मोहन जोशी यांची गप्पागोष्टीमय मुलाखत
चतुरंग प्रतिष्ठानच्या मुक्तसंध्या या उपक्रमा अंतर्गत दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी ब्राह्मण सहाय्यक संघ चिपळूण येथे, ज्येष्ठ अभिनेते श्री मोहन जोशी यांची मुलाखत आयोजित करण्यात अली होती. या प्रसंगी संवादक म्हणून जडण-घडण या मासिकाचे संपादक, पत्रकार डॉ सागर देशपांडे उपस्थित होते. चिपळुणातील प्रख्यात व्यक्तिमत्त्व डॉ मेहेंदळे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
आपल्या खुमासदार शैलीतून मोहनजींचा जीवनप्रवास उलगडून दाखवताना डॉ सागर देशपांडे यांनी त्यांच्या पुण्यातील वास्तव्याच्या, त्यांच्या बालपणीच्या आणि ऐन उमेदीतल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. अत्यंत साध्या आणि शिस्तीच्या वातावरणात मोहनजींचा बालपण गेल. मोठ्या भावाच्या आणि वडिलांच्या संस्कारांचा खूप जास्त प्रभाव आपल्या जीवनावर आहे असे मोहनजी आवर्जून सांगतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी चा प्रयत्न करून शेवटी किर्लोस्कर कंपनी मध्ये टेम्पो चालकाची केलेली नोकरी आणि त्या वेळच्या घरातील आठवणी आणि संघर्षाची काही वर्ष आठवताना मोहनजींचे डोळे भरून आले.
त्या बरोबरच ऐन उमेदीतील प्रेमाच्या कडू गॉड आठवणी आणि त्या वेळच्या अस्सल पुणेरी गमती जमतींनी या सुसंवादाची रंगत वाढवली. डॉ सागर देशपांडे यांच्या ओघवत्या शैलीमुळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. मोहनजींचा जीवन प्रवास उलगडून दाखवणारे "नट-खट " हे पुस्तक त्यांच्या संघर्षाची एक सुंदर कहाणी विशद करते, त्यामुळे एका समृद्ध रंगकर्मींचा जीवनप्रवास वाचू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे असे प्रतिपादन डॉ सागर देशपांडे यांनी यावेळी केले.
अनेक वर्षे फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट, मालिका, नाटके यांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मोहनजींची मुलाखत हि चिपळूणकर रसिकांना खरोखरच एक पर्वणी ठरली.