सांस्कृतिक वनवासाच्या समाप्तीचा आनंदोत्सव -व्हाया "चतुरंग"

शनिवार, 30 सप्टेंबरची ती अविस्मरणीय मंगल रात्र..मंगल रात्र यासाठी की चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या डॉ.काशिनाथ घाणेकर रंगमंचावर तिसरी घंटा निनादली आणि तानपु-याच्या मंत्रमुग्ध आंदोलनाच्या झुल्यावर सवार झालं एक अजरामर नाट्य पद - जय शंकरा गंगाधरा ..ही होती सुरुवात कै. विद्याधर गोखले लिखित संगीत मंदार माला नाटकाची.... पद सुरू होताच 

टाळ्यांचा जो कांहीं गजर झाला ...तो देत होता साक्ष 

कोकणी संगीत नाट्यरसिकांचा 18 वर्षांचा संगीत वनवास संपल्याची.

खरंतर कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणजे चिपळूण आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चोखंदळ आणि उत्स्फूर्त दाद देणारा म्हणून ज्याची ख्याती असा नाट्यरसिक म्हणजे चिपळूणकर . पण या नाट्य रसिकाच्या प्रारब्धामध्ये अनेक वर्षांचा नाट्यवनवास लिहिला गेला होता जो 

15 ऑगस्ट 2023 रोजी हा संपुष्टात आला आणि सांस्कृतिक केंद्राचा पडदा मोठ्या दिमाखात उघडला गेला. वास्तविक पाहता या उद्घाटनाच्या वेळी पहिलाच कार्यक्रम हा संगीत नाटकाचा व्हावा अशी अनेक रसिक जनांची इच्छा होती.पण ही इच्छा दीड महिन्यांनी प्रत्यक्षात रंगमंचावर उतरवली ती"चतुरंग" ने.

केंद्राचा पडदा वर गेल्यापासून गेल्या दीड महिन्यात जेवढे कार्यक्रम झाले त्यामध्ये सर्वाधिक प्रेक्षक लाभलेल्या पहिल्या तीन कार्यक्रमांत "मंदारमाला "या संगीत नाटकाचा समावेश झाला.अर्थातच जे पहिले दोन कार्यक्रम यशस्वी ठरले ते प्रतिथयश कलाकारांच्या नावांमुळे.पण "संगीत मंदारमाला"या उदयोन्मुख आणि ताज्या दमाच्या कलाकारांनी सादर केलेल्या कलाकृतीला चिपळूणकर नाट्यरसिकांनी दिलेली दिलखुलास दाद ही संगीत रंगभूमीसाठी आणि कोकणच्या सांस्कृतिक उत्थानासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या "चतुरंग"साठी बूस्टर डोसच म्हणावा लागेल.

विशेष म्हणजे प्रेक्षागृहात 7-8 वर्षांच्या बालकांपासून ते नव्वदी गाठलेल्या आजोबा - आजींचादेखील तितकाच उस्फूर्त समावेश होता.प्रत्येक नाट्य पदाला मिळणारी टाळ्यांची दाद आणि कांहीं पदांना मिळालेला "वन्स मोअर"पाहिल्यावर मन भारावून गेलं ,अंतर्मुख झालं. 

" रॅप आणि डीजेने बेभान झालेल्या पिढीला काय कळणार अभिजात संगीत वगैरे?" असं म्हणणाऱ्या शंकासुरांना एक सणसणीत चपराकच बसली आहे या निमित्तानं. यासाठी खरंच कौतुक करायला हवं ते परस्पर सहाय्यक मंडळ, वाघांबे या नाट्यनिर्मिती संस्थेचं, दिग्दर्शक श्री. विसुभाऊ जोशी यांचं आणि आपले नोकरी व्यवसाय सांभाळून आपली नाट्यसांगीतिक परंपरा जपण्यासाठी धडपडणाऱ्या तरुण कलाकार मंडळींचं.

या "मंदार माला" नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने श्रेष्ठ नाटककार कै.विद्याधर गोखले यांचा त्यांच्या जन्म शताब्दीनिमित्त व ज्यांची जन्मशताब्दी येवू घातली आहे असे या नाटकाचे संगीतकार कै. पं.राम मराठे यांचा गौरव करण्याची संधी" चतुरंग" ने साधली.

अडचणीच्या काळात 

या नाटकाचे निर्माते राहिलेले कै. राजारामजी शिंदे यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त केली गेली.

सर्वात उल्लेखनीय म्हणजे सांस्कृतिक केंद्राच्या श्रेयासाठी तू - तू,मी - मी सुरू असताना अतिशय सजगतेने आणि तळमळीने केंद्राच्या पुनर्निर्मिती वर लक्ष केंद्रित करणारे मुख्याधिकारी श्री.प्रसादजी शिंगटे साहेब यांचाही या निमित्ताने केला गेलेला गौरव नाट्य रसिकांच्या त्यांच्याप्रतीच्या कृतज्ञतेचा एक प्रकारे आविष्कारच होता.

डी.वाय एस.पी श्री राजमाने साहेब हे देखील मा.मुख्याधिकारी यांच्यासोबत अखेरपर्यंत संगीत नाटकाचा आनंद घेत होते. हे खरं तर "खलनिग्रहणाय"असणाऱ्या परंतु खाकी वर्दीतल्या संवेदनशील रसिकश्रोत्याच्या रसिकतेचंच दर्शन.

 या आनंदसोहळ्यात पाचशेहून अधिक चिपळूणकर रसिक श्रोत्यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाची माहिती:

कधी होता ?
शनिवार, 30 सप्टेंबर 2023  10:00 PM
ठिकाण
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण.
पत्ता
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण.