दत्ताराम देसाई यांच्या हस्ते स्नेह मंदिर तर्फे सुमनताई सामंत यांनी भाऊबीज भेट स्वीकारली.