MHT-CET मार्गदर्शन वर्ग

अलीकडे काही वर्षे मेडिकल आणि इंजिनियरींगच्या कोर्सला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी पातळीवर Common Entrance Test(CET) घेतली जाते. त्यातून उत्तम गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांनाच गुणानुक्रमे विविध महाविद्यालयातून प्रवेश मिळतो. कोकणातील विद्यार्था बुद्धिमत्तेच्या निकषावर कुठेही मागे पडत नाही. मात्र उत्तम गुणवत्ता प्राप्त करून देणारे तंत्र सांगणारे मार्गदर्शन योग्य वेळी लाभले नाही तर त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होत असते. लाखोंच्या संख्येने विद्यार्थी सहभाग असलेल्या या परीक्षेसाठी कोकणभागात मात्र पुरेशा प्रमाणात मार्गदर्शन उपलब्ध नाही हे लक्षात आल्यावर चतुरंग प्रतिष्ठानकडून चिपळूण येथिल चतुरंग कार्यालयातील क्लासरूममधे या मार्गदर्शनवर्गांचे आयोजन केले जाऊ लागले. प्रतिवर्षी १२ वीची परीक्षा झाल्यावर लगेचच सुरू होणाऱ्या या वर्गांचा कालावधी हा सरासरी ५०-५५ दिवसांचा असतो. ज्यात Physics, Chemistry, Biology आणि Maths. या विषयांचा समावेश असतो. मुंबईतील तज्ज्ञ, अनुभवी प्राध्यापक वर्ग, प्रत्येक विषयाच्या भरपूर नोट्स, विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष, वर्ग संपल्यानंतरही स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान आणि अत्यंत माफक फी (मुंबईच्या तुलनेत सुमारे एक पंचमांश इतकीच) ही चतुरंगच्या MHT-CET मार्गदर्शन वर्गाची वैशिष्टये आहेत. आणखी एक ठळक विशेष म्हणजे बरेचदा विद्यार्थ्यांचा अभ्यास तयार असतो पण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप नेमक्या कोणत्या पद्धतीचे असते हे त्यांना माहित नसते. त्यामुळे परीक्षेच्या मर्यादित कालावधीत पेपर सोडवताना गोंधळ उडू शकतो. यासाठी चतुरंग CET वर्गांमधून विद्यार्थ्यांना तशाच प्रकारची प्रश्नपत्रिका रोजच्या रोज सरावासाठी दिली जाते. त्यांच्या उत्तरपत्रिकेचे दुसऱ्याच दिवशी गुणांकनही करण्यात येत असल्यामुळे झालेला विषय विद्यार्थ्यांना खरंच किती समजला आहे हे विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह पालकांनाही समजू शकते. त्यादृष्टीने अभ्यासवेळात सकारात्मक बदल केले जाऊ शकतात. उपस्थितीबाबत आणि वर्गातील शिस्तीबाबत थोडेफार कांटेकोर, कडक नियम, यामुळे (कदाचित) मुले नसली तरी पालकवर्ग खूश असतो. वर्ग सुरू होण्यापूर्वीच सर्व पालकांची एक विशेष मिटींग घेतली जाते.